shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

प्रकाशपर्वाचा ध्यास घेऊन राष्ट्रीय एकात्मता व लोकशाहीचे वास्तव अभिव्यक्त करणारा काव्यसंग्रह म्हणजे डॉ.अनंत केदारे यांचा "वाग्दान" = प्राचार्य डॉ.गुंफा कोकाटे



"पुस्तक परिक्षण"

आयुष्याला नियतीचा खेळ न मानता जुगार समजून त्याला सामोरे गेलेल्या सारा जगून बघून सोसून, पुरून, उरणार्‍या आणि त्याच्या छाताडावर बसून जीवन गाणं गाणाऱ्या पूर्वज धुरंधरांच्या मुक वेदनेला अर्पण केलेला डॉ.केदारे यांचा "वाग्दान" हा कवितासंग्रह आहे. या कवितासंग्रहाला साहित्य अकादमीचा "उत्कृष्ट साहित्य पुरस्कार" मिळालेला आहे.एकूण ६० कवितांमधून हा काव्यसंग्रह साकार होतो. त्यांनी  या काव्यसंग्रहात मानवी मन व्यक्त केले आहे. ते म्हणतात,
"कोणासाठी किती प्रतिबद्ध आहे आपलं सरकार,
आरक्षण आणि शिक्षणाचा सत्तेसाठी बाजार मांडलाय
शतकानुशतकांचा हंबरडा ज्यांनी आपल्या उरात कोंडून ठेवलाय त्यांचा मोर्चा मी आता उगवत्या सूर्याच्या दिशेने काढलाय" 

अशी स्पष्ट भुमिका घेऊन जगणारा हा कवी आहे. आयुष्यात झालेले अपमान वाल्मिकी व व्यास यांचे उदाहरण देऊन ते सांगतात.याचना,क्षुद्रांचे जीवन,नास्तिक विचारसरणी त्यांची कविता मांडते.या व्यवस्थेतलं नाकारलेपण त्यांच्या कवितेत येते.महामानवांचा आश्वासक इतिहास कवीमधे प्रेरणादायी स्फुलींग जागवतो.
 आईपण,बाईपण,बापपण,सईपण, समाज जीवनाची वास्तव कैफियत , आयुष्य जगतानाची लढाई कवी साकार करतो पण "माणूस आत्महत्या का करीत नाही ? "असा प्रश्न कवीच्या मनात उभा राहतो कारण माणसाची जगण्यावर निस्सीम अशी श्रद्धा असते.
"जिंकता येऊ शकते प्रत्येक लढाई कुणाच्याही पाठिंब्याशिवाय
छातीची ढाल करुन लढतो आहे".हा कवीचा लढाऊ स्वभाव भावतो.

डायनामाईट वृत्तीवर कवी लिहितो.मातीचे ऋण व्यक्त करताना "अजूनही झोपडीतच अंधार का ?" असा प्रश्न कवी व्यवस्थेला विचारतो. अन्याय ,अत्याचाराचा मानवी इतिहास ते वाग्दान" मधून  समोर आणतात.कवीला शिक्षणाचे महत्व आहे.स्वत:चे मुल्यमापन करीत हा कवी जगतो , वागतो, विचारांची अभिव्यक्ती करतो. भोगलेले उन्हाळे- पावसाळे, मानवी वेदना ,श्रीमंत आणि गरीब यातली दरी , स्री जीवन ते व्यक्त करतात.मानवी प्रेम व्यक्त करताना ते म्हणतात,
"प्रेम कुणी कुणावर करावं 
सावरणारे सावरतात
न सावरणारे पुरते बुडतात 
काही पार बरबाद होतात
काही नाती खरंच किती जीव घेणे असतात अणुबॉम्ब सारखे मन बेचीराख करून टाकतात"
व्यथा वेदना, जगण्यावर असलेली श्रद्धा, शेखचिल्ली वृत्ती, कवितेची मूल्ये सांगताना ते कवितेत म्हणतात,"कविता म्हणजे कुसळ
उखळीतलं मुसळ
कविता म्हणजे सनई 
आणि कविता म्हणजे संबळ"
शहाजुक माणसांचे संदर्भ कवी देतात.
शेखचिल्ली कविता लिहिताना कवी म्हणतो,
"अक्कलदाढ येऊन सुद्धा मूर्खपणाचा कळस गाठणारे आपण सारे शेखचिल्ली"
 महामानवांचे ऋण ,रायरंदासारखे जगणे, मनुस्मृतीदिन, भगवान बुद्ध ,भारतीय स्वातंत्र्य, गाव शिवार, शहर, लोकशाहीचे संदर्भ देताना कवी जात, धर्म, पंथ,वर्ण, वर्ग, वंश,पक्ष या सर्व चिंतनातून वास्तव मांडताना म्हणतो की,
माणसागणित बदलत जातात माणुसकीचे संदर्भ 
जाती गणित बदलत जाता संघटनांचे सरनामे 
धर्मागणिक उंचावत जातात प्रार्थना घरांच्या भिंती 
दीड दमडीच्या आयुष्यात प्रत्येक जण विसरून जातो आपला असली चेहरा जातीच्या रंगीत झेंड्याखाली 
धर्माची पताका त्याला मोठी वाटू लागते 
मग मंदिर मस्जिद चर्चगणिक हिटलर निपजतात 
अन् संघटना युद्धाचे आखाडे बनतात" 
ही जातीय,धर्मीय,वर्णीय,वर्गीय  विषमतेची चौकट तोडताना आमच्या बापाच्या नाकीनऊ आले असे वास्तव कवी सहज सांगून जातो.
संविधानकर्ते विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी प्राणांतिक आंदोलने करावी लागतात हे वास्तव सांगतात.
भारतीय स्वातंत्र्याबद्दल बोलताना 
" लोकशाही गुलामगिरीचे दुसरे नाव आम्ही मारलेत भगतसिंग राजगुरू सावरकर 
बळी, बकासुर ,बिभीषण जोपासले घडवायचे होते कर्ण कबीर, युधिष्ठिर
कंस, शकुनी हिटलर निपजलेत  करणार काय ?"
महासत्तेचे परिप्रेक्ष्य, मानवी नातेसबंध,क्रांतीसूर्य ,निसर्गचक्र, खेड्यातले जीवन मांडताना चारित्र्य, बेभान झालेले मुलं मुली व्यसनाधीन पिढी ते साकार करतात.तर शहर साकारताना फॅशन,स्कार्फ,मुलींचं बेभानपण,कॉल गर्ल होणं, डान्सबार,तरुणाचा जोश,कंडोमची विक्रमी विक्री, मद्यपान,गर्भ पाडणे इतक सूक्ष्म मानवी जीवन ते मांडत राहतात आणि भारतीय लोकशाहीची समीकरणे मांडतात. स्वातंत्र्याची गणिते मांडतात .जागतिकीकरण, खाजगीकरण, उदारीकरण , महिलांचे सबलीकरण याविषयी बेधडक आपली भूमिका मांडतात. अंधार युगाचा अंत करून प्रकाश पर्वाचा आरंभ केलेले क्रांतीसूर्य या कवीला महत्त्वाचे वाटतात .निसर्गचक्राविषयीची मानवीय श्रद्धा त्यांच्या कवितेत येते. चक्रव्यूहात काम करता करता "माझा एकलव्य न होवो" असे कवीला वाटते.
एकविसाव्या शतकातील स्री मांडताना ती आजही घाण्याला जुंपलेल्या बैलासारखे दिवस रात्र झुलणारी आहे असे त्यांना वाटते. मिशन इलेक्शन मधील वास्तव म्हणतात.निवडणुकांची सूत्रे सांगतात. प्रकाशाची वल्गना लिहिताना ते म्हणतात,"झाडं ओरबाडून रस्त्यावर डांबर सिमेंट अंथरून कोणता विकास साधत आहेत?" असा ते व्यवस्थेला खडा सवाल विचारतात. "बुद्धाची मूर्ती कोरता कोरता" या कवितेत कवी म्हणतो,
"बुद्धाची मूर्ती करता शिल्पकाराची बोट झिजली
 पण त्याची अहिंसा कोणा नाही कळली
 जग वारंवार महाभारताचं अनुकरण करेल काय 
संत महात्म्यांच्या देशात शांतता नांदेल काय 
बुद्धाच्या वाणीत कुराणाचा अर्थ दडलाय 
बायबलच्या सुक्तात गीतासार  सामावलयं 
जनाबाईची ओवी नामाचा अभंग तुकोबाची शिवी कोणा कळली काय?"
अशाप्रकारे त्यांची कविता आपल्याला अंतर्मुख करते .
"इथं मरून जगतात सारे पण सदा ओले माणुसकीचे झरे" असा आशावादही ते व्यक्त करतात.
डॉ.अनंत केदारे यांच्या कवितांची भाषा सहज साधी सरळ ,ओघवती व प्रवाही भाषाशैली आहे.दलित जीवन जवळून अनुभवल्याने वेदना विद्रोह ,नकार व्यक्त करणारी ही कविता मानवीय मूल्यांना प्राधान्य देते.मानवतेचे तत्वज्ञान सांगणारी ,महामानवांचा वसा व वारसा चालविणारी ही कविता आहे.. दलित साहित्याचा त्यांच्या कवितेवर प्रभाव आहे.दलित चळवळीशी घनिष्ठ सबंध असल्याने एका उत्तम कार्यकर्त्याच्या कविता म्हणून या "वाग्दान" काव्यसंग्रहाकडे पाहता येते.कवितांची भाषाशैली पाहिली तर उत्तम प्रमाणभाषा,अभ्यासपूर्ण, उच्चशिक्षीत असल्याने संयमितपणे त्यांची कविता अभिव्यक्त होत राहते..एक संवेदनशील कवी म्हणून त्यांची कविता समाजपरिवर्तनाचे शस्र उचलते.उत्थानाचे कार्य करते.विषम व्यवस्था नष्ट करुन समतेचा, राष्ट्रीय एकात्मतेचा शोषणमुक्त लोकशाहीचे स्वप्न पाहणारा हा कवी आहे.त्यांच्या कवितेत  इंग्रजी शब्दांचा वापर येतो.उदा. डायनामाइट, हायड्रोजन बॉम्ब ,ग्रज्युएट ,डॉक्टर, फॅशन ,कॉल गर्ल ,मॅटर्निटी ,डान्सबार ,युनिव्हर्सिटी, पोएटिक थर्स्ट, प्लास्टिक, ड्रेनेज, पोल्ट्री,परमिट रूम ,मॉल ,आऊटफिट नॉनव्हेज, डेंजर ,स्पर्म,अल्झायमर, हार्मोन्स अशा अनेक शब्दांसहित ही कविता सर्व भावविश्वाला कवेत घेऊ पाहते म्हणून त्यांची कविता पुढच्या पिढ्यांसाठी दिशादर्शक आहे.
वाग्दान - डॉ.अनंत केदारे
सुगावा प्रकाशन पुणे 
मुखपृष्ठ मयुरेश आर्ट्स पुणे 
प्रथम आवृत्ती १४ ऑक्टोबर २०२० किंमत १२० मात्र

परीक्षक प्राचार्य डॉ. गुंफा कोकाटे,
बेलापूर एज्युकेशन सोसायटीचे,
कला व वाणिज्य महाविद्यालय बेलापूर जि.अहमदनगर 
मो.९८९०८४४४८२
---------------------------
संकलन: शौकतभाई शेख, श्रीरामपूर
close