अमेरिकेच्या फ्लोरीडास्थित लॉडरहिल स्टेडीयमवर भारत व विंडीज यांच्यातील टि २० मालिकेतील पाचवा सामना जिंकून भारताने ४-१ अशी मालिका खिशात घातली आणि एक लांबलेला व विंडीजच्या गलथान आयोजनाचा दौरा संपन्न झाला. दुसऱ्या सामन्यात विंडीजने भारताला हरविले तेंव्हा वाटले होते की विंडीज मुसंडी मारून चमत्कार घडवेल परंतु असे काही घडलेच नाही. उलट त्यानंतरचे तीनही सामने भारताने एकतर्फी जिंकून विंडीजला जराही संधी दिली नाही.
भारताने या मालिकेत काही प्रमुख खेळाडूंना विश्रांती दिली असली तर भारताची दुसरी फळीही तितकीच मजबूत असल्याने त्यांची उणीव जाणवू दिली नाही. उलट नवोदितांनी केलेल्या नेत्रदिपक कामगिरीमुळे एका तरी विश्रांती घेतलेल्या खेळाडूसाठी टिम इंडियाचे दरवाजे बंद होतील अशी परिस्थिती आहे.
भारताने ज्यांना खेळायची संधी दिली त्या प्रत्येकाने आपली छाप सोडली. याला अपवाद शेवटच्या सामन्यातील ईशान किशनचा आपण धरू शकतो. परंतु संघात मजबूत जम बसविलेल्या ईशानला टिम मॅनेजमेंटने सापत्न वागणूक दिल्यामुळे तो खुल्या मनाने या सामन्यात खेळू न शकल्याने त्याच्या धावा फलकावर दिसल्या नाहीत.
सुरुवातीला सलामीवीर म्हणून सुर्यकुमार यादवचा प्रयोग फारसा यशस्वी झाला नाही परंतु तिसरा,चौथा सामना त्याने जिंकून दिला व आयसीसी क्रमवारीत अव्वल स्थानही मिळविले. कर्णधार रोहित शर्मा, रिषभ पंत, हार्दिक पांड्या, संजू सॅमसन, दिपक हुड्डा यांनी झक्कास फलंदाजी केली, मात्र फिनिशरच्या खास भूमिकेत दिनेश कार्तिक एक सामना वगळता फ्लॉपच राहीला. त्यामुळे त्याचे पुढचे भविष्य आता निवड समितीचीच्याच हाती असेल.
गोलंदाजीत बुमराहा, शमी, चहलच्या गैरहजेरीत भुवनेश्वर, अर्शदिप, बिश्नोई, आवेश खान, कुलदिप, हार्दिक व हुड्डा यांनी चमक दाखविली. खास करून डावखुऱ्या अर्शदिपने अतिशय प्रभावी कामगिरी केली. विशेष म्हणजे त्याने खेळलेल्या पहिल्याच पूर्ण पाच सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघाच्या सर्व खेळाडूंपेक्षा त्याची कामगिरी लक्षणीय ठरली. त्याचा लाभ त्याला मालिकावीर खिताब मिळण्यात झाला.
मालिकेच्या शेवटच्या सामन्यात श्रेयस अय्यरला सलामीला धाडण्यात आले. त्याचा अचूक लाभ उठवत त्याने ६४ धावांची शानदार खेळी केली व आगामी आशिया व विश्वचषक स्पर्धेसाठी आपला संघातील दावा भक्कम केला.
अष्टपैलू खेळाडूंच्या प्रकारात हार्दिक पांड्या, अक्षर पटेल व दिपक हुड्डा या तिघांनीही सर्वच क्षेत्रात दमदार कामगिरी करताना संघाच्या यशात मोलाचा वाटा उचलला. हार्दिकने तर शेवटच्या सामन्यात नेतृत्वगुणांची चांगलीच उधळण करत रोहितच्या अनुपस्थितीत भारताच्या विजयाची घडी विस्कटू दिली नाही. आता तर हार्दिक सफेद चेंडूच्या खेळात भारताचा नियमीत उपकर्णधार बनणार आहे अशा बातम्या कानावर येत आहेत.
एकंदर संपूर्ण विंडीज दौऱ्याचा विचार केला तर आगामी मोठया स्पर्धांच्या दृष्टीने भारताने एक प्रयोगशाळा म्हणून उपयोग केला. त्यातील जवळ जवळ सर्वच प्रयोग यशस्वी झाले. परंतु समोरचा विंडीज संघ फारसा प्रबळ व एकजीव नव्हता. त्यामुळे या दौऱ्यात मिळालेल्या मालिका विजयांना फारसे महत्व देण्याची गरज नाही. शिवाय आपल्या तेही संघात याच प्रकारे प्रयोग करून नवीन खेळाडूंना पडताळून पाहत आहेत. त्यामुळे विंडीज विरूध्द मिळविलेले विजय भारताच्या शिरपेचात मानाचे तुरे घालणारे वगैरे असे काही नाही.
थोडेसे आयोजनात विंडीज क्रिकेट बोर्डाकडून झालेल्या काही चुका व त्रुटींबाबतही बघूया. विंडीज म्हणजे वेस्ट इंडिज, हा काही एक स्वतंत्र देश नाही. उदाहरणार्थ बार्बाडोस, जमैका, अँटिग्वा, गयाना, बर्म्युडा, त्रिनिदाद अँड टोबॅगो व इतर काही बेटांचा हा एक समूह असून हे बेटं म्हणजे एक स्वतंत्र देश आहेत. त्या प्रत्येकाचा राष्ट्रपती, पंतप्रधान वेगवेगळे आहे. आर्थिक दृष्ट्या पूर्णतः पर्यटनावर त्यांची अर्थव्यवस्था अवलंबून असते. तरीही ते गरीब या प्रकारातच मोडतात.
हे सर्व देश (बेटं) फक्त क्रिकेट पुरतेच एकत्र येतात. इतर खेळात ते आपले स्वतंत्र संघ खेळवितात. वेस्ट इंडिज हा एक देश नसल्याने त्यांचे राष्ट्रगितही भिन्न भिन्न आहेत. परंतु क्रिकेट सामन्याच्या वेळेस वाजविले जाणारे गित हे विंडीजचे नॅशनल अँथम नसून ते विंडीज क्रिकेट बोर्डाचे गित असते. वेगवेगळ्या विचारांचे हे देश एकत्र आल्याने त्यांच्यात मत भिन्नता असणे साहजिकच आहे. त्याचा सर्वात मोठा फटका त्यांच्या क्रिकेटला बसला.एकेकाळी क्रिकेटची महासत्ता असलेला हा देश मध्यंतरी मृत्यू शय्येवर लेटला होता. नवीन मुलं क्रिकेट ऐवजी इतर खेळांकडे वळू लागले होते. या सर्व प्रकाराला तेथील गलिच्छ राजकारण मोठया प्रमाणावर जबाबदार आहे. यामुळेच तेथील मोठे मोठे क्रिकेटपटू विंडीजकडून खेळण्याऐवजी वेगवेगळ्या लिगमध्ये खेळणे पसंत करतात.
आता याच दौ-याच्या टि-२० मालिकेतील पहिला सामना २९ जुलैला त्रिनिदादला झाला. त्यानंतर दुसरा सामना २ ऑगष्टला सेंट किटसला झाला. या दोन शहरातील अंतर केवळ ७०० किलोमिटर असूनही चार दिवसात सामन्याच्या नियोजीत वेळेपूर्वी खेळाडूंचे क्रिडा साहित्य ( किट ) पोहोचले नव्हते. त्यामुळे सामना तब्बल साडेतीन तास सुरू झाला. त्याचा परिणाम सलग दुसऱ्या दिवशी असणाऱ्या तिसऱ्या टि-२० वरही झाला. तो सामना नियोजित वेळेच्या दिड तास उशीरा सुरू झाला. खेळाडूंचे किट वेळेवर न पोहोचल्यामुळे सामना वेळेवर सुरू न होण्याचा हा क्रिकेट इतिहासातील पहिलाच प्रसंग ठरला. इतकेच नाही तर त्यानंतर अमेरिकेत होणाऱ्या उर्वरीत दोन सामन्यांकरीता दोन्ही संघांचे पारपत्र
(विजा) चार ऑगष्ट पर्यंत आले नव्हते. शेवटी गयाना सरकारच्या मध्यस्थीने ऐनवेळी ते मिळाल्याने अमेरिकेतील सामने निर्विघ्न पार पडले. अन्यथा ते दोन सामने रद्द करावे लागले असते अथवा विंडीजमध्येच खेळावे लागले असते.
विंडीज क्रिकेट बोर्डाकडून अनेक चुका प्रत्येक देशांच्या दौऱ्यात घडत असतात. त्यांच्यासाठी हे नित्याचेच झाले असल्याने याचे त्यांना विशेष दुःखही वाटत नाही. परंतु आपल्यासारखे सच्चे क्रिकेट रसिक त्यांच्या गलथान कारभारामुळे मात्र जाम वैतागतात !
लेखक -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
ग्लोबल वर्कींग कमिटी मेंबर ऑफ डब्ल्यूसीपीए.
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com

