पंधराव्या आशिया चषकाच्या एकूण तिसऱ्या व स्वतःच्य दुसऱ्या सामन्यात जोरदार फॉर्मात असलेल्या अफगाणिस्तानने मंगळवारी रात्री शारजाच्या मैदानावर गत उपविजेत्या बांगलादेशचा सुमडीत फडशा फाडून स्पर्धेच्या मुख्य फेरीत मोठया थाटात प्रवेश केला, व अशी कामगिरी करणारा या सत्रातील पहिला संघ बनला. पहिल्या सामन्यात श्रीलंकेवर एकतर्फी मात करणाऱ्या अफगाणिस्तानने बांगलादेशला सुद्धा थोडीही संधी दिली नाही. खेळाच्या सर्वच क्षेत्रात अफगाणिस्तानने बांगलादेशला नेस्तनाबूत करून आपला सलग दुसरा विजय मिळवित अनपेक्षित रित्या सुपर फोर फेरी गाठली. वास्तविक ब गटातून श्रीलंका व बांगलादेश टॉप फेव्हरीट होते. मात्र अफगाणिस्तानने या दोन्ही संघाचा धोबीपछाड केल्याने आता या दोन संघात होणारा सामना जो जिंकेल तो संघ ब गटातून क्रमांक दोनने सुपर फोरमध्ये सामील होईल.
नाणेफेक जिंकून बांगलादेशने प्रथम फलंदाजी घेतल्यानंतर सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. कारण यापूर्वीच्या दोनही सामन्यात पाठलाग करणारे संघ जिंकले होते. शेवटी बांगलादेशचा निर्णय त्यांच्या अंगलट आलाच ! पूर्ण वीस षटकात ७ बाद १२७ धावाच बांगलादेशचा संघ करू शकल्याने अफगानिस्तान समोर किरकोळ आव्हान होते. ९ चेंडू व ७ गडी राखून विजय मिळवित विजेतेपद मिळविण्याच्या उद्देशाने पुढचे पाऊल टाकले. नजीबुल्लाह जादरान याने अफगानिस्तानकडून सर्वाधिक ४३ धावा काढल्या. प्रथम फलंदाजीस उतरलेल्या बांगलादेशची सुरुवातच खराब झाली. अफगानिस्तानच्या फिरकी गोलंदाजांनी बांगलादेशी फलंदाजांना सळो की पळो करून सोडले. बांगलादेशच्या बाद झालेल्या सात पैकी सहा फलंदाजांना मुजीब उर रहमान व राशिद खान यांनी बाद केले. मुजीबने १६ धावात तीन तर राशिदने २२ धावात तीन बळी मिळवित बांगलादेशच्या फलंदाजांचे काम अवघड केले.
मुजीबने पॉवर प्लेमध्येच बांगलादेशचे प्रमुख फलंदाज एनामुल हक पाच, मोहम्मद नईम सहा, कप्तान शाकिब अल हसन अकरा धावा यांना बाद करून बांगलादेशचे आटेपिटेच बंद केले.त्यांनतर राशिद खानची जादू सुरू झाली, आणि मग त्यातून बांगलादेश शेवटपर्यंत सावरलेच नाही. राशिदने मुशफिकुर रहीम एक, अफीफ हुसेन १२ व महमदुल्लाह रियाज २५यांना बाद केले. मोसद्दक हुसेनने अंतिम टप्प्यात ३१ चेंडूत ४८ धावांची नाबाद खेळी साकारल्याने बांगलादेशल शंभरी गाठता आली. हुसेनच्या सोबत सैफुद्दीन नाबाद राहिला.
मेहदी हसन १४ धावांवर धावबाद बाद झाला.
१२८ धावांचे विजयी लक्ष गाठताना अफगानिस्तानची सुरुवात गचाळ झाली. पहिल्या सामन्यात तडाखेबाज खेळ करणारा सलामीवीर रहमनुल्लाह गुरबाज साकीबच्या गोलंदाजीवर यष्टीचीत झाला. त्यानंतर हजरतुल्लाह जजई व इब्राहिम जादरान यांनी दुसऱ्या गड्यासाठी तीस धावा जोडल्या. हजरतुल्लाह २३ व कर्णधार नबी आठ धावाच करू शकल्याने बांगलादेशच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. शेवटच्या दहा षटकात ८० धावांचे आव्हान अवघड वाटत होते, तेंव्हा बांगलादेशचे गोलंदाज जोशात वाटत होते. शेवटच्या पाच षटकात ५२ धावा हव्या असताना इब्राहिम व जादरान मैदानात होते. त्यानंतर त्या दोघांनी गियर बदलत १८.३ षटकातच लक्ष पार केले. इब्राहिमने ४१ चेंडूत चार चौकार मारून ४२ तर नजीबुल्लाह जादरानने १७ चेंडूत ६ षटकार व एक षटकार ठोकत नाबाद ४३ धावांची आतिषी खेळी साकारत अफगाणिस्तानला मोठा विजय मिळवून दिला.
या स्पर्धेत अफगाणिस्तानने जोरदार खेळ करून आपल्यापेक्षा सरस मानांकनाच्या दोन कसोटी खेळणाऱ्या संघाना पराभूत केल्याने त्यांच्यात वेगळाच संचार आला आहे. सुपर फोरमध्ये त्यांनी असाच खेळ केला तर भारत व पाकिस्तानसाठी तो मोठा धोका ठरू शकतो. तेंव्हा बघूया पुढे काय होते, घोडा मैदान जवळच आहे.
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
ग्लोबल वर्कींग कमिटी मेंबर ऑफ डब्ल्यूसीपीए.
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com

