चांगल्या मित्रसंगतीने सकारात्मक बदल घडून येतात - सुधाकर यार्लगड्डा
प्रतिनिधी : आसावरी वायकर
नगर : २५ / राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या निर्देशानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अहमदनगर, प्रियदर्शनी पब्लिक स्कूल व महाविद्यालय, अहमदनगर, अहमदनगर बार असोसिएशन अहमदनगर, अहमदनगर व सेंट्रल बार असोसिएशन, अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने अमलीपदार्थांचे सेवन, त्यातील पिडीतांचे अधिकार व उपायोजना, बालकांचे शोषण आणि रस्ता सुरक्षा नियम या विषयी कायदेविषयक जनजागृती कार्यक्रम साजरा करण्यात आला.
माननीय प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, अहमदनगर श्री सुधाकर यार्लगड्डा यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात चांगल्या सवयी असलेले आपले मित्र आपल्यामध्ये सकारात्मक बदल घडवून मानसिक आधार देतात वाईट सवयीच्या मित्रांच्या संगतीमुळे आपली अधोगती होते, हा मुद्दा मांडला. त्यांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत राबवित असलेले कार्यक्रम चालू असलेल्या विविध योजना व उपक्रम याची माहिती उपस्थितांना दिली.
या कार्यक्रमांमध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी कमलाकर जाधव व सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री कैलास वाघ यांनी वाहतुकीबाबतचे नियम उपस्थित विद्यार्थ्यांना समजून सांगितले. सदर कार्यक्रमांमध्ये शाळेतील विद्यार्थिनी ऋतुजा लांडगे हिने आपले प्रश्नरुपी निर्भीड विचार अतिथीसमोर मांडले. त्यावर भाष्य करताना माननीय श्री सुधाकर यार्लगड्डा साहेब यांनी विद्यार्थ्यांना बालकांच्या मदतीसाठी असलेल्या शासकीय टोल फ्री क्रमांक १०९८ वर अडचणीच्या वेळेस संपर्क साधावा असे आव्हान केले. तसेच आपल्याला कायदेविषयक मदतीसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, अहमदनगर हे कायम तत्पर आहे विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी भेट देऊन विविध उपक्रमांची माहिती घ्यावी असे सांगितले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये श्रीमती भाग्यश्री का. पाटील, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांनी विद्यार्थ्यांमध्ये चांगले स्पर्श व वाईट स्पर्श याबद्दल मार्गदर्शन करून मोकळेपणाने आई-वडिलांसमोर, शिक्षकांसमोर व्यक्त व्हा, आपल्या अडचणी सांगा असे आव्हान केले.
यावेळी शाळेतील विद्यार्थ्यानी रस्ते नियमांबाबत उत्कृष्ट पथनाट्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती तबस्सूम शेख यांनी केले व आभार प्रदर्शन श्रीमती तेजल ढमाले यांनी केले. सदर कार्यक्रमास प्रियदर्शनी पब्लिक स्कूलच्या प्राचार्या अंजली बोधक, अहमदनगर बार असोसिएशनचे सदस्य श्री समीर पटेल, सेंट्रल बार असोसिएशनचे उपाध्यक्ष श्री फारुख शेख, सर्व शिक्षक कर्मचारी वृंद, विद्यार्थी तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे कर्मचारी उपस्थित होते.

