अखेर विंडीज दौऱ्यात भारताची विजयी मालिका खंडीत झालीच. भारताने वेस्ट इंडिज दौऱ्यावर वनडे मालिका निर्भेळ यश मिळवत जिंकली तर टि२० मालिकेतही विजयानेच सुरुवात केली. त्यामुळे भारताचा संघ व त्यांच्या समर्थकांना आकाश ठेंगणे झाले होते. टिम इंडिया जागतिक क्रिकेटमधील टॉप क्लास टिम बनल्याचे चित्र सर्वच प्रसार माध्यमात तेल मीठ लावून रंगविले जाऊ लागले. यजमान वेस्ट इंडिजला तर सर्वांनीच हलकटात जमा केले होते. मात्र सोमवारी रात्री नियोजित वेळेपेक्षा तीन तास उशीरा झालेल्या या सामन्यात विंडीजने भारताच्या गर्वाचा फुगा व भ्रमाचा भोपळा फोडून सर्वांनाचा आपापली जागा दाखवून मालिकेत बरोबरी साधून ' हम भी कुछ कम नही ' हे समस्त क्रिकेट जगताला दाखवून दिले.
त्रिनिदादहून सेंट किटसला भारतीय संघाचं क्रिडा साहित्य यायला वेळ लागल्याने सामना उशीरा सुरू झाला. परंतु यावेळी नाणेफेकीपासूनच प्रत्येक बाब भारताच्या विरोधात जायला सुरुवात झाली. संघात ईशान किशन व ऋतूराज गायकवाड सारखे निष्णात सलामीवीर हजर असताना त्यांना डावलून संघ प्रबंधन सातत्याने नवनवीन प्रयोग करत आहेत. मधल्या फळीत उत्कृष्ठ खेळाने जम बसविले त्या सुर्यकुमार यादवला पहिल्या सामन्यात सलामीला पाठवून अपयशी ठरल्यानंतर तीच चूक रोहित- द्रविड जोडीने पुन्हा केली. त्याचा मोठा फटका टिम इंडियाला बसला. कर्णधार रोहित सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर गोल्डन डकचा बळी ठरला. तर सुर्यकुमार यादव या सामन्यातही अपयशी ठरला.
भारतात नुकत्याच झालेल्या द. आफ्रिके विरूध्दच्या मालिकेत मालिकावीर ठरलेल्या ईशान किशनला आयर्लंड इंग्लंड व विंडीजमधील पाच सामन्यात संघाबाहेर ठेवून टिम मॅनेजमेंटला काय साधायचे आहे ? किशन डावखुरा सलामीवीर असल्याने रोहित व त्याची डावी उजवी जोडी संघासाठी फायद्याची व प्रतिपक्षासाठी डोकेदुखी ठरत असताना द्रविड व रोहीत नेमकं त्याला डावलून काय सिद्ध करत आहेत ?
तिच बाब दिपक हुडा या फॉर्ममध्ये असलेल्या अष्टपैलू खेळाडू बाबत घडत आहे. ती केवळ दिनेश कार्तिकला संघात घेण्यासाठी. सदवतीस वर्षांचा कार्तिक आयपीएलमध्ये यशस्वी झाला म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावरही सातत्याने यशस्वी होण्याची खात्री नाही. हे त्यानेच या सामन्यात अपयशी ठरवून सिध्द केले असताना केवळ त्याला खेळविण्यासाठी नवोदित व होतकरू ईशान किशन व दिपक हुडाला सडविले जात आहे. आता तरी येथून द्रविड रोहीत जागे होतील व योग्य त्या खेळाडूंना खेळवून संघाची विस्कळीत होत असलेली घडी पुन्हा ठिक करतील.
विंडीज विरूध्दच्या दुसऱ्या टि-२० सामन्यात डावखुऱ्या वेगवान गोलंदाजांसमोर खेळण्याची भारतीय फलंदाजांची कमजोर बाजू पुन्हा जगासमोर आली.ओबेद मकाय या डावखुऱ्या गोलंदाजांने भारतीय फलंदाजांच्या याच कमकुवत दुव्यांचा लाभ उठवित अवघ्या १७ धावात ६ गडी बाद करून १३८ धावांवरच भारताचा डाव संपविला.
सेंट किट्स येथील बासेतेरा स्टेडियमवरील खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना मदत करत होती. चेंडू वेगाने उसळत असले तरी बॅटवर चांगल्या पैकी येत होते. परंतु त्यावेळी भारतीय फलंदाजांनी चेंडूला केवळ दिशा देण्याची गरज होती मात्र अति हुशार भारतीय फलंदाज त्या चेंडूंना जोराने मारून मैदानाबाहेर फेकण्याचा आततायीपणा करत होते. त्याचा फटका त्यांचे बाद होऊन संघाच्या धावा कमी होण्यात, गोलंदाजांना धावांचे आवश्यक पाठबळ न मिळाल्याने एका लाजिरवाण्यात पराभवात झाले.
भारताचा कर्णधार रोहित शर्मा पहिल्याच चेंडूवर शुन्यावर बाद झाला. त्या धक्क्यातून भारतीय संघ शेवटपर्यंत सावरलाच नाही. एरव्ही कर्णधार म्हणून मैदानात सातत्याने यशस्वी ठरणाऱ्या रोहितच्या काही चाली समजण्या पलिकडच्या होत्या. खेळपट्टी जलदगती गोलंदाजांना सहाय्य करतेय, विरोधी नवोदित गोलंदाज ओबेड मकाय प्रभावी ठरत असताना आपला हुकमी एक्का भुवनेश्वर कुमारला पुर्ण कोटा गोलंदाजी देणे गरजेचे होते. त्याला केवळ दोन षटके गोलंदाजी दिली. शिवाय भुवनेश्वर सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे व या खेळपट्टीचा अचूक फायदा घेण्याची त्याची क्षमता असताना त्याला गोलंदाजी न देता मार खाणाऱ्या गोलंदाजाना गोलंदाजी देणे संघासाठी मारक ठरले.
भारताचा कोणताच फलंदाज जबाबदारीने खेळला नाही. प्रत्येकाने साहसी फटके मारण्याच्या नादात बळी गमावले. रिषभ पंत टि२० .मध्ये इतक्या वर्षात एकही सामना जिंकून देणारा डाव खेळलेला नसताना त्याला वारंवार संधी देणे, ईशान किशनला डावलणे, श्रेयस अय्यर आखूड टप्प्याच्या चेंडूवर लोंबकळतो हे जग जाहीर झालेले असताना त्यालाच खेळविणे, दिपक हुड्डा, संजू सॅमसन यांना टाळणे संघासाठीच घातक ठरत असताना प्रयोगावर प्रयोग सुरू आहेत.
मानाची आशिया चषक स्पर्धा, टि२० विश्वचषक स्पर्धा तोंडावर आल्या असताना आता तरी प्रयोग थांबवून नियमित खेळाडूंना योग्य जागेवर खेळविले पाहिजे. याच चुका सन २०१९ वनडे विश्वचषक, सन २०२१ टेस्ट चॅंपियनिशिप फायनल, सन २०२१ च्या टि२० विश्वचषक स्पर्धेत झाल्या आहेत. त्या आता थांबवून विजयाचे समिकरण जुळवून टिकविणे गरजेचे आहे.
शिवाय मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड व फलंदाजी कोच विक्रम राठोडने भारतीय फलंदाजाचा कच्चा दुवा असलेला डावखुरी वेगवान गोलंदाजी खेळण्याच्या चुकांवर काम करणे महत्वाचे आहे. यावर त्यांनी झटपट तोडगा काढावा. अन्यथा इतर संघ या त्रुटींचे भांडवल करून भारताला कोपऱ्यात ढकलतील व समस्त भारतीयांचे विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न स्वप्नच राहिल.
लेखक -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
ग्लोबल वर्कींग कमिटी मेंबर ऑफ डब्ल्यूसीपीए.
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com

