*"एक राखी सैनिकासाठी "*
विद्या प्रतिष्ठान , भिगवण शाळेतील विद्यार्थ्यांचे अनोखे स्नेहबंधन ..
इंदापूर- भिगवण प्रतिनिधी: देशभरात विविध सण, उत्सव साजरे होत असताना देशाच्या सीमेवर लढणाऱ्या सैनिकांना मात्र कुठलाही सण नाही की उत्सव नाही, देशाचे रक्षण करणे हे एकच ध्येय त्यांच्यासमोर असते. देशात रक्षाबंधन हा सण आनंदात व उत्साहात साजरा होत असताना याचेच औचित्य साधत भिगवण येथील विद्या प्रतिष्ठान इंग्लिश मिडियम स्कूलमधील विद्यार्थिनींनी सीमेवरील सैनिकांना राखी पाठवून 'सैनिकहो तुमच्यासाठी' अशी भावना व्यक्त करत आम्ही तुमच्या सोबत आहोत हे दाखवून दिले. शाळेतील विद्यार्थ्यांनी रेशीम धाग्याच्या अतिशय सुंदर, सुबक राख्या तयार केल्या . याचबरोबर त्यांनी सैनिकांप्रती प्रेम, कृतज्ञता व आदर शब्दांच्या माध्यमातून व्यक्त करण्यासाठी राख्यांसोबत पत्र लिहून पाठवले. पोस्ट सर्व्हिसच्या माध्यमातून या राख्या आणि पत्र सीमेवरील सैनिकांपर्यत पोहोचवले जाणार आहे. अशाप्रकारे 'एक राखी सैनिकासाठी सीमेवरील भावासाठी .. ' अशी स्नेहबंधनाची परंपरा विद्यार्थ्यांनी चालू ठेवली.
हा अनोखा उपक्रम शाळेच्या प्राचार्या सरिता शिंदे यांच्या मार्गदर्शनखाली तसेच शिक्षिका सौ. दीपा भोईटे , क्रांती गायकवाड , जोत्स्ना पाटील व इतर शिक्षकांच्या सहकार्याने यशस्वीपणे पार पडला.

