शिर्डी एक्सप्रेस लाईव्ह नेटवर्क
“स्वातंत्र्य स्वातंत्र्य कशात आहे रे, रोठी मागेल त्याला बंदूक आहे रे” ह्या संभाजी भगत ह्याच्या गाण्यातील लाईन ह्या भटक्या विमुक्तांच्या जणु व्यथा मांडणाऱ्याच आहे. भारतीय स्वतंत्र्याच्या लढ्यात फंडिंग किंवा ससंधाने गोळा करायची खरी जबाबदारी ती इंग्रजांना लुटून ती साधने ही स्वातंत्र्य लढयासाठी मिळवून देणारी लढवई जमातींना इंग्रजांनी गुन्हेगार जमाती ठरविले. इंग्रज राजवटीविरुद्ध लढणाऱ्या चोरी करणे, डाका घालणे, इंग्रजाचा दारू गोळा पळवण्याची, इंग्रजांच्या सैनिकांनी गनिमी काव्याने मारण्याची प्रवृत्ती असणारी १९८ जमातींना सन १८७१ मध्ये गुन्हेगार जमाती असा शिक्का मारून जन्माला येणारा माणूस हा जन्मजात गुन्हेगार असा कायद्याने जाहीर करून असा क्रूर कायदा इंग्रजांनी लागू केला.
गुन्हेगार म्हणून नोंद झालेल्या व्यक्तीची रजिस्टर्ड नोंद होत असे, ज्या गावाशेजारी त्यांचा तांडा असायचा त्या गावातील पाटलाकडे त्यांची नोंद करावी लागत असे. फक्त व्यक्तीची नाही तर त्याच्याकडे असणारे जनावरे ह्यात शेळ्या, कोंबड्या, भांडी, कुंडी ह्यांची त्या दप्तरात नोंद करावी लागत होती. नुसत नोंद करून भागत नव्हते तर रात्री निम्मारात्री हजेरी द्यावी लागत. एका गावाजवळ तांडा तीन ते चार दिवसापेक्षा जास्त ठेवता येत नसे. निरक्षर आणि अडाणी असल्याने दिवस आणि वेळ लक्षात नसणारे शारिरीक शिक्षेस पात्र व्हावे लागत. गाव सोडताना त्या गावातील पाटलाचा दाखला घेवून पुढील गावाजवळ जिथे तांडा पोहचत तिथे जवळील गावात पोलीस पाटलाकडे द्यावे लागत. ह्या कायद्याने फक्त त्यांचा शारीरिक नाहीतर त्यांना सामाजिक आणि मानसिक अन्याय त्यांना सहन करावा लागत.
लक्ष्मण गायकवाड ह्यांनी 'विमुक्ताचे स्वातंत्र्य' ह्या पुस्तकात गुन्हेगार जमातीच्या अन्याय अत्याचाराबद्द्ल सांगताना सांगितले कि, इंग्रजांना गुन्हेगार जमातीच्या लोकांना कायदा करून देखील त्यांच्या इंग्रजाच्या विरोधात बंड केल्याशिवाय ह्या जमाती राहत नव्हत्या, तर त्यांनी १९१३ साली एक कल्पना आणली महाराष्ट्रातील गुन्हेगार जमातींना आपल्या कुटुंबासह मुलाबाळांना जहाजात भरून समुद्राच्या पाण्यात बुडवून मारण्याचा कट रचण्यात आला होता. हे इंग्लडच्या राणीला कळले तीने काही ख्रिश्चन मिशनरीतील काही लोकांना गुन्हेगरी जमातीच्या सामाजिक सुधारणा बद्दल विचारणा केली तेव्हा त्यांना पाण्यात बुडवून मारणे हे येशुना मान्य होणार नाही हे सांगितल्यानंतर त्यांना मारून न टाकण्याएवजी त्यांना कारागृहात टाकून त्यांना हाताला काम देवून त्यांना सेटल करावे, यासाठी १९१३ मध्ये जन्मत: गुन्हेगार जमातींसाठी
खुले कारागृह अस्तित्वात आले. हे खुले कारागृहात १४ तास काम करावे लागत आणि तीन वेळा हजेरी एकरभर ह्या कारागृहाला बाजूने मोठी असे तारेचे कुपन बांधलेले होते.
हा असा क्रूर कायदा भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर ३१ ऑंगस्ट १९५२ रोजी तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते सोलापूर येथे कुंपणाच्या तारा तोडून या गुन्हेगार जमातींना विमुक्त करण्यात आले. कागदोपत्री त्यांची गुन्हेगारीची नोंद पुसून टाकली. मात्र आजही तो कायद्याचा कलंक ह्या जमातीना मुख्यप्रवाहात येवू देत नाही. आज ही कुठेही चोरी दरोडा झाल्यानतर संशयित म्हणून भटक्यांना विमुक्तांच्या पालावार जडती घेतली जाते. केसेसमध्ये खरे गुन्हेगार सापडत नाही म्हुणून अटक केली जाते. मागील वर्षी जयभीम ह्या चित्रपटातून भटक्या विमुक्त तश्या तत्सम एका जातीचे घडलेली घटना दाखवण्याचा प्रयत्न एका दिग्दर्शकांनी केला. देशाला स्वातंत्र्य मिळवून आज ७५ वर्षे पूर्ण झाले आजही भटके विमुक्त हे मुलभूत सुविधा पासून वंचित आहे. नागरिकत्वाचा मुद्दा असेल, शिक्षणाचा , शासकीय योजनाचा लाभ असेल, अन्न ,वस्त्र, निवारा ह्या पासून वंचित असलेला दिसून येतो. भारत देश स्वातंत्र्याची ७५ वर्षी देशाच्या अमृत महोत्सव साजरा होत असताना इथल्या भटक्या विमुक्तांनच्या सामाजिक,आर्थिक,राजकीय,शैक्षणिक सुरक्षा भटक्या विमुक्तांना केव्हा मिळेल ?अर्थात खरे स्वातंत्र्य हे कधी मिळेल?
हीच खरी भटक्या विमुक्तांची समस्या अनुत्तरित आहे.

