भाऊसाहेब वाकचौरे अकोले:
निळवंडे धरणाच्या डाव्या, उजव्या सहित उच्चस्तरीय कालव्यातून २०२३ साली शेतकर्यांना पाणी देणार आहे. निळवंडे धरणाचे कामाला भाजप -सेना सरकार असतांना गती मिळाली. मात्र महाविकास आघाडी सरकारच्या काळात निळवंडे धरणाच्या कालव्यांना निधी मिळू शकला नाही. निळवंडे चे खरे श्रेय मधुकरराव पिचड यांना आहे असे प्रतिपादन महसुलमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले आहे.
महाराष्ट्र राज्याच्या महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध विकासमंत्री पदी ना.राधाकृष्ण विखे पाटील यांची निवड झाल्याबद्दल भारतीय जनता पार्टी अकोलेच्या वतीने त्यांचा भव्य नागरी सत्कार व शेतकरी मेळावा पंकज लॅान्स येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी ना.विखे बोलत होते. अध्यक्षस्थानी राज्याचे माजी मंत्री मधुकरराव पिचड होते. व्यासपीठावर मा.आ.वैभवराव पिचड, नगराध्यक्षा सोनालीताई नाईकवाडी, ज्येष्ठ शेतकरी नेते दशरथ सावंत, साै. हेमलताताई पिचड, जि.प.सदस्या साै. सुषमा दराडे,बी.जे.देशमुख, जालिंदर वाकचाैरे, गिरजाजी जाधव, शिवाजीराजे धुमाळ, भाजपा तालुकाध्यक्ष सीताराम भांगरे, उपनगराध्यक्ष बाळासाहेब वडजे, एटीएस अध्यक्ष सुनिल दातीर, रावसाहेब वाकचाैरे उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना ना.विखे म्हणाले कि निळवंडे कालव्याचे पाणी कोपरगांव, संगमनेर च्या जिरायत भागाला मिळणार आहे त्यामुळे अकोलेतील शेतकऱ्यांचा त्याग कायम लक्षात राहील. मागील अडीच वर्षातील महावसुली सरकारला सर्वांचा विसर पडला होता. कोवीड संकटकाळात काय केले या सरकारने, अकोलेतील लोकं कोवीड काळात मरत असताना काय केले, याउलट देशाचे नेते पंतप्रधान नरेद्र मोदीनी संपूर्ण देशासाठी निर्णय घेतला व संपूर्ण देशातील जनतेला मोफत लसीकरण केले. कोवीड काळात, दुकान, व्यवसाय, नोकरी बंद होऊन लोक घरात बसलेले असताना दोन वर्ष सर्वाना मोफत धान्य दिले. दुसरीकडे हे महावसुली सरकार ज्याचा आतंकवादी संबंध असणारा मंत्री अन दुसरा रोज उठून भुकणारा नेताही आज जेल मध्ये गेला आहे. यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर खते देण्याएवजी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन लाईट कट केली. शेतकऱ्यांचे विज दर कमी करण्याएवजी दारु चे दर कमी केले. आता ना.एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांचे जनतेच्या मनातील सरकार आले आहे, शेतकऱ्यांची जाणीव असलेले सरकार आहे. शेतकऱ्याचे पशुधनावर लंम्पीचे संकट आले राजस्थान राज्यात ६२ हजार जणावरांचा मृत्यू झाला मात्र महाराष्ट्र राज्यात १०० च्या वर जनावरांच्या मृत्यूचे प्रमाण जावू दिले नाही.देशाचे पंतप्रधान नरेद्र मोदींची जगात लाट आहे, जगातील देश मोदींचा संन्मान करत आहे,मोदी साहेबांमुळे पहिल्यांदा आदिवासी महिलेला राष्ट्रपती होण्याचा बहुमान मिळाला.
निळवंडे च्या डाव्या व उजव्या कालव्याने जानेवारी महिन्यात पाणी देवु.या कालव्याचे पाणी सोडण्याचे उदघाटन देशाचे पंतप्रधान नरेद्र मोदी साहेबांच्या हस्ते करण्याचा प्रयत्न करु. आपण जिल्हाधिकारीना सुचना केल्या आहेत अकोले तालुक्याच्या विकासाचा आराखडा तयार करा. यातून तालुक्यात पर्यटन, रोजगार, उद्योग व्यवसाय वाढेल तरूणांच्या हाताला काम मिळेल आदीवासी शेतकरी सुजलाम सुफलाम् होईल.
अगस्ती सहकारी साखर कारखान्याची काळजी करु नका. जिल्हा बॅकेने पैसे दिले तर कुणी घरातून पैसे दिले नाही याचा आव कुणी आणु नये.सरकार कडून कारखान्यांना मदतीसाठी निधी दिला जातो राज्यात व केंद्रात सरकार आपले आहे त्यामुळे काळजी करु नका आम्ही वैभवराव पिचड यांच्यामागे भक्कम उभे आहोत आम्ही आमचे काम करु सभासदांनो तुम्ही तुमची जबाबदारी पार पाडा व निर्माण करणाऱ्याचे हाती कारखाना द्या असे आवाहन केले.
माजी आ.वैभवराव पिचड म्हणाले राज्यात मागील आडीच वर्षात कसलेही काम झाले नाही, शेतकऱ्यांना कुठलीही मदत मिळाली नाही उलट राज्याचे महसूलमंत्रीपद घेतल्यानंतर ना.राधाकृष्ण विखे यांनी शेतकऱ्यांपर्यत शासनाच्या योजना पोहचविण्याचे काम केले. एकीकडे अतिवृष्टी व दुसरीकडे लम्पी आजाराने शेतकरी संकटात असताना शेतकऱ्यांना मदत देण्याचे काम ना.विखे व हे सरकार करत आहे.
यावेळी माजी मंत्री मधुकरराव पिचड म्हणाले की आम्ही निवडणुकीत २५ ग्रामपंचायतचा दावा केला आज व्यासपीठावर त्यात २ वाढ होऊन २७ ग्रामपंचायत सरपंचाचा सत्कार केला आम्ही पैसे देवून बातम्या देत नाही विरोधक खोटे दावे करत आहे ही निवडणूक ठरावाची व पैसे वाटण्याची निवडणूक नाही.ही मैदानात उतरून लढण्याची निवडणूक आहे आणि आपण मैदानात उतरुनच येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समितीसह सर्व निवडणूक लढवू व त्यात जिंकुही असा विश्वास व्यक्त केला.
स्वागत व प्रास्तविक सरचिटणीस यशवंत अभाळे यांनी,सुत्रसंचलन सरचिटणीस भाऊसाहेब वाकचाैरे यांनी तर आभार भाजपा तालुकाध्यक्ष सीताराम भांगरे यांनी मानले यावेळी राहुल देशमुख, शंभू नेहे, नगरसेवक शरद नवले,विजय पवार,मोहसिन शेख,सागर चाैधरी,सुशांत वाकचाैरे, सह मोठ्या संख्येने शेतकरी व कार्यकर्ते उपस्थित होते.
ना.राधाकृष्ण विखे महसूलमंत्री झाल्यानंतर आपण जसे संगमनेर तालुक्यातील अवैध व्यवसायाचे मुसक्या आवळल्या तश्याच आमच्या अकोले तालुक्यातीलही अवैद्य व्यवसायाला जरब बसवा अशी मागणी मा.आ.वैभवराव पिचड यांनी केली.

