शौकतभाई शेख श्रीरामपूर :
उच्च विद्याविभूषित विद्यार्थी हे आपले भूषण असून श्रीरामपूरातील चैतन्य विलासराव जोशी यांनी अमेरिकेत २०१७ पासून जी शैक्षणिक प्रगती केली. ही बौद्धिकप्रगती आजच्या पिढीला चैतन्यदायी आहे,तसेच इंग्लडला उच्च शिक्षणासाठी जाणारे संग्राम भाऊसाहेब गायधने यांचे विशेष कौतुक आहे असे विचार सांगली जिल्ह्यातील तासगांव येथील रयत शिक्षण संस्थेचे सेवानिवृत्त प्रा.डी.ए. माने यांनी व्यक्त केले.
येथील शिरसगांव स्थित इंदिरानगर मधील माजी प्राचार्य डॉ. शंकरराव गागरे यांच्या वाचनालयात अमेरिकेत शैक्षणिक गुणवत्ता प्राप्त करून स्वावलंबी स्वरूपाने प्रगती केलेले चैतन्य विलासराव जोशी आणि इंग्लड येथे शिक्षण घेण्यासाठी जात असलेले संग्राम भाऊसाहेब गायधने यांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता, या कार्यक्रमात प्रा. माने यांच्या हस्ते चैतन्य जोशी यांचा सत्कार करण्यात आला.तसेच संग्राम गायधने यांना शुभेच्छा दिल्या. त्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.डी. ए. माने बोलत होते. अध्यक्षस्थानी ऍड.रावसाहेब शिंदे प्रतिष्ठानचे चेअरमन माजी प्राचार्य टी. ई. शेळके होते.प्रारंभी पदमभूषण डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील आणि रयत माऊली स्व.सौ.लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
या सोहळ्यास सौ.नंदाताई गागरे, प्राचार्य डॉ. गागरे,विलासराव जोशी, सुखदेव सुकळे, प्रा.शिवाजीराव बारगळ, प्रा.डॉ.बाबुराव उपाध्ये, आरोग्यमित्र भीमराज बागुल, पत्रकार बाबासाहेब चेडे आदी उपस्थित होते.त्यांनी चैतन्य जोशी,संग्राम गायधने यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. प्राचार्य डॉ. शंकरराव गागरे यांनी स्वागत, प्रास्ताविक केले. पाहुण्यांचा सत्कार केला. डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. प्रा.माने यांनी चैतन्य जोशी, संग्राम गायधने यांचा आदर्श भूषणावह असल्याचे सांगितले. श्रीरामपूरनगरी ही माझ्या जीवनातील अमृतनगरी आहे.१९७७ ते १९८१ या काळात बोरावके कॉलेजमध्ये मराठी विषयांचे अध्यापन करताना मला खूप छान अनुभव आले.मी बोरावके कॉलेजमध्ये होतो, त्या काळातील माझे आदर्श विद्यार्थी बाबुराव उपाध्ये हे परिश्रमातून शिकले,पोरके म्हणून जगले, अनेकांची हरेक कामे केली.आता ते मराठीचे लेखक, प्राध्यापक झाले आणि सेवानिवृत्त होताना त्यांनी बोरावके कॉलेज गेटसाठी आपलेपणाने ऋणानुबंध जपत ०२ लाख ५१ हजार रुपयाची देणगी दिली, हे प्राचार्य डॉ.शिंदे यांच्याकडून ऐकल्यावर विशेष आनंद वाटला,डॉ.उपाध्ये यांचे हे योगदान, प्रेरणादायी आणि कौतुकास्पद आहे.बोरावके कॉलेजचे पहिले प्राचार्य उणउणे यांचे चरित्रलेखन करताना मला श्रीरामपूरला यावे लागले. यानिमित्ताने प्राचार्य डॉ.के.एच. शिंदे यांचे खूपच सहकार्य लाभले. श्रीरामपूर येथे अनेकांनी सत्कार केले, उपक्रम घेतले, त्याबद्दल प्रा. माने यांनी आनंद व्यक्त केला. आता श्रीरामपूर खूप बदलले आहे,
प्रगती खूप झाली आहे. ४१ - ४२ वर्षांनी मी श्रीरामपुरात आलो आहे,येथील माणसे माणुसकी संपन्न आहेत.ही कर्मवीर विचारांची प्रचिती येथे जाणवली आहे.असे सांगून जोशी, गायधने तसेच गागरे परिवाराचे त्यांनी कौतुक केले. प्राचार्य शेळके यांनी अध्यक्षीय भाषणातून चैतन्य जोशी हे हुशार आणि संस्कारी व्यक्तिमत्व आहे. त्यांचे वडील विलासराव जोशी हे आदर्श पालक आहेत. त्याबद्दल कौतुक केले.संग्राम भाऊसाहेब गायधने हे शिक्षण घेण्यासाठी इंग्लडमध्ये जात आहेत, त्याबद्दल शुभेच्छा दिल्या.डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी सूत्रसंचालन केले तर आरोग्यमित्र भीमराव बागुल यांनी आभार मानले.

