shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

संघ निवडीतील घोळ कायम ; टिम इंडियाची आशिया चषकात उडाली भंबेरी !


          अवघ्या महिनाभरावर टि२० विश्वचषक स्पर्धा आली असता तिची तयारी म्हणून आशिया चषक स्पर्धेकडे बघितले जात होते. मात्र या स्पर्धेत ज्या रितीने सुरुवात झाली अगदी त्याच्या विपरीत शेवट होत आहे. वास्तविक आशिया चषकाचा संभाव्य विजेता म्हणून भारताकडे सर्वच जण बघत होते. मात्र विद्यमान भारतीय संघ आशिया चषक जिंकण्याच्याच लायकीचा नसल्याचे सकृतदर्शनी सिद्ध झाले आहे. यावरून विश्वचषक जिंकण्याचे तर दूरच !
            गट साखळीत पाकिस्तानवर रडतखडत विजय मिळाला तर नवख्या हॉंगकॉंगवर मिळविलेल्या विजयात जराही सफाईदारपणा नव्हता. तरी सुपर फोरमध्ये संघ पोहोचल्याने त्यावर कोणीही विशेष भाष्य केले नाही. मात्र त्यानंतर सुपर फोरमध्ये पाकिस्तान विरूध्द चांगल्या सुरूवातीनंतर मधल्या फळीतील फलंदाजांनी गुडघे टेकले तर गोलंदाज हतबल ठरल्याने पाकने बाजी मारली.
             दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेला हरवून भारत आपले विजय अभियान पुन्हा सुरू करेल अशी अपेक्षा असताना टिम इंडियाच्या संघ प्रबंधन, कर्णधार, फलंदाज, गोलंदाज, यष्टीरक्षक, क्षेत्ररक्षक यांनी अक्षरशः क्रिकेटचा पोरखेळ करून टाकला.
             एक रविंद्र जडेजा जायबंदी होऊन संघाबाहेर गेला आणि संघाची घडीच विस्कळीत झाली. एका खेळाडूची जागा भरून काढण्याच्या नादात तीन तीन बदल करावे लागत आहेत आणि कोणाकडून काय करवून घ्यायचे हे कर्णधाराला समजायलाच तयार नाही. सामन्यानंतर होणाऱ्या पत्रकार परिषदेत कर्णधार व कोच थातूर मातूर उत्तरं देऊन भारतीय क्रिकेट रसिंकाच्या भावनांचा चक्काचूर करतात.
             श्रीलंकेविरूध्दच्या सामन्यात नाणेफेकीचा कौल भारताच्या विरोधात गेला आणि लंकेने भारताला फलंदाजीस पाचारण केले तेंव्हाच सर्वांच्या मनात शंकेची पाल चुकली होती. कारण श्रीलंकेने मागचे दोन्ही सामने मोठ्या लक्षाचा पाठलाग करताना लिलया जिंकले होते आणि प्रत्यक्षात झालेही तसेच. भारताने दिलेले १७४ धावांचे लक्ष लंकेने सहा गडी राखून साध्य केले व अंतिम फेरीतील आपले स्थान जवळ जवळ पक्के केले.
             गेल्या अनेक वर्षांपासून प्रतिपक्षाची डावखुरी वेगवान गोलंदाजी भारताची डोकेदुखी ठरत आहे, त्याचा प्रत्यय या सामन्यातही आला. आपला केवळ चौथाच टि २० आंतरराष्ट्रीय सामना खेळणाऱ्या डावखुऱ्या दिलशान मधुशंकाने नेमक्या भारताच्या याच दुखऱ्या नसेवर घाव घालताना आपल्या कोट्याच्या चार षटकात केवळ २४ धावा देत तीन पट्टीचे भारतीय फलंदाज बाद करून भारताला मोठा धक्का दिला. विराट कोहलीचा उडविलेला त्रिफळा त्याचा क्लास दाखवून गेला तर रिषभ पंत व दिपक हुड्डाची तारांबळ उडवली.
             भारतीय संघ व्यवस्थापन अंतिम अकरा जणांचा संघ निवडताना मोठा घोळ घालण्याची आपली परंपरा जपत असल्याचे पुन्हा दिसून आले. टि२० च्या लायकीचा खेळाडू नसलेल्या रिषभ पंतला  वारंवार संधी दिली जात आहे व तो त्यात सातत्याने अपयशी ठरत आहे. यष्टीरक्षणातही त्याने अनेक चुका केल्या व सामन्याच्या निर्णायक क्षणी तीन स्टंप समोर दिसत असतानाही
त्याला निशाणा साधता न आल्याने भारताला स्पर्धेतूनच गाशा गुंडाळण्याची वेळ आली आहे. तर खास फिनिशर असलेल्या दिनेश कार्तिकला संघात निवडलेच नाही. पंतच्या तुलनेत यष्टीरक्षणात कार्तिक उजवा तर आहेच शिवाय तो सध्या चांगल्या फॉर्मातही आहे.
             मधल्या फळीत धावा बनवित असलेल्या दिपक हुड्डाला फिनिशरचा रोल दिला त्यात तो फेल गेला. संघात सहावा गोलंदाज म्हणून ऑफस्पिनर हुड्डा निवडला असताना व इतर गोलंदाज पिटले जात असताना त्याला गोलंदाजी न देणे चक्रावून टाकणारेच आहे. पाकिस्तानविरूध्द अशीच परिस्थिती असताना हुड्डाला गोलंदाजी न दिल्याने देशभरातून टिकास्त्र सुटले असतानाही द्रविड -रोहितच्या डोक्यात हि गोष्ट घुसलीच नाही. याचा परिणाम भारताचे स्पर्धेतून बाद होण्यात झाला आहे. हुड्डाला संघात घेवून सडवायचे होते तर जखमी जडेजाच्या जागेवर स्थान मिळविलेल्या अक्षर पटेलला डावलून द्रविड -रोहित जोडीने स्वत:च्याच अकलेचे दिवाळे निघाल्याचे जगाला दाखवून दिले. अक्षर पटेलने नुकत्याच इंग्लंड - विंडीज दौऱ्यात केलेली झक्कास कामगिरी द्रविड व कंपनी विसरलीच कशी ?
           या सामन्यात रोहित शर्मा एक फलंदाज म्हणून खरोखर चांगला खेळला, त्याला सुर्यकुमार यादवनेही साथ दिली. मात्र या दोघांचा अपवाद वगळला तर भारताचे तथाकथीत महान फलंदाज सफसेल फेल गेल्याने भारताचे दोनशेचे उद्दीष्टं साध्य झाले नाही. पंत, हार्दिक, कोहली, राहुल संघासाठी असून अडचण नसून खोळंबा ठरत आहेत. केएल राहुलला पूर्ण तंदुरूस्त नसताना व सातत्याने अपयशी होत असूनही वारंवार संधी दिली जात आहे. याकडेही लक्ष द्यायची वेळ आली आहे. राहुल ऐवजी ईशान किशन नक्कीच फायदेशीर ठरला असता पण येथे कोणते राजकारण खेळले जात आहे हे त्याला खेळविणारेच जाणो ?
            फलंदाजांनी ऐनवेळी दगा दिल्याने गोलंदाजांवरील जबाबदारी वाढली असताना त्यांचे प्रदर्शन तर त्याहूनही खराब झाले. अर्शदिपने शेवटच्या षटकात जरूर चांगली गोलंदाजी केली मात्र त्याच्या ३.५ षटकात ४० धावा गेल्या. अनुभवी
भुवनेश्वरने पहिल्या तीन षटकात सोळाच धावा दिल्या, मात्र शेवटच्या षटकात १४ धावा देऊन संघाच्या अपेक्षांवर अक्षरशः पाणी सोडले. चहल व आश्विनने बळी जरूर मिळविले परंतु त्यांनी आठच्या सरासरीने धावा दिल्याने भारतावरचे संकट अधिकच गडद झाले. हार्दिक पांड्या केवळ एका सामन्याचाच हिरो असल्याचे त्याच्या सलग दोन सामन्यातील फ्लॉप शो वरून दिसत आहे.
            एकंदर फलंदाजांचे कामगिरीत सातत्य नसणे, बुमराहा, हर्षल पटेल संघात नसणे, जडेजाचे जखमी होणे संघासाठी मारक ठरत असताना मोहम्मद शमीला न निवडणे आता देशभर चर्चेचा विषय बनला आहे. आता विश्वचषक तोंडावर आलेला असताना शमीला निवडणे गरजेचे आहेच शिवाय केवळ जिकंणारा संघच निवडला व खेळविला पाहिजे. यामध्ये कुठलेही राजकारण अथवा कोणाचेही हितसंबंध जोपासले जायला नको. तरच विश्वविजयाचे स्वप्न सत्यात उतरेल नाही तर त्याच तिकीटावर तोच खेळ सुरू राहायचा.

 डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक. 
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
ग्लोबल वर्कींग कमिटी मेंबर ऑफ डब्ल्यूसीपीए.
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत. 
Email:  dattavighave@gmail.com
close