सध्या युएईमध्ये पंधरावी अशिया चषक स्पर्धा सुरू आहे. सुरुवातीच्या गट साखळीमध्ये भारताने आपले दोन्ही सामने जिंकून सुपर फोरमध्ये झोकात प्रवेश केला. त्या दोन पैकी एक विजय भारताचा पारंपारीक प्रतिस्पर्धी व कट्टर वैरी पाकिस्तानवरील होता. सुपर फोर मधील पहिल्या सामन्यात भारताची गाठ पुन्हा एकदा पाकिस्तानशी पडणार असल्याने भारतीय गोटात काहीसे आनंदी वातावरण होते. खेळाडूंच्या दुखापतीमुळे त्यात विरजन जरूर पडले. मात्र भारताकडे प्रत्येक खेळाडूला सक्षम पर्याय असल्याने संघ प्रबंधन बरेचसे निश्चिंत होते.
त्याच पार्श्वभूमिवर रविवारी, चार सप्टेंबर रोजी भारताची गाठ पुन्हा एकदा पाकिस्तानशी दुबईच्या चिरपरिचीत मैदानावर पडली. त्या सामन्यात भारताची सुरुवात तर झकास झाली. मात्र रोहित शर्मा, केएल राहुल, सुर्यकुमार यादव जम बसल्यानंतर पाठोपाठ बाद झाले. त्यावेळी केवळ नऊ षटकात भारताच्या तीन बाद ९४ धावा होत्या. अशा वेळी मधल्या फळीवर भारताची नौका पैलतीरावर लावण्याची मोठी जबाबदारी होती.
नेमके त्याच वेळी अनुभवी फलंदाज विराट कोहली एका बाजूने नांगर टाकून आपली जबाबदारी नेटकेपणाने पार पाडत होता. त्यावेळी नंतर येणाऱ्या फलंदाजाची जबाबदारी एकदम सोपी होती. प्रथम स्वतःला स्थिर करायचे, पर्यायाने संघाची पडझड थांबते व जम बसल्यावर आपल्या स्टाईलने पुढील कार्यभाग मार्गी लावायचा.
या परिस्थितीत वनडे व कसोटीमध्ये आपल्या धडाकेबाज फलंदाजीने भारताला अनेकदा संकटातून बाहेर काढत विजयीपथावर आणलेला डावखुरा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत फलंदाजीस आला. त्यावेळी त्याच्याकडून संघाला मोठया अपेक्षा होत्या. सुरूवातीला त्याने संयमाने खेळून जम बसल्यावर आक्रमक खेळावे अशी सर्वांचीच अपेक्षा होती. मात्र त्याने आपल्या " बेजबाबदार " या लौकीकाचा प्रत्यय पुन्हा एकदा समस्त क्रिकेट जगताला करून दिला. बारा चेंडूत त्याच्या चौदा धावा झाल्या होत्या. त्यावेळी पाकचा अनुभवी लेगस्पिनर शादाब खान गोलंदाजी करत होता. शादाबने गलीत क्षेत्ररक्षक उभा केला होता. हे रिषभला सरळपणे दिसत होते. शादाबने टाकलेला चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर जात होता. रिषभ त्या चेंडूला सरळ खेळू शकला असता परंतु त्यावेळी त्याने योग्य शॉट सिलेक्शन करण्यात चुक केली. तो त्या वेळी नको असलेला रिव्हर्स स्विपचा फटका खेळला आणि चेंडू गलीत उभ्या असलेल्या खेळाडूच्या हातात स्थिरावला. तो जर अजून थोडा वेळ खेळला असता तर नंतर येणारा हार्दिक पांड्या दबावमुक्त खेळू शकला असता व भारताला मोठी धावसंख्या फलकावर लावता आली असती. मात्र रिषभ पंतच्या एका चुकीच्या फटक्याने भारताच्या साऱ्या मनसुब्यांवर पाणी फेरले. त्यानंतर आलेला हार्दिक पांड्या दबावातच होता व त्याच मानसिकतेत तो शुन्यावरच बाद होऊन परतला. त्यामुळे भारत मोठी धावसंख्या उभी करू शकले नाही. पुढे जात १५ ते २० धावा भारताला कमी पडल्या व त्याच पराभवाच्या प्रमुख कारणांपैकी एक ठरल्या.
सध्या भारतीय क्रिकेटमध्ये यष्टीरक्षक फलंदाजांचे पेवच फुटले आहे. केएल राहुल, ईशान किशन, संजू सॅमसन, दिनेश कार्तिक तर सध्या रिषभला बाजूला सारून स्वतःचे स्थान पक्के करण्याच्या घोडदौडीत आघाडीवर आहे. अशा वेळी रिषभने मिळेल त्या संधीचे सोने करणे गरजेचे असताना खास करून टिट्वेंटी मध्ये तो बेफीकिरीनेच खेळत असल्याचे त्याच्या आजवरच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत दिसत आहे.
वनडे व कसोटीच्या तुलनेत टि२० मध्ये चुक दुरुस्त करायला संधी नसते. हे माहिती असूनही पंत स्वतःच्या विचारसरणीत व शैलीत बदलच करत नाही. त्यामुळे अफाट गुणवत्ता असूनही टि२०मध्ये तो स्वतःला स्थापित करू शकला नाही. विशेष म्हणजे त्याला त्याच्या सर्व प्रतिस्पर्धी खेळाडूंच्या तुलनेत अधिक संधी मिळत आहे.
रिषभ पंतने सन २०२२ मध्ये १४ टि२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले. त्यामध्ये २४.९० च्या अगदी मामुली सरासरीने व १३४.३१ च्या स्ट्राईक रेटने केेवळ २७४ धावाच त्याच्या बॅटमधून निघाल्या आहेत. या दरम्यान तो २०४ चेंडू खेळला व एक अर्धशतक त्याच्या नावे लागले आहे.
पंतच्या एकूण टि२० आंतरराष्ट्रीय कारकिर्दीवर नजर टाकली तर ती आकडेवारीही रिषभच्या गुणवत्तेला न्याय देत नाही. त्याने खेळलेल्या एकूण ५६ सामन्यांच्या ४९ डावात २३.६०च्या किरकोळ सरासरीने त्याने फक्त ८९७ धावा काढल्या असून त्यामध्ये केवळ तीनच अर्धशतकांचा समावेश आहे. म्हणजे त्याच्या टि २० कारकिर्दीची सरासरी २५ सुध्दा नाही. त्यामुळे त्याला संघात ठेवणे म्हणजे संघासाठी तो असून अडचण नसून खोळंबा या प्रकारातच मोडला जातो.
इतके लाड करून, संधी देऊनही पंत आपले भरीव योगदान देत नसेल तर त्याला टि२० प्रकारातून तात्पुरती देणे नक्कीच संयुक्तीक ठरेल. जेणे करून संघाबाहेर राहून त्याला त्याच्या चुकांवर काम करण्याची संधी मिळेल. विशेष म्हणजे त्याच्याकडे भविष्यातला कर्णधार म्हणून बघितले जात असल्याने त्याला सक्तीच्या विश्रांतीची गरज असल्याचे सध्या तरी स्पष्ट दिसते.
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
ग्लोबल वर्कींग कमिटी मेंबर ऑफ डब्ल्यूसीपीए.
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com

