शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
शुक्रवार दिनांक ०९ सप्टेंबर २०२२
नुकसानग्रस्तांना वाढीव दराने मदत ; नगर जिल्ह्यातील २१४१० शेतकर्यांना होणार लाभ..!!
अहमदनगर : जून ते ऑगस्ट 2022 या कालावधीत नगर जिल्ह्यासह राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे व पूरपरिस्थितीमुळे शेतीपिकांच्या नुकसानीसाठी बाधितांना तीन हजार पाचशे एक कोटी एकाहत्तर लाख एकवीस हजार इतका निधी वितरीत करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. याबाबतचे परिपत्रक महाराष्ट्राचे उपसचिव संजय धारूरकर यांच्या सहीने काल गुरूवारी जारी करण्यात आले आहे.
येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये शेतकर्यांच्या खात्यावर पैसे जमा व्हायला सुरूवात होईल. या मदतीचा नगर जिल्ह्यातील नगर, संगमनेर, राहुरी, कोपरगाव, राहाता, अकोले, शेवगाव, जामखेड, श्रीगोंदा तालुक्यातील सुमारे 21410 बाधित शेतकर्यांना लाभ होणार आहे. ही मदत वाढीव स्वरूपात मिळणार आहे. या निर्णयामुळे नुकसानग्रसस्त शेतकर्यांना दिलासा मिळाला आहे.
जिरायत पिकांच्या नुकसानीसाठी प्रचलित दर 6800 प्रति हेक्टर, 2 एकराच्या मर्यादेत होती ती आता वाढीव स्वरूपात 13600 प्रति हेक्टर 3 हेक्टरच्या मर्यादेत मिळणार आहे. बागायत पिकांच्या नुकसानीसाठी प्रचलित दर 13500 प्रति हेक्टर, 2 हेक्टरच्या मर्यादेत होता तो आता वाढीव 27000 प्रति हेक्टर, 3 एकराच्या मर्यादेत असणार आहे.
बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी प्रचलित दर 18000 प्रति हेक्टर, 2 हेक्टरच्या मर्यादेत होता तो आता वाढीव 36000 प्रति हेक्टर, 3 एकराच्या मर्यादेत असणार आहे.
जून महिन्यात संगमनेरात 314 शेतकर्यांना, शेवगावातील 23, श्रीगोंदा 45, जामखेडमधील 62 शेतकर्यांना अतिवृष्टीचा दणका बसला. जुलैत अकोले तालुक्यातील काही गावांसह भंडारदरा पाणलोटात तुफानी पाऊस झाला. त्यात शेकडो शेतकर्यांना फटका बसला. ऑगस्टमध्ये कोपरगाव, राहाता, राहुरीत अनेक शेतकर्यांचे नुकसान झाले. सरकारने मदत करावी अशी मागणी होत होती. त्याचा दखल घेऊन जिल्हा प्रशासनाने 4 कोटी 25 लाख 92 हजार रूपयांच्या निधीची मागणी केली आहे. आता या परिपत्रकामुळे या नुकसानग्रस्त शेतकर्यांच्या मदतीचा मार्ग मोकळा झाला आहे.
परिपत्रक जारी-
संगमनेर, राहुरी, कोपरगाव, राहाता, अकोले, शेवगाव, जामखेड, नगर, श्रीगोंदा तालुक्यातील शेतकर्यांना दिलासा.
Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

