शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे. रविवार दिनांक ११ सप्टेंबर २०२२
तीन तास विसर्जन मिरवणूक ठप्प ; शिवसेेनेच्या ठाकरे गटाच्या मिरवणुकीत डिजेला शिंदे गटाकडून ओव्हरटेकमुळे तणाव..!!
अहमदनगर : नगरमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान शिवसेनेतील दोन गटांमध्ये वाद झाला. मुख्यमंत्री शिंदे यांच्या गटाचा मिरवणुकीतील डीजे हा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मानणार्या गटाच्या पुढे गेल्याने तणाव निर्माण झाला होता. यामुळे नगरमध्ये श्रींची मिरवणूक जवळपास अडीच ते तीन तास ठप्प होती.
अखेर शिंदे गटाने माघार घेतल्याने मिरणवूणक सुरळीत झाली. मात्र, विसर्जन मिरवणुकीसाठी रात्री 12 पर्यंतची वेळ असल्याने ती होताच आहे त्या जागेवरच मिरवणूक विसर्जित करावी लागली.
नगर शहरात गणेश विर्सजन मिरवणुकीसाठी मानाचे 12 गणपती होते, त्यानंतर 13 व्यानंबर शिवसेनेचा गणपतीचा होता. दरम्यान, शुक्रवारी शहराचे ग्रामदैवत असलेल्या श्री विशाल गणपती मंदिरात महाआरती करून मानाच्या पहिल्या श्री विशाल गणेश मंडळाच्या विसर्जन मिरवणुक सुरू झाली. या निवडणुकीत पारंपारिक वाद्य असलेल्या ढोल- ताशे, लेझीम पथकाने लक्ष वेधून घेतले होते. माळीवाडा मार्गे मध्य शहरातील विविध भागातून जाऊन दिल्ली गेट मार्गे सायंकाळी श्री गणेशाचे विसर्जन होणार होते. सकाळी अहमदनगरचे पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्या हस्ते श्री विशाल गणेश मंदिरात मानाच्या पहिल्या श्री विशाल गणेश मंडळाच्या गणपतीची महाआरती झाली.
यावेळी श्री विशाल गणेश ट्रस्टचे अध्यक्ष अभय आगरकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. आरती नंतर मिरवणुकीस प्रारंभ झाला. यंदा प्रथमच श्री विशाल गणेश ट्रस्ट मंडळाने मिरवणुकीत सहभागी होणार्या भाविकांना शारीरिक इजा होऊ नये, म्हणून रथाला ट्रॅक्टर जोडण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार या मिरवणुकीत रथाला ट्रॅक्टर लावण्यात आला होता. महाआरतीनंतर जागोजागी श्री विशाल गणेश मंडळाच्या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी नागरिक गर्दी करत होते. शिस्तबद्ध व नियोजनबद्ध म्हणून ख्याती असलेल्या या श्री विशाल गणेश मंडळाच्या मिरवणुकीत पारंपारिक वाद्यांना प्राधान्य देण्यात आले. सर्वच पथकांना या मिरवणुकीत सहभागी करून घेण्यात आले होते.
मिरवणूक शांतपणे धिम्म्या गतीने पुढे सरकत होती. सायंकाळी सातच्या दरम्यान, आडतेबाजारात शिवसेनेच्या शिंदे गटाच्या गणपतीच्या डिजेने पोलीसांचा बंदोबस्ताचे कडे तोडून शिवसेनेच्या ठाकरे गटापुढे नेला. यामुळे मिरवणुकीतील ठाकरे गटाचे पदाधिकारी संतप्त झाले. यावेळी संभाजी कदम यांनी शिंदे गटाचा डिजे हा ठाकरे गटाच्या मागे घेण्याची मागणी केली. यावेळी एकच गोंधळ उडाला. दरम्यान, मानाच्या गणपतीमध्ये कदम यांच्या मंडळाचा स्वतंत्र गणपती होता. त्यांनी या गोंधळात एकाच जागेवर थांबत पुढे न जाण्याचा निर्णय घेतला. यामुळे मिरवणूक ठप्प होवून एकच तणाव निर्माण झाला.
यावेळी पोलीस प्रशासनाकडून चर्चा करून तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करण्यात आला. त्यावर ठाकरे गटाने जर नवीन मंडळांना मिरवणुकीत सहभागी व्हायचे, असेल तर परंपरेनुसार ठरवून दिलेल्या क्रमांकाच्या मागे मिरवणुकीत सहभागी व्हावे, अशी भूमिका घेतली. त्यानंतर अखेर ठाकरे गटाचा डीजे मिरवणुकीत पुढे घेण्यात आला आणि मिरवणूक सुरळीत सुरू झाली. शिंदे गटाकडून रीतसर मिरवणुकीसाठी परवानगी मागण्यासाठी अर्ज करण्यात आल्याने पोलीस प्रशासनापुढे पेच निर्माण झाला होता. त्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता होती. मात्र पोलीस प्रशासनाने योग्य पद्धतीने परिस्थिती हाताळत मिरवणूक पुन्हा सुरू केली.
मानाचे तीनच गणपती दिल्लीगेटबाहेर...
मिरवणुकीसाठी रात्री बाराची वेळ होती. मात्र, डिजे पुढे नेण्यावरून सुरू झालेल्या वादामुळे जवळपास अडीच ते तीन तास मिरवणूक ठप्प होती. रात्री बारा वाजताच पोलीसांनी सर्व मंडळांच्या मिरवणूक थांबवल्या व आहे त्या ठिकाणावरून शांततेत बाप्पांना विर्सजनासाठी नेण्याची सूचना केली. यामुळे काही मंडळांनी बाप्पा विसर्जनासाठी नेले तर तर काहींनी बाप्पांना सुरक्षित ठिकाणी नेले. यामुळे दिल्लीगेट बाहेर मानाच्या गणपतीपैकी दोन किंवा तीन गणपती जावू शकले.
Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

