shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कर्जुले हर्या घाटात कार व दुचाकीचा अपघात होऊन दुचाकीने पेट घेतला... ! दुचाकीस्वार बालंबाल बचावले..!

पारनेर । प्रतिनिधी :
नगर-कल्याण महामार्गावर कर्जुले हर्या घाटात स्विफ्ट कार व दुचाकीच्या समोरासमोरील झालेल्या अपघातानंतर   दुचाकीने तात्काळ
 पेट घेतला. दरम्यान या दुचाकीवरील अपघातात दोघे जखमी झाले असून त्यांच्याजवळील तीन वर्षांचे बाळ मात्र बालंबाल बचावले. मंगळवारी सकाळी पावणेबारा वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला.


या अपघातासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यातील काळेवाडी येथील कारभारी नामदेव बेलकर (वय ४९) व त्यांची मुलगी स्वाती विजय सोंडकर (वय २७), नात आरुशी (वय ३) हे एम. एच. १४ सी.टी ५५१६ वरून हंगे, (ता. पारनेर) येथे निघाले होते. त्यांची दुचाकी कर्जुले हर्या घाट पार करीत असताना समोरून येणाऱ्या स्विफ्ट कार (क्र. एम. एम. २१ व्ही २०९७ चा चालक अक्षय साबळे यास वळणाचा अंदाज आला नाही. त्यामुळे समोरून येणाऱ्या दुचाकीस समोरून जोराची धडक बसली. धडक झाल्यानंतर दुचाकीने तात्काळ पेट घेतला. तर दुचाकीवरील तिघे रस्त्याच्या बाजूला फेकले गेले. त्यात कारभारी बेलकर यांच्या पायाला तर स्वाती यांच्या डोक्यास दुखापत झाली. तर तीन वर्षीय आरूशाला खरचटलेही नाही. स्विफ्ट कारमधील डॉ. किशोर बाळासाहेब गुंड, अक्षय सागर गुंड व चालक अनिल साबळे हे शांकभरी देवी मंदिरातील साऊंड सिस्टमचे मशिन आळेफाटा येथे दुरूस्त करण्यासाठी जात होते. ते कर्जुलेहर्या घाटात आले असता त्यांच्या वाहनाचा अपघात झाला. अपघातानंतर डॉ. किशोर गुंड हे जखमींना स्वतः सुरूवातीस टाकळी ढोकेश्वर येथील रूग्णालयात व त्यानंतर पुढील उपचारासाठी नगर येथे घेऊन गेले.

नगर-कल्याण महामार्गावरील कर्जुलेहर्या घाटावरील सदर  वळण अत्यंत धोकादायक आहे. नवख्या चालकांना वळणाचा अंदाज येत नाही. महामार्गाचे काम झाल्यापासून अपघातामध्ये अनेक निष्पाप प्रवाशांनी तेथे आपला जीव गमावला आहे. तर अनेक जण जखमी तर काही कायमचे जायबंदी झाले आहेत. त्यामुळे हे धोकादायक वळण काढण्याची मागणी जोर धरू लागली आहे. 

मदत सोडून अपघात घडल्यानंतर अनेक जण मदत करण्याऐवजी फोटो किंवा व्हिडीओ काढण्यास प्राधान्य देतात. अपघातानंतर मदत केल्यास त्यास जीवदान मिळू शकते याचे भान ठेवणे गरजेचे आहे. अपघातानंतर दुचाकीने घेतलेला पेट मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद करण्याची अनेकांना घाई झाली होती. मात्र पत्रकार संजय मोरे व पळपुर येथील रेवजी आहेर यांच्या मदतीने त्यांनी पेटती मोटारसायकल विझविण्याचे काम हाती घेतले. त्यांना पो. कॉ. निवृत्ती साळवे व पो. कॉ. खामकर यांनी मदत केली.
close