shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

लंपी त्वचारोगासंदर्भात जनजागृती व प्रतिबंधात्मक उपाययोजना महत्वाच्या- शिवश्री.राहुल ढेंबरे पाटील

लंपी त्वचारोग  विषयी :-
लंपी त्वचारोग विषाणूजन्य त्वचारोग, साथीचा आजार  आहे.लंपी त्वचारोगाचे जंतू देवी विषाणू गटातील कॅप्री पॉक्स  प्रवर्गातील असून गाई व म्हशींमध्ये मुख्यत्वे आढळतो.  देशी गाईंपेक्षा विदेशी वंशाच्या गाईंमध्ये सदर रोगबाधेचे प्रमाण अधिक आहे. सर्व वयोगटातील जनावरात लंपी त्वचारोग आढळतो पण लहान वासरांत प्रौढ जनावरांच्या तुलनेत रोगबाधेचे प्रमाण अधिक असते. उष्ण व दमट हवामान रोगप्रसार होण्यास अधिक पोषक उन्हाळ्यात अधिक प्रमाणात आढळतो त्याच्या तुलनेत हिवाळ्यात कमी प्रमाणात. आजारामुळे जनावरं मृत्यूमुखी पडण्याचे प्रमाण कमी असले तरी रोगी जनावरे अशक्त होत जातात, त्यांचे दुग्धोत्पादन मोठ्या प्रमाणावर घटते तसेच काही वेळा गर्भपात होतो, प्रजनन क्षमता घटते, यामुळे पशुपालकाचे आर्थिक नुकसान होते, या रोगात त्वचा खराब झालेले जनावर खूप विकृत दिसते. 
लंपी त्वचारोगाचा प्रसार :-
आजाराचा प्रसार मुख्यत्वे चावणाऱ्या माशा, डास, गोचीड, चिलटे यांच्यामार्फत होतो तसेच आजाराच्या विषाणूचा संसर्ग निरोगी व बाधित जनावर यांच्यातील प्रत्यक्ष स्पर्शाने होऊ शकतो विषाणू संक्रमण झाल्यानंतर ते एक ते दोन आठवड्यापर्यंत रक्तामध्ये राहतात व तदनंतर शरीराच्या इतर भागात संक्रमित होतात त्यामुळे नाकातील स्राव, डोळ्यातील पाणी व तोंडातील लाळेतून विषाणू बाहेर पडून चारा व पाणी दूषित होतो व त्यातून इतर जनावरांना या विषाणूचा प्रसार होऊ शकतो.  त्वचेवरील खपल्या गळून पडल्यानंतर त्यामध्ये विषाणू दीर्घकाळ (३५ दिवस) जिवंत राहू शकतात. गाभण जनावरांत या आजाराची लागण झाल्यास गर्भपात व रोगग्रस्त वासरांचा जन्म होतो. दूध पिणाऱ्या वासरांना आजारी गाईच्या दुधातून व स्तनावरील वर्णातून रोगप्रसार होतो. 

लंपी त्वचारोग लक्षणे :- 
बाधित जनावरांमध्ये या आजाराचा सुप्तकाळ साधारणपणे २ ते ५ आठवडे एवढा असतो.  या आजारामध्ये प्रथम जनावरांच्या डोळ्यातून व नाकातून पाणी येते लसिका ग्रंथींना सूज येते, सुरुवातीस भरपूर ताप येतो, दुग्ध उत्पादन कमी होते, चारा खाणे , पाणी पिणे -कमी होते त्वचेवर हळू हळू  १० ते ५० मिमी व्यासाच्या गाठी प्रामुख्याने डोके,पाय, मान,कास इत्यादी भागात येतात.  काही वेळा तोंड,नाक,डोळ्यात व्रण निर्माण होतात, तोंडातील व्रणामुळे आजारी जनावरांना  चारा चघळण्यास त्रास होतो. डोळ्यातील व्रणामुळे चिपडे येते तसेच डोळ्याची दृष्टी बाधित होते. 
या आजाराच्या प्रादुर्भावामुळे फुफ्फुसदाह किंवा स्तनदाह आजाराची बाधा पशूंमध्ये होऊ शकते. रक्तातील पांढऱ्या पेशी व प्लेटलेटची संख्या कमी होते.  पायावर सूज येऊन काही जनावरे लंगडतात 

लंपी त्वचारोग नियंत्रण :-
बाधित जनावरांची तपासणी करणाऱ्या पशुवैद्यकांनी योग्य पोशाख परिधान करावा, हातात डेटॉल किंवा अल्कोहोल मिश्रित सॅनिटायझर ने धुवून घ्यावेत. तपासणी झाल्यानंतर कपडे व फुटवेअर गरम पाण्यात धुवून निर्जंतुक करावेत. अशा जनावरांच्या संपर्कात आलेले साहित्य जसे वाहन, परिसर इत्यादी निर्जंतुक करून घ्यावे. गोठा व परिसरात स्वच्छ हवेशीर ठेवावा, परिसरात पाणी साठणार नाही याची दक्षता घ्यावी. कीटकनाशक औषधीचा जनावरांच्या अंगावर व गोठ्यात फवारा मारावा. आजारी जनावरांच्या संपर्कातील जनावरांना आयवरमेक्टिन  इंजेक्शन दिल्यास कीटक नियंत्रण होऊन रोगप्रसारास काही प्रमाणात आळा बसल्याचे दिसून आले आहे.  सध्या भारतात या रोगावरची लस उपलब्ध नाही मात्र शेळ्यात देवीवर वापरण्यात येणारी लस वापरून हा रोग नियंत्रणात आणता येऊ शकतो. सध्या जंतूचा मानवात सहसा प्रादुर्भाव होत नाही परंतु शेतकऱ्यांनी जनावरे हाताळल्यानंतर हात साबणच्या पाण्याने धुऊन घ्यावेत किंवा सॅनिटायझरने साफ करून घ्यावेत. लंपी त्वचा रोग मच्छर, माश्या, गोचीड,चिलटे यामुळे पसरत असल्याकारणाने लिंबाच्या पाल्याचा धूर केल्यास मच्छर, माश्या, चिलटे यांच्यापासून पशुधन सुरक्षित राहण्यास मदत होईल. शास्त्रीय दृष्ट्या या साथीच्या काळात किंवा नेहमीच सर्वांनी दूध उकळून प्यावे.  प्रादुर्भावग्रस्त भागात जनावरांची ने आण  वाहतूक बंदी आणावी तसेच जनावरांचे बाजार बंद ठेवण्यात यावे. रोगग्रस्त जनावराचा मृत्यू झाल्यास मृतदेह आठ फूट खोल खड्ड्यात पुरावा. 

लंपी त्वचा रोगासंदर्भात जनजागृती व प्रतिबंधात्मक उपाययोजना महत्वाच्या- शिवश्री.राहुल ढेंबरे पाटील
लंपी सदृश लक्षणे दिसल्यास पशुपालकांनी जवळच्या शासकीय पशुवैद्यकीय रुग्णालयातील डॉक्टरांशी किंवा महाराष्ट्र शासन पशुसंवर्धन विभागाचा टोल फ्री क्रमांक 1962 वर संपर्क साधावा. कुठल्याही अफवांना बळी न पडता लंपी त्वचारोग जनजागृती मोहीम हाती घेतल्यास लंपी त्वचारोगास पूर्णपणे आळा बसेल व गोपालकांचे होणारे आर्थिक नुकसान टाळण्यास मदत होईल.सदर लंपी त्वचारोगासंदर्भात खासगी/शासकीय डॉक्टर, संशोधक तसेच पशुपालक शेतकऱ्यांबरोबर चर्चा करूनच लंपी त्वचारोगाविषयी जनजागृती आणि पशुपालक शेतकरी बांधवांना घ्यावयाची काळजी याविषयी जागृत करण्याचा हा अट्टाहास.
close