लेखक :पुण्यरत्न डॉ. चंद्रकांत शहासने
मोबाईल : ९८८१३७३५८५
दुर्गा सप्तशती नावाचे एक स्तोत्र असून सर्वांनी ते अत्यंत जिज्ञासापूर्वक वाचावे. यांत दुर्गादेवीची अनेक रूपे आपल्या शरीरात कार्यरत असून शरिराच्या त्या त्या अंगाचे रक्षण या देव्या करतात असा दुर्गेचा अगाध महीमा वर्णीलेला आहे. तिची अनेक रुपे आहेत .तसेच दुर्गेच्या रूपात चौसष्ट योगिनी या विश्वात कार्यरत आहेत. कारण ज्या आदिमाया शक्तीने हे ब्रम्हांड निर्माण केलेलं आहे तिचीच रूपे म्हणजे चौसष्ट योगिनी आहेत. चौसष्ट विद्या, चौसष्ट कला नि चौसष्ट योगिनी.
आदिमायेनं जसं ब्रम्हांड निर्माण केलं तसं आपल्यालाही जन्माला घालणारी आदिमायाच आहे. जो चोच देतो तोच चारा देतो या उक्तीप्रमाणे आदिमाया आपले पालनपोषण करते. आपले संरक्षण करते. मात्र हे आदिमायेचं रूप आपण समजून घेत नाही.
विज्ञाननिष्ट-तंत्रज्ञानाने जरा सखोल चिंतन केलं तर आदिमाया दुर्गेची उपासना देहाच्या अंतरंगात करणं किती गरजेचं आहे ते समजून येईल.
आदिमायेच्या हातात शंख, चक्र,गदा, पद्म,भाला, कट्यार अशी अस्त्र आपण पाहतो. आदिमाया त्रिगुणात्मक आहे म्हणजे सत्वगुणी, रजोगुणी, तमोगुणी आहे. आपणही सर्वजण, सत्वगुणी, रजोगुणी, तमोगुणी आहोत. म्हणजे आपणच आदिमाया आहोत असं समजून विचार करा. आदिमायेची अनेक रुपं आपलं दशदिशांकडून रक्षण करतात ते कसे ?
तर या देवता आपल्या शरीरातील विविधांगात स्थानापन्न असून त्या त्या भागातील देहाचे रक्षण करणे हे त्यांचे कार्य आहे, तथापि उपासना करून त्यांना जागृत ठेवावे लागते. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात "ठेविले अनंते तैसेचि रहावे, चित्ती असो द्यावे समाधान" !
आपला जन्म अनंते म्हणजे परमेश्वरी कृपाप्रसाद आहे.
आपल्या देहात कुठे कुठे या देवतांचे कार्य चालते,त्या कुठे स्थापित असतात ते पाहू या.
आपल्या देहाला पुर्वेकडून ऐन्द्रीदेवी, अग्नेयेकडून अग्निमयीदेवी, दक्षिणेकडून वाराहीदेवी, नैऋत्येकडे खड्गधारिणी, पश्चिमेकडून वारूणी, वायव्येकडून दुर्गा, उत्तरेकडून कौमारी, ईशान्येकडून शूलधारिणी, वरील बाजूने ब्रम्हाणी आणि तळाकडून वैष्णवी, पाठीमागून विजयादेवी, डावीकडून अजितादेवी, उजवीकडे अपराजिता, शेंडीचे रक्षण उद्योतिनी, मस्तकावर उमादेवी, कपाळावर मालाधरी, भूवयांवर यशस्विनी, नाकाजवळ यमघंटा, कानाशी द्वारवासिनी, नेत्राशी शंखिणी, कपाळावर कालीका, कानांच्या मूळाशी शांकरी, सुगंधादेवी नाकात, चर्चिकादेवी वरील ओठाशी, अमृतादेवी खालच्या ओठावर, सरस्वती जीभेवर, चंडीका कंठावर, दातांवर कौमारी, गळ्यात चित्रघंटा, टाळूवर महामाया, हनुवटीवर कामाक्षी, वाचेवर मंगला, मानेवर महादेवी, पाठीवर धनुर्धरी, नीलग्रीवा कंठाच्या बाहेर, नलिकांमध्ये नलकुबरी, खांद्यावर खड्गीनी, बाहूंमध्ये वज्रधारिणी, हातांवर दंडिनी, हातांच्या बोटांवर अंबिका, नखांवर शूलेश्वरी, जठरात कुलेश्वरी, मनावर शोकनाशिनी, हृदयाचे रक्षण ललातादेवी, उदरात शूलधारिणी, नाभीवर कामिनी, गुह्याचे रक्षण गुह्येश्वरी, कंबरेवर भगवती आणि सर्वांगाचे रक्षण माता दुर्गा करते.
लक्ष्मी संपत्ती देते , विंध्यवासिनी विद्या देते. महाबला पोटऱ्यांचे रक्षण करते. दोन्ही घोटयांचे रक्षण नारसिंही करते. पायाच्या बोटांचे रक्षण श्रीदेवी करते. सर्वमंगलादेवी सर्वांगाचे रक्षण करते तर देहातीत सर्व चक्रांवर ईश्र्वरी देवीचा वास असतो. शरीराचे रोम, छिंद्रांवर कौबेरी देवीचे वास्तव्य असते. वागेश्वरीदेवी त्वचेचे रक्षण करते. पार्वतीदेवी रक्त, मांस ,मज्जा, हाडे यांचे रक्षण करते.आतड्यांचे रक्षण कालरात्री करते. पित्ताचे रक्षण मुकूटेश्वरी, षढचक्रांचे रक्षण पद्मावती, कफाचे रक्षण चुडामणी, नखांचे रक्षण ज्वालामुखी, रक्षीदेवी सांध्यांचे, शुक्राचे रक्षण ब्रम्हाणी, छत्रेश्वरी सावली देते. मन, अहंकार, बुद्धीचे रक्षण धर्मधारिणी करते. वज्रहस्तादेवी आपले प्राण,अपान,व्यान,उदान वायूचे रक्षण करते.
शब्द,स्पर्श,रूप,रस,गंध याचे रक्षण योगिनी करते. नारायणीदेवी सत्व,रज,तमाचे रक्षण करते.
तर असे आहे आदिमाया दुर्गेचे विज्ञानमयी स्वरूप. यासाठी आपल्या देहात आदिशक्ती आदिमाया दुर्गेचा संचार होणे गरजेचे असून तशी उपासना करणे क्रमप्राप्त आहे.
लेखक : चंद्रकांत शहासने
मोबाईल : ९८८१३७३५८५

