आठवी टि२० विश्वचषक स्पर्धा येत्या २३ ऑक्टोबर पासून ऑस्ट्रेलियात सुरू होत आहे. यामध्ये मान्यताप्राप्त संघातील अनेक नामवंत खेळाडू सहभागी होत असून यापूर्वी सातही स्पर्धा खेळणारा एकमेव खेळाडू म्हणजे रोहित शर्मा भारताचा कर्णधार म्हणून या स्पर्धेत खेळणार आहे. या बरोबरच सर्वच्या सर्व आठही स्पर्धा खेळण्याचा अनोखा विक्रम रोहितच्या नावे लागणार आहे. आश्चर्याची बाब म्हणजे सन २००७ च्या दक्षिण आफ्रिकेत झालेल्या पहिल्या टि-२० विश्वचषक स्पर्धेत रोहित शर्मासह भारताचे प्रतिनिधित्व करणारा दिनेश कार्तिकही विद्यमान संघाचा घटक असणार आहे. आपणास ठाऊक आहे की, उदघाटनाची पहिली स्पर्धा भारताने जिंकली असून कार्तिक - रोहितचा तो शुभशकुनी पायगुण पंधरा वर्ष व सात स्पर्धांनंतर भारताचे नशिब उघडेल का ? हा लाखमोलाचा प्रश्न सर्वांना खुणावत असेलच.
ऑस्ट्रेलियात होणाऱ्या या स्पर्धेत इतर संघांच्या तुलनेत भारतीय संघात वयस्कर खेळाडूंचा भरणा मोठा आहे. परंतु भारतीय संघ या अनुभवी खेळाडूंमुळेच विजेतेपदाचा दावेदार म्हणून या स्पर्धेत उतरणार आहे. रोहित शर्मा व दिनेश कार्तिकसह पंधरा जणांच्या भारतीय चमूतील दहा सदस्यांकडे यापूर्वी विश्वचषक स्पर्धेत खेळण्याचा अनुभव आहे. तर दिपक हुड्डा, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, अक्षर पटेल व हर्षल पटेल प्रथमच विश्वचषक स्पर्धेत खेळताना आपल्याला दिसणार आहेत.
भारताला सन २००७ नंतर एकही विजेतेपद मिळालेले नसल्याने खास करून अनुभवी रोहित शर्माच्या अनुभवी हातात भारताची जमा कमान देण्यात आली आहे. सन २००७ ते २०२१ दरम्यान झालेल्या सर्व सातही स्पर्धांचा अनुभव पाठीशी असलेल्या रोहितने आपल्या बॅटने भारतासाठी भरीव योगदान दिले आहे. या सात स्पर्धात तो एकूण ३३ सामने खेळला असून एकूण ८४७ धावा त्याच्या नावे आहेत. त्यामध्ये नाबाद ७९ ही सर्वोच्च खेळी ठरली. आता तर त्याच्यावर सलामीचा फलंदाज म्हणून डावाला आकार देण्याबरोबरच संघाच्या शिरपेचात विजेतेपदाचा तुरा खोवण्याची कठीण जबाबदारी पडली आहे. त्याचे कारण म्हणजे पहिल्या स्पर्धेतील विजेतेपदानंतर या स्पर्धेतील भारताचे खाते कोरेच असून महेंद्रसिंग धोनी व विराट कोहली सातत्याने अपयशी ठरले आहे. त्यापैकी विराट कोहलीला तर कर्णधारपदाचा त्यागही करावा लागला. त्यामुळे आता समस्त भारतीय क्रिकेट रसिक कर्णधार रोहितकडे एक देवदूत म्हणून मोठया आशेने बघत आहे. त्याचे कारणही तिततकेच वाजवी आहे. याच रोहितच्या नेतृत्वात त्याच्या मुंबई इंडियन्सने आयपीएलचे सर्वाधिक पाच विजेतेपद पटकावले आहेत.
रोहित नंतर विराट कोहली व रविचंद्रन आश्विन सर्वाधिक म्हणजे प्रत्येकी चार स्पर्धात खेळले असून सन २०१२, २०१४, २०१६ व २०२१ नंतर आता पाचव्या स्पर्धेत ते भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत. दिनेश कार्तिक सुरुवातीच्या तीन स्पर्धा सन २००७, २००९ व २०१० नंतर प्रथम संघात निवडला गेला असून यावेळी वाढते वय व अनुभव यांच्या बळावर दिनेश संघाच्या अपेक्षा कशा पुर्ण करतो हे बघणे मनोरंजक ठरेल.
भुवनेश्वर कुमार सन २०१४ व २०२१, जसप्रित बुमराह व हार्दिक पांड्या
सन २०१६ व २०२१ च्या स्पर्धांत भारताकडून खेळले आहेत.
मागच्या वर्षीच म्हणजे सन २०२१मध्ये युएईत भारताच्या संयोजनात झालेल्या टि२० विश्वचषक स्पर्धेत आताच्या संघातले नऊ खेळाडू खेळले आहेत. त्यामध्ये रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, हार्दिक पांड्या, आर.अश्विन, जसप्रित बुमराह व भुवनेश्वर कुमार यांचा समावेश आहे. तर श्रेयस अय्यर व दिपक चाहर मागच्या वर्षीही राखीव खेळाडूत होते व आताही ते राखीवच आहेत. मोहम्मद शमी मागच्या वर्षी मुख्य संघात होता तर आता तो राखीव म्हणून संघासोबत असणार आहे.
विद्यमान संघातील दहा खेळाडूंपैकी मागील काही स्पर्धा खेळलेल्या खेळाडूंमध्ये विराट कोहलीची आकडेवारी प्रशंसनीय दिसते. कोहलीने २१ विश्वचषक सामन्यात ७६.८१च्या सरासरीने ८४५ धावा ठोकल्या असून ८९ हि त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे. त्यामध्ये दहा अर्धशतांचा समावेश असून कोहली रोहीत शर्मा ( ८४७ ) पेक्षा केवळ दोनच धावांनी मागे आहे.
टि २० विश्वचषकाचा विचार केला तर १५ पैकी १० भारतीय खेळाडूंकडे ११९ सामने खेळण्याचा अनुभव आहे. त्यामध्ये रोहित सर्वाधिक ३३ तर सर्वात कमी चार सामनेेे सुर्यकुमार यादवने खेळले आहेत. सुर्यकुमार प्रमाणेच केएल राहुल व रिषभ पंत एक - एकच विश्वचषक स्पर्धा खेळले आहेत. परंतु त्यांच्या खात्यात प्रत्येकी पाच सामन्यांची नोंद आहे.
गोलंदाजीचा विचार केला तर आश्विनची कामगिरी उल्लेखनीय असून त्याने २६ बळी पटकावले आहेत तर जसप्रित बुमराहाच्या नावे अकरा बळी असून यावेळी भारताला दुसऱ्यांदा टि२० चा विश्वकरंडक जिंकायचा असेल तर प्रत्येकाला आपली भूमिका योग्य रित्या पार पाडावी लागेल. त्याच बरोबर सातत्यपूर्ण व सांघिक खेळ करावा लागेल. तसेच कर्णधार म्हणून रोहित शर्माला संघाला शांत डोके व चित्ताने पुढे घेऊन जावे लागेल तरच त्याच्या इतक्या स्पर्धा खेळण्याचे सार्थक होईल व विश्वचषक स्पर्धांच्या इतिहासात एक महापुरुष म्हणून त्याची गणना होईल.
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
ग्लोबल वर्कींग कमिटी मेंबर ऑफ डब्ल्यूसीपीए.
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com

