लोणार (विजय गोलेछा) : भारतीय पुरातत्व विभाग अंतर्गत येणाऱ्या लोणी रोडवरील पौराणिक महत्त्व असणाऱ्या लिंबीबारव कुंडामध्ये नगरपालिकेच्या चुकीच्या नियोजनामुळे व प्रतापामुळे नालीतील संपूर्ण घाणपाणी आज धो... धो... करीत गेल्याने या पौराणिक वास्तूचे अस्तित्व नक्कीच धोक्यात आले आहे.याला आता जबाबदार कोण? याची जाणीव पुरातत्व विभागाला आहे का? असे प्रश्न नागरिकांच्या मनात आहेत.
शहरातील लोणी रोडवर असलेल्या पौराणिक महत्त्व असणाऱ्या काळा दगडातील पाषाणातील कामाचा उत्कृष्ट नमुना असणाऱ्या लिंबीबारव कुंडाचे जतन व संवर्धन करण्याची जबाबदारी पुरातत्व विभागाकडे आहे. या लिंबीबारव कुंडाला पुरातत्व विभागाकडून चोहोबाजूने तारेचे कुंपण करण्यात आले आहे .या कुंडाची आतील बाजूतील अनेक भिंतीची पडझड झाली असताना पुरातत्व विभागाकडून कोणतेही निर्माणाधीन काम करण्यात आले नाही. याउलट या कुंडाच्या मागील बाजूस नगरपालिकेमार्फत लेंडी तलावाकडे जाण्यासाठी शहरातील सांडपाण्याची नाली बांधलेली आहे. परंतु या नालीमधून जाणारी लेंडी तलावाजवळील नाली पूर्णता खुली नसल्यामुळे शहरातील घाण पाणी लिंबीबारव मध्ये जात आहे. लोणार शहरात आज जोरदार पाण्याने पावसाने हजेरी लावल्यामुळे शहरातील घाण सांडपाणी धो... धो...करीत लिंबीबारव कुंडामध्ये गेल्याने हे कुंड पूर्ण भरण्याच्या स्थितीत असल्याने या पौराणिक वस्तूचे अस्तित्व धोक्यात आले आहे. याबाबत पुरातत्त्व विभागाने त्वरित लक्ष देऊन पौराणिक वास्तूचे जतन करण्यासाठी ठोस पावले उचलण्याची नितांत आवश्यकता असल्याचे मागणी मी लोणार समितीचे सदस्य सतीश कापुरे यांचेकडे व्यक्त केली आहे.

