१६५) पर्यावरण जनजागरण राष्ट्रभक्ती आणि आरोग्य साक्षरता...!
गणपती बाप्पांचे आगमन झाले. वाजत गाजत धुमधडाक्यात ढोल ताशांच्या निनादात! मी माझ्या पुण्याच्या निवासस्थानी पार्किंगमध्ये उभा होतो आणि माझ्या गाडीच्या बाजूला पाच-सहा बोके गोलाकार शांतचित्ताने बसलेले दिसले. वास्तविक पाहता हे चित्र अत्यंत दुर्मिळ म्हणा की आश्चर्यजनक होते. की, एक बोका दुसऱ्या बोक्यासमोर आला की तो गुरगुरतो. बोका असो की वाघ! तो स्वतःचे अस्तित्व स्वतंत्र ठेवतो हा स्वभाव आहे. मग हे ५/६ बोके एकत्र येऊन काय विचार करत होते. नक्कीच यांच्यामध्ये काही विचार विनिमय चालू होता. म्हणून मी बाजूला स्तब्धपणे त्यांची गंमत पाहत बसलो. चिंताक्रांत अशा चेहऱ्याचे ते बोके म्हणत होते की गणपती बाप्पाचे आगमन झाले आणि सगळ्या उंदीरांवर बाप्पा स्वार झाले तर आपलं होणार कसं? मला पीडी कॉमर्सला वाचलेल्या जॉर्ज ऑरवेलच्या ॲनिमल फार्म या पुस्तकाची आठवण झाली.
गंमत आहे नाही का? गणपती आला म्हणून उंदीर त्याच्याबरोबर गेले की आपले भक्ष खाद्य नाहीसे होणार याची चिंता बोक्यांना पडली. त्यामुळे ते आपापसातील वैरभाव विसरून एकत्र आले आणि चिंतन करू लागले. अर्थात ओरबडून खाणे हेच ज्यांचे तत्त्व आहे असे हे बोके स्वतःच्या पोटापाण्याची अस्तित्वाची चिंता उपस्थित होताच स्वभाव बदलून कसे एक दिलाने एकत्र आले याचे मला खूप कौतुक वाटले. मला माझा बालपणापासूनचा प्रवास आठवला आणि जेव्हा कुठे एखादा संधीसाधू फसव्या माणूस कोणाला लुबाडतो तेव्हा त्याला समाज संधीसाधू बोका असे संबोधते या वाक्प्रचाराचा अर्थ उमजला. सर्वत्र आज अशीच परिस्थिती आहे. माया, प्रलोभने, फसवी अर्थीक गुंतवणूक, जाहिराती, विविध आकर्षणे, दाखवून लोकांना फसविणारे बोके समोर उभे राहिले.
गणपती हा संस्कृतीचा विषय आहे आणि संस्कृती संवर्धन हा बोक्यांच्या दृष्टीने नावडतीचा विषय आहे. माणूस संस्कृतीची जपणूक करू लागतो तेव्हा तो सात्विक पद्धतीने प्रेरित होतो आणि तामसी व रजोगुणी प्रवृत्तीवर मात करतो. ज्यायोगे त्याचा सारासार विचार जागृत होतो आणि विवेकाने वागण्याची कृती त्याच्याकडून होते व तो बोक्यांच्या म्हणजे फसव्या मनवृत्तीच्या जाळ्यात अडकत नाही.
असो गणपती उत्सवाच्या निमित्ताने प्रत्येकाने हे चिंतन करावे आणि गणरायाने सर्वांना सुबुद्धी द्यावी. सामाजिक समरसता, बौद्धिक विकास, राष्ट्रीय एकोपा, व्यसनमुक्ती, जातीभेद निर्मूलन, पर्यावरण रक्षण, राष्ट्रभक्ती आणि आरोग्य साक्षरता या मार्गाने हे राष्ट्र महासत्ता व्हावे यासाठी प्रत्येकाने गणेश पूजन करावे.
पुण्यरत्न डॉ.चंद्रकांत शहासने.
(देशभक्तकोशकार)
मो. ९८८१३७३५८५.

