===================================
प्रकाश मुंडे | बीड जिल्हा प्रतिनिधि :-
केज तालुक्यात काल सायंकाळी विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाचे आगमन झाल्याने शेतकरी वर्गात आनंद दिसुन येत असताना याच वेळी शेतात कामासाठी गेलेल्या महिलावर वीज कोसळून त्यातील एक जण ठार तर तिघे जखमी झाल्याची घटना काळेगाव घाट ( ता.केज ) येथे घडली आहे.
या बाबत अधिक माहिती अशी की केज तालुक्यात मागील २० ते २५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे पिके करपून जात असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. वाळत असलेली पिकं पाहून शेतकरी चातका सारखी पावसाची वाट पाहत आहे. दरम्यान दि. ३१ ऑगस्ट बुधवार रोजी सायंकाळच्या सुमारास केज तालुक्यात नांदुरघाट , चिंचोलीमाळी या सर्कलमध्ये विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाचे आगमन झाले. विजेचा कडकडाट चालू होता.त्यावेळी अचानक आलेल्या पावसामुळे शेतात असलेले काळेगाव घाट येथील काही जणांवर अचानक वीज कोसळली यामध्ये शिला रामरत्न आगे या महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. तर आत्माराम माणिक आगे, अन्नपूर्णा आत्माराम आगे, रामरत्न चंद्रकांत आगे हे जखमी झाले. त्यांना उपचारासाठी दवाखान्यात हलवण्यात असल्याची माहिती मिळाली आहे. तर काल घडलेल्या या घटनेने काळेगावघाट गावावर शोककळा पसरली आहे.
या परिसरात रात्री उशीरापर्यंत पाउस सुरुच होता.
केज तालुक्यातील सर्वच महसूल मंडळात कमी जास्त प्रमाणात पाऊल बरसल्यामुळे बळिराजाच्या चेहऱ्यावर समाधान दिसत आहे.


