shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पुण्यात दुसरे अखिल भारतीय वडार बोली साहित्य मंडळ संमेलन संपन्न झाले.ज्येष्ठ साहित्यिक प्रा. शशिकांत जाधव हे या संमेलनाचे अध्यक्ष होते. त्यांनी केलेल्या अध्यक्षीय भाषणाचा हा संपादित भाग....!


' सुतकीने ' दगड फोडत पै- पै जमा करून शिक्षण घेणाऱ्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, तुम्हा सर्वांना माझा सप्रेम 
जयबजरंग, जयवडार..!

        दुसरे अखिल भारतीय वडार बोली साहित्य मंडळ संमेलनाच्या अध्यक्षपदी माझा बहुमान केल्याबद्दल समाजातील ज्येष्ठ साहित्यिक टी.एस. चव्हाण, अशोक पवार, हरीष बंडीवडार, रमेश जेठे, डॉ. गजानन देवकर, शांताराम मनवरे यांच्या संबंधीची कृतज्ञता व्यक्त करून प्रज्ञा मंचावरील सर्वच कर्तुत्वासंबंधी आदर व्यक्त करतो.

          श्री संत दामाजी,श्री संत चोखामेळा, श्री संत कर्ममेळा,संत कान्होपात्रा, संत बसवेश्वर, संत गैबीपीर, संत गोपाबाई, श्री स्वामी समर्थ पंढरपूरपासून अवघ्या 25 किलोमीटर अंतरावरील  संताच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या मंगळवेढा या जन्मभूमीतल्या प्रा.शशिकांत जाधव यांना आपण *शब्दकळा* साहित्यसंघाची 22 वर्षे राजकारण व अर्थकारण न करता साहित्य सेवा बजावली म्हणून  पुणे येथील सारस्वतांच्या नगरीत आयोजित केलेल्या अखिल भारतीय वडार बोलीभाषा साहित्य संमेलन अध्यक्षपदी निवड केले याचा मला सार्थ अभिमान आहे.

               बंधू भगिनींनो, पहिले अखिल भारतीय वडार बोली भाषा साहित्य संमेलन 29 डिसेंबर 2019 रोजी वडार समाजातील जेष्ठ साहित्य उमरगा येथील रहिवासी शिवमुरती भांडेकर यांच्या प्रेरणेने आणि औरंगाबाद येथील ज्येष्ठ साहित्यिक टी. एस. चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथे आयोजित केले होते.  अशोक पवार, हरीष बंडीवडार, रमेश जेठे, डॉ. गजानन देवकर, प्रा.डॉ. महादेव देशमुख, प्रा. अशोक बंडगर ,शांताराम मनवरे आदींच्या सहकार्याने आणि समाजाने दिलेल्या फुल ना फुलाच्या पाकळीतून साहित्य संमेलनाचा लावलेला हा वेलू आता गगनावरील जातो आहे.

भारतामध्ये काही राज्यांमध्ये वडार समाज हा ओड्र वड्डाल, वडियार ,वडार वडियार या विविध नावाने उच्चारला जातो. रूढी, परंपरा, बोलीभाषा एकच आहे. तरीपण विविध राज्यात कायदे मात्र वेगळे का ? शिवकालीन युगापासून आजतागायत वडार समाजाने संघर्ष एके संघर्ष केला आहे आणि करीत आहे. ग्रामीण भागातील वडार समाज हा पोटाची खळगी भरण्यासाठी सतत भटकंती करीत आहे. तो आजही स्थिर झालेला नाही. यासाठी समाजातील विचारवंतानी तरुण पिढीला शिक्षणाकडे , वैचारिकतेकडे, ज्ञानाकडे घेऊन जाण्याचा आटोकाट प्रयत्न केला पाहिजे. अशी भीष्म प्रतिज्ञा समाजातील एकट्या दुकट्याने घेऊन चालणार नाही. ती सामुदायिकपणे स्वीकारली पाहिजे. समाजाने मला काय दिले ? यापेक्षा मी समाजासाठी काय केले हे महत्त्वाचे आहे. एकत्र कुटुंब पद्धतीत माझे योगदान काय? मी माझ्या परिवारासाठी, आई-वडिलांसाठी किती वेळ देतो? हे फेसबुक ,व्हाट्सअपच्या दुनियेमध्ये आपण आपल्या पाल्यांना बाजूला ठेवून त्याला संस्कृती म्हणजे काय याचे मार्गदर्शन केले पाहिजे. ही प्रत्येक व्यक्तीची सक्तीची जबाबदारी आहे.

साहित्याच्या या परंपरेत आजही काही भागात अनिष्ट रूढी परंपरा, अंधश्रद्धा आहेत. याचा आपण प्रतिकार  करीत हातात लेखणी घेतली पाहिजे. क्रांतीसुर्य महात्मा जोतिराव फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या या जन्मभूमीत वडार समाज हा  मागे का याची खंत वाटते आणि म्हणूनच समाज प्रबोधन करण्यासाठी, समाजाला जागृत करण्यासाठी रूढी परंपरेपेक्षा ज्ञान व्यवस्थेवर विश्वास ठेवण्यासाठी समाजाला संघर्षाची गरज आहे ,ज्ञानाची गरज आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक समाज, प्रत्येक जाती - धर्मातील व्यक्ती जाती धर्माचा अभिमान बाळगून साहित्य संमेलन घेत असेल तर आपला वडार समाज मागे का ? म्हणूनच आपल्यातील सारस्वताला अखिल भारतीय वडार बोली भाषा साहित्य संमेलनाची गरज आहे.

समाज परिवर्तनाच्या या बदलांमध्ये साहित्याचा विचार करीत असताना भलेही आपल्या पूर्वीची पिढी अशिक्षित असले तरी त्या पिढ्याने आपणास संतांच्या या महाराष्ट्रामध्ये आपल्या संस्कृतीचा ठेवा जपत ज्या ठिकाणी आपण कष्ट करू त्या ठिकाणी आपण प्रामाणिक व कष्टाने घाम गाळून उपजीविका करावी . हा संस्कृतीचा ठेवा प्रामाणिकपणे जपण्यास सांगितले आहे.हेच मार्गदर्शन आपण या युवा पिढीला करणे गरजेचे आहे. त्यासाठी समाजातील तरुणाईने आपल्या ज्ञानाच्या बळावर ही ज्ञानरूपी ज्योतीची वाट पुढे नेऊन संस्कृती दृढ करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

भारतामध्ये काही राज्यांमध्ये वडार समाजातील आमचे काही बांधव आमदार होऊन मंत्री झाले. दगड - खाणी व्यवसायामध्ये उद्योगपती झाले. स्वतःची कुटुंबाची भरभराट त्यांच्यामुळे दिसून आली. पण अशा पुढे गेलेल्या उद्योजकांनी एकदा पाठीमागे वळून पाहावे , त्यांनी आपल्या लहान भावाला सोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तरच समाजाचा विकास होईल. महाराष्ट्रातील वडार  बोलीभाषेतील आचार, विचार आणि उच्चार साहित्याद्वारे मार्गदर्शन करण्याची गरज आहे. नाहीतर कालांतराने आपली पुढील पिढी फक्त वडार जात म्हणून जाती  ओळखली जाईल. त्यामुळे आपल्याला वडार बोलीभाषा साहित्य संमेलनाची आवश्यकता आहे. या साहित्य संमेलन मधूनच आपणास उद्य भविष्याचा जीवनरूपी संघर्ष करायचा आहे.त्याचं फलित आपणास येथे दिसते आहे. 

बंधू -भगिनींनो,प्रत्येक व्यक्तीची संघर्षाची कहाणी वेगवेगळी असते. कोण आपल्या अश्रुतून तर कोण आपल्या लेखणीतून समाजासमोर व्यथा मांडण्याचा प्रयत्न करीत असतो . जन्माच्या श्वासानंतर प्रत्येकालाच ते मांडणे अशक्य असते,म्हणून साहित्यिकांचा जन्म होता .वडार समाजातील ज्या सारस्वतांनी यापूर्वी हा इतिहास मांडण्याचा प्रयत्न केला आहे , त्या साहित्यिकांमध्ये *वळंबकार* *शिवमुर्ती भांडेकर*, दगड कोंड्याकार रामचंद्र नलावडे, वडारवेदनाकार लक्ष्मण गायकवाड  यांचे नाव प्राधान्याने घ्यावे लागेल . चित्रपट निर्माते नागराज मंजुळे यांनी तर आपल्या *फॅन्ड्री* चित्रपटात समाजाचा संघर्ष दाखविला आहे.भरत दौंडकर यांच्या" गोफणीतून निसटलेला दगड " या कवितासंग्रहात आपल्या आई-वडिलांची चुलीवरची 
कर्मकहानी व्यक्त केली आहे. म्हणून साहित्यिकांनी आपल्या समाजासमोर समाजाला रूचेल- पचेल असे वास्तवादी साहित्य लिहिण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठी समाजातील सत्य शोधत असताना आपल्यातील ग्रेस शोधण्याची  व विचार मंथन करण्याची गरज आहे. यासाठी  साहित्याची गरज आहे. साहित्य हे जीवनावर केलेले भाष्य आहे. कवी ,लेखक हे समाजाचे  अविभाज्य घटक आहेत. त्यामुळे समाजाची सुखदुःखे, आशा- आकांक्षा, वेदना -व्यथा आणि जे- जे मानवी आहे , मानवाच्या इतिहासाशी आणि वर्तमानाशी निगडित आहे, त्या सर्वांचे प्रतिबिंब साहित्यिकांच्या हृदयात उमटते व ते त्यांच्या लेखणीतून व्यक्त होते.

भारत देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी नंतरही कधी कधी मला असा प्रश्न पडतो की, भारत देशाला खरोखरच स्वातंत्र्य मिळालेलं आहे काय? मिळालं तर ते कोणत्या स्वरूपात मिळाले ?  जगाच्या पाठीवर भारत देश एकीकडे बलाढय होत चालला असला तरी ग्रामीण भागातील वडार समाजातील स्त्री आणि बोटावर मोजणे इतका शेतकरी सुखी आहे का ? राजकारण्यांच्या पुढे आपल्या समाजातील बांधवांनी अनेक सामाजिक व आर्थिक प्रश्न मांडले. पण दुर्दैवाने 
आजतागायत न्याय मिळालेला दिसत नाही. समाजातील अनिष्ट रूढी, परंपरा, अंधश्रद्धा बंद करून त्याला आता न्यायव्यवस्थेवर आणण्यासाठी सर्वप्रथम वडार समाज जागा झाला पाहिजे. त्यासाठीच पुन्हा एकदा साहित्यिक चळवळीची, साहित्य निर्मितीची गरज वाटते. साहित्यिकांनी  काल्पनिक साहित्यापेक्षा समाजाने जे उपभोगलेले आहे. त्याचे वास्तव लेखन आपल्या कृतीतून मांडले गेला पाहिजे.म्हणून आपल्यातील अशा विदवतांची समाजाला खूप गरज आहे. म्हणून वडार समाजाला जागृत करण्यासाठी अखिल भारतीय वडार बोलीभाषा साहित्य संमेलन याची गरज वाटते. तरच फुले ,शाहू, आंबेडकर बरोबरच आपल्या समाजात वि. स. खांडेकर, वि. वा. शिरवाडकर यासारखे साहित्यिक निर्माण होतील. अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.
जय बजरंग! जय वडार!!
 
प्रा . शशिकांत जाधव 
संमेलन अध्यक्ष : 
 अखिल भारतीय वडार बोली भाषा साहित्य संमेलन . 

स्थळ : साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे सांस्कृतिक कला, रंगमंदिर ,येरवडा, पुणे.

 दि. रविवार 30 ऑक्टोबर 2022.
close