शिवसेना कुणाची? या प्रश्नाभोवती महाराष्ट्राचे राजकारण गेले अनेक दिवस फिरत आहे त्याची दसरा मेळाव्यानिमित्त निकाली कुस्ती काल पार मुंबईत पार पडली..
निकाल महाराष्ट्राने बघितला-अनुभवला..आता रडीचा डाव खेळणारे रडतील,कारणं सांगतील परंतू माध्यमकेंद्रित या जगात आता अंपायरच्या निर्णयाची गरज नसते,सारं सारं काही लाईव्ह असतं..
आता जिंकले कोण? आणि हारले कोण? हे साऱ्यांना ठाऊक आहे पण माझ्या मते ही कुस्ती-मुकाबला उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे असा कालही नव्हता,आजही नाही आणि उद्याही नसणार..
डाव जेव्हा पटावर सुरू होतो तेव्हा खेळणारे खेळाडू हे फक्त माध्यम असतं,मुळ मुद्दा असतो "पणाला" काय लागलं आहे याचा..
या खेळात एका बाजूला महाराष्ट्राचं सार्वभौमत्व,
आत्मसन्मान,निष्ठा तर दुसऱ्या बाजूला मुजोर हुकूमशाही भूमिका आणि अवमानकारक आपमतलबी,खुनशी अर्थकेंद्रित राजकारण यात विजय शिंदे किंवा ठाकरेंचा होण्यापेक्षा जो बळी मराठी अस्मितेचा जाणार आहे त्याला रोखणे कश्याहूनही अधिक महत्वाचं होतं..
काल मी सकाळी सात वाजल्यापासून शिवतीर्थावर हजर होतो,शेेकडो लोकांना भेटलो-बोललो,दुपारी थोडा वेळ मिळाला तेव्हा बीकेसीवरही जाऊन आलो,तिथला ‘इव्हेंट’
अनुभवला मग संध्याकाळचा शिवतीर्थावरील ऐतिहासिक मेळावा आणि त्यानंतर माध्यमांतली चर्चा अनुभवल्यानंतर काही मुद्दे जास्त महत्वाचे आहेत अन् सुटून जातायेत असं वाटलं म्हणून हा शब्दप्रपंच..
▪️कालचा मेळावा यशस्वी होणे हे शिवसेनेसाठी आणि ठाकरेंसाठी जितके गरजेचे होते त्याहून जास्त गरज होती मराठी माणसाची..
त्याला शिवसेनेचा किंवा ठाकरेंच्या पराभवात स्वत:चा पराभव दिसत होता,त्याच्या मुंबईतल्या अस्तित्वाला लागणारं नख त्याला अस्वस्थ करत होतं..
काल जी लाखो लोकं शिवतीर्थावर स्वयंप्रेरणेने हजर झाली ती शिवसेनेसाठी किंवा फक्त ठाकरेंसाठी आलेली नसून ती ‘स्वत:’साठी आली होती..
त्यांना स्पष्ट जाणीव होती ‘उद्धव बाळासाहेब ठाकरे’ नावाचा माणूस त्यांच्यासाठी लढतोय..त्याच्यासोबत उभं रहाणं ही आपली स्वत:ची गरज आहे..
▪️दोन्ही विचारमंचावर अनेकांची भाषणं झाली,
एकमेकांची मापं काढली,आरोप प्रत्यारोप केले परंतू मी ज्या लोकांशी बोललो त्यांचं म्हणणं हे कुठल्याही भाषणापेक्षा जास्त महत्वाचं होतं..
शाब्दिक फुलोरा नसलेली त्यांची आंतरिक तळमळ मनाला भिडत होती..
▪️शिवसेनेसाठी मराठी माणूस वापरण्यापेक्षा,मराठी माणसासाठीच शिवसेनेला वापरलं पाहिजे याचं भान सर्वपक्षीय लोकांंना आलेलं दिसलं म्हणूनच शिवसैनिकांच्या पारंपरिक समर्थकांपेक्षा वेगळी लोकं काल भेटली,बोलती झाली..शिवसेनेचा परीघ विस्तारतोय.
झालेलं राजकारण कुणासाठी किती फायद्याचं आणि तोट्याचं याचं गणित नेत्यांना खुशाल मांडूदेत पण हे सारं किळसवाण राजकारण सर्वसामान्य मराठी माणसाच्या जिव्हारी लागलंय..
“कुणीतरी आपल्याला फसवलंय-उल्लू बनवलंय” ही भावना मनात ठाण मांडून बसली आहे आणि त्याची सल तुम्हाला ठायी ठायी दिसेल अगदी कुठल्याही माध्यमातील शिंदे गटाची लाईव्ह भाषणं काढून बघा आणि त्याखालील प्रतिक्रिया वाचा तुम्हाला सर्वसामान्य माणसाच्या मनात असलेली खदखद जाणवल्याशिवाय राहणार नाही .मराठी.माणसाचा राग रोखण ४० पैशाच्या वेठबिगारीवर काम करणाऱ्या आयटी सेलच्या आवाक्याच्या बाहेरील गोष्ट आहे .ही ‘सुनामीच मोरारजीच्या वारसदारांना रोखणार आहे
▪️मा.उद्धवजी ठाकरे कमी बोलले हे खरं आहे पण ‘ते आले त्यांनी पाहिलं आणि त्यांनी जिंकलं’ असा तो अविर्भाव होता..
सत्य असत्याची सगळी फोलपटं उडून जावीत आणि नितळ प्रामाणिक स्वच्छ दिसावं तितकं पारदर्शी त्यांचं बोलणं होतं..
एकदा मनात घर केलं की फार स्पष्टीकरणाची गरज नसते
“मराठी माणसाची शिवसेना आणि शिवसेनेचा मराठी माणूस” हे समीकरण पुनःश्च एकवार अधिक ताकदीनं स्पष्ट झालं..
▪️दुसऱ्या बाजूला शिंदेंनी भलं मोठं लांबलेलं स्पष्टीकरण दिलं (वाचलं) यापूर्वीही ते विधानसभेत देऊन झालं होतं पण त्यांना कदाचित ठाऊक नसावे..
अर्थात त्यांनी वाचलेलंही नसावं की,"इतिहासाची जेव्हा पुनरावृत्ती होते तेव्हा तो ‘फार्स’ ठरतो"
कालचा बीकेसी इव्हेन्ट म्हणजे निव्वळ ठरलेला फार्स होता ...
▪️भाडोत्री आणलेली माणसं काही बोलण्याचा आधीच त्यांचे चेहरे सारं काही सांगत होते..
जल्लोष नसलेले श्रोते,मरगळ आलेलं विचारपीठ,गच्च बसलेले नेतेगण आणि स्वतः मुख्यमंत्र्यांनी आणलेलं उसणं अवसान काही काही कुणापासूनच लपलं नाही..
▪️शिंदे गटाची एक गम्मत आहे की,”ते जितकं बोलायला जातात तितके उघडे पडत जातात.”
एकदा यांनी तोंड उघडलं की त्यांची पत आणि इयत्ता दोन्ही कळते..
आता अश्या लोकांनी स्वत:ला ‘विचारांचं वारसदार’ वगैरे म्हणवून घेणं यापेक्षा मोठा विनोद नाही..
▪️सर्वात महत्वाचं म्हणजे काल महाराष्ट्रानं शिंदेंना नाकारलं नाही तर देवेंद्र फडणवीस यांनी जे नरेशन गेल्या दोनतीन वर्षात उभं केलं होतं ते या महाराष्ट्रीयन जनतेने लाथाडलं..
▪️शिंदेंच्या विचारपीठामागं दोन भल्या मोठ्या क्रेन होत्या आणि त्यांच्यावर मोठी फ्रेम टांगलेली होती,शिंदेंची अवस्था त्या फ्रेमसारखीच आहे .जमिनही सुटली वरुन भाजपने क्रेनवर टांगलय.
▪️कालच्या मेळाव्यामध्ये जनतेनं कुणाला नाकारलं असेल तर ते देवेंद्र फडणवीसांचं आत्मकेंद्रित राजकारण आणि भाजपचं सत्तापिपासू कटकारस्थान..
जर कुणी जिंकलं असलं तर तो सर्वसामान्य माणूस ज्यानं उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला जिंकवायचं ठरवलंय..
मराठी माणसाने आता आधिक सावध व्हावे कारण आपला इतिहास सांगतो " आपण लढाया जिंकतो पण युद्ध हारतो " आणि हि.तर फक्त सुरुवात आहे.
▪️शेवटी हा गट तो गट,गद्दारी खुद्दारी,बोके खोके हे सारे तत्कालीन मुद्दे आणि हो जाता जाता दिवार सिनेमातला एक प्रसंग आठवला ज्यात महानायक अमिताभ बच्चन हा स्वतःच्या अधःपतनाची शंभर कारणं देत “जावो पहले इसकी-उसकी साईन लेके आवो” असं सांगतो आणि सरतेशेवटी ज्या माणसानं त्याच्या हातावर “मेरा बाप चोर हैं” असं गोंदवलंय त्या माणसाची सही घेऊन या असं फुत्कारतो तेव्हा त्याची आई निरुपा राय त्याला उत्तर देते ,"विजय ,जिन लोगोकी तुम बात कर रहे हो वो कोई मेरे अपने नहीं थे लेकिन तुम तो मेरा खून थे तुमने अपने माँ के माथेपर कैसे लिख दिया की उसका बेटा ‘चोर’ हैं ?"
शिंदे गटातल्या चाळीस आमदारांनी आणि बारा खासदारांनी हा ‘दिवार’ सिनेमा नक्की आणि पुन्हा पुन्हा बघावा कारण त्यांनी स्वतःच्याच कपाळावर लिहून घेतलंय 'गद्दार'
आता त्यांना रोजच आपली-परकी विचारणार आहेत का? का? आणि का??
-डॉ. अमोल अशोक देवळेकर (पुणे)

