मानसिकता
आटपाटनगरातील चार मित्र अनेक दिवसांनी एकत्र भेटले. अनेक दिवसांनी भेटल्यानंतर सहाजिकच बऱ्याच गप्पा टप्पा रंगल्या. यामध्ये वसंत शासकीय अधिकारी, दीपक बँक कर्मचारी, फुलचंद व्यापारी तर राजू कॉन्ट्रॅक्टर. वसंता शाळेत असताना खेडेगावातून यायचा. मधल्या सुट्टीत शाळेत कुठेतरी कोपऱ्यात बसून एकटाच डबा खायचा. त्याचवेळेस दीपक, फुलचंद, राजू हे आपल्या आपापल्या घरी जाऊन जेऊन यायचे.
दीपकचा गावामध्ये ऐसपैस वाडा होता. त्याने बॅंकेत नोकरी धरली. गावाकडचा वाडा विकून ठाण्यात ब्लॉक घेतला. फुलचंदच्या वडिलांचा व्यापार होता तो त्याने वाढविला. राजू एक कामगाराचा मुलगा होता तो कॉन्ट्रॅक्टर बनला.
आज हे चार मित्र एकत्र आले त्यावेळेस वस्तुस्थिती अशी आहे की वसंता सरकारी नोकरीतून निवृत्त झाला आहे. मोठे फार्म हाऊस नि गाड्या, बंगला अशा राजेशाही थाटात राहतो.मित्रांच्या चर्चेत वसंताने आपले मन मोकळे करत म्हटले की मी शाळेत यायचो खूपच हाल व्हायचे. पण शिक्षण घ्यायचे हा वडिलांचा हट्ट होता. मधल्या सुट्टीत डबा खाताना मी नेहमी विचार करायचो. या गावात मला उभं राहायला देखील जागा नाही. मी खूप शिकेन, खूप पैसा मिळवून याच गावात राजा होऊन राहीन.
वसंताचे दुसरे मित्र सुखवस्तू होते. त्यांना परिस्थितीची काहीच झळ लागत नव्हती. शालेय जीवनात मोठे भरारी घेण्याचे विचार त्यांच्या बालमनात रुजतच नव्हते, येतच नव्हते. जगरहाटीप्रमाणे त्यांनी आपला संसाराचा, अर्थार्जनाचा मार्ग स्वीकारला. मात्र वसंताने बालपणीच जिद्दीने आपले ध्येय ठरविले होते. त्याचे वडील त्याला हट्टाने शिकायला पाठवत होते.
हा घटनाक्रम वरवर पाहता विशेष वाटत नाही. तथापि बालवयातच विशिष्ट ध्येयाने प्रेरित होणारी माणसे उत्तुंग यशाकडे जातात, परिस्थिती बदलवू शकतात हे वसंताने सिद्ध केले. उत्तुंग यशाकडे जाण्याची मानसिकता निर्माण होणे हे गरजेचे आहे. ही मानसिकता कधी संस्काराने, कधी मार्गदर्शनाने तर कधी प्रतिकूल परिस्थितीतून निर्माण होते. यातूनच माणसे घडत जातात.
वसंता आपल्या गरिबी आणि प्रतिकूल परिस्थितीचा विचार करत बसला असता आणि त्याने शालेय शिक्षण सोडून दिले असते तर तो उत्तम प्रशासकीय अधिकारी होऊन श्रीमंतीकडे पोहोचला असता काय?
दीपकच्या ऐसपैस वाड्याच्या ठिकाणी आज पाचमजली इमारत उभी आहे.दीपकला गावात स्वतःचे घर नाही.चिंतनाचा विषय मानसिकतेचा आहे आणि पालकांनी मुलांमध्ये उत्तूंग ध्येयवाद रूजवून त्यांची मानसिकता सुदृढ बनविणे गरजेचे आहे.
लेखक : पुण्यरत्न डॉ. चंद्रकांत शहासने
मो. ९८८१३७३५८५, पुणे.

