shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

नवरात्रीचे आत्मपरीक्षण : शत्रूस मारिता मारिता मरेतो झूंजेन!एक घर एक सैनिक!

नवरात्र विशेष लेख ९

नवरात्रीचे आत्मपरीक्षण :
शत्रूस मारिता मारिता मरेतो झूंजेन!
एक घर एक सैनिक!


नवरात्रीच्या निमित्ताने आपण शस्त्रधारी अष्टभूजादेवीची  उपासना करतो. कोणी उपवास करतो, कोणी नऊ दिवस पादत्राणे वापरत नाही. कोणी मौन पाळतं तर कोणी मनोभावे देवीची आळवणी करतं. आपली संकल्पना अनादी अनंताची आहे. त्यानूसार आपल्या प्रत्येक परिवाराची कुलदेवता, कुलदैवत असतं. हे कुलदैवत संकटकाळात आपलं रक्षण करतं. आपण देवीकडं मागणं मागतो नि काम झालं की देवीचा नवस फेडतो. म्हणजे देवी भक्ताच्या इच्छा पुरविते.

आपला देश पारतंत्र्यात असताना बालवयात स्वा. सावरकरांनी अष्टभूजादेवीसमोर एक मागणं मागितलं. माझा देश स्वतंत्र होऊ दे !

 स्वा.सावरकरांनी अगदी बालवयातच आपल्या भगूर या जन्मगावी घरातल्या अष्टभूजादेवीसमोर एक प्रतिज्ञा घेतली होती, जशी छत्रपती शिवाजी महाराजांनी रोहीडेश्वरासमोर घेतली होती. प्रतिज्ञेचा भावार्थ होता  "माझ्या देशाला स्वतंत्र करण्यासाठी मी शत्रूस मारिता मारिता मरेतो झूंजेन "! यानुसार ते वागले.

 त्यांनी अष्टभुजादेवीमध्ये स्वतंंत्रता देवीचे रुप पाहिले आणि अजरामर असे स्वतंत्रतेचे स्त्रोत्र लिहिले. या भगवतीदेवीमध्ये त्यांना सुर्याचे तेज दिसून आले. याठिकाणी हे समजून घ्यायला हवे की माता भगवती दुर्गा ही शक्तीची रुपे असून जोपर्यंत शक्तीची उपासना होणार नाही तोवर आपल्यावरील गुलामीचं संकट हटणार नाही अशी स्वातंत्यवीर सावरकरांची धारणा होती. जशी अष्टभुजा देवीच्या हातात शस्त्रे आहेत तशीच शस्त्रे आपणही हाती घेतल्याशिवाय देश स्वतंत्र होणार नाही. यासाठी सावरकरांनी सशस्त्र क्रांतीची घोषणा केली. सावरकरांचे आदर्श छत्रपती शिवाजी महाराज हे होते. महाराजांना तुळजाभवानीने भवानी तलवार दिली हे आपणास माहीतच आहे.  स्वतंत्रता देवीची आळवणी करताना सावरकर म्हणतात की माते, "तूजसाठी मरण ते जनन"  तूजविणं जनन ते मरणं !!
तर देविची उपासना कशी करावी याचे हे उत्तम उदाहरण आहे. देवी सांगते अगोदर शस्त्रसज्ज व्हा , समर्थ बना आणि सर्व अडथळे आणि संकटे दूर करताना मध्ये येणाऱ्या महिषासूरांचा वध करा. नवरात्र हा विररसाचा उत्सव आहे. दूष्टशक्तींवर सात्विकतेचा विजय आहे.  माणसानं जन्माला येऊन समाजकंटकांचा नायनाट करावा यासाठी उपासना करण्याचा संस्कार देणारा हा उत्सव आहे. सावरकरांनी ही उपासना पद्धती रूजवली आणि भारतीय स्वातंत्र्य लढ्यासाठी प्राणांची आहुती देणारे हजारो क्रांतीकारक देवी भगवती समोर शपथ घेऊन तयार केले. राष्ट्र ही माता आहे नि तिच्या वरील ब्रिटीश सत्ता हा महिषासूररूपी राक्षस आहे अशी असंख्य कवने त्या काळात गायली जायची. अशाच प्रकारच्या कविता पुस्तकात छापल्या म्हणून सावरकरांचे मोठे बंधू गणेश तथा बाबाराव सावरकर यांना ब्रिटिश राजसत्तेने अंदमानच्या कारागृहात काळ्यापाण्याची जन्मठेपेची शिक्षा भोगण्यासाठी पाठवले होते. तेथे शेकडो देशभक्तांनी ही शिक्षा आनंदाने भोगली. अनेकांना फासावरही लटकविण्यात आले, पण हे सारे त्यांनी स्वतंत्रतादेवीची उपासना म्हणून आनंदाने स्विकारले. ही खरी दुर्गेची उपासना. या देशभक्तांनी आपल्या रक्ताचं शिंपण घालून आपल्या संपूर्ण आयुष्याचं, कर्तृत्वाचं बलिदान मातृभूमीला अर्पण केलं. हे क्रांतीकारक जगभर, विदेशात पसरले होते. ते उच्चशिक्षित होते. त्यांनी देशासाठी केलेला त्याग ही त्यांची दुर्गोपासना !
आज आपण शेकडो वर्षांची गुलामगिरी झूगारून स्वतंत्र भारतात स्वातंत्र्य उपभोगत आहोत. आज देशासमोर अनारोग्य, पर्यावरणाचा नाश, भ्रष्टाचार, संस्कृती विनाश, फुटीरतावाद, निरक्षरता असे अनेक राक्षस स्वैरपणे जनतेला त्रास देत असून सामाजिक समरसतेच्या विनाशाचे मनसूबे रचताना दिसत आहेत. यासाठी आवश्यक आहे सावरकरवादी दुर्गोपासना ! एक घर एक सैनिक ! देशाला महासत्ता बनविण्यासाठी सर्व पातळ्यांवर शत्रूस मारिता मारिता लढेतो झूंजेन अशा मानसिकतेची दृढ उपासना !
उदयोस्तू जगदंब !

लेखक : चंद्रकांत शहासने
देशभक्तकोशकार
मोबाईल : ९८८१३७३५८५
close