संयुक्त अरब अमिरातमध्ये झालेल्या आशिया चषक स्पर्धेत तथाकथीत क्रिकेट सम्राट टिम इंडियाचे पितळ उघडे पडले आणि समस्त क्रिकेट जगतच हादरले. त्याचे कारण म्हणजे मजबूत व धारदार गोलंदाजीचा ताफा समजल्या जाणाऱ्या भारतीय गोलंदाजांची दुबईत पुरती तारांबळ उडाली होती. त्यातच जसप्रित बुमराहा व रविंद्र जडेजा सारखे महत्वाचे घटक संघापासून दुरावल्याने भारताच्या चिंतेत वाढ झाली व मिशन वर्ल्ड कपला नकळत हादराच बसला.
मात्र त्यानंतर भारतात विश्वचषक स्पर्धेच्या तयारीच्या दृष्टीने ऑस्ट्रेलिया व द. आफ्रिका संघ भारत दौऱ्यावर आले. त्याचा लाभ यजमान भारताला आपले खालावलेले मनोधैर्य उंचावण्यात झाले. प्रथम ऑस्ट्रेलियाविरूध्द तीन टि२० सामन्यांची मालिका झाली. त्यावेळी भारताने पहिले दोन्ही सामने जिंकून मालिकेवर कब्जा मिळविला व तिसऱ्या सामन्यात दानशूर कर्णाप्रमाणे पाहुण्या संघाला विजयाची भेट देत आपण पाहुणचारातही मागे राहात नसल्याचे दाखवून दिले.
कांगारू भारतात होते तोच द. आफ्रिका संघ प्रत्येकी तीन टि२० व वनडे सामन्यांच्या मालिकेसाठी डेरेदाखल झाला होता. रोहित शर्माच्या नेतृत्वात भारताने पहिला टि२० सामना गमावल्यानंतर पुढचे दोन सामने जिंकून मालिका खिशात घातली. त्यानंतर रोहित आपला संघ घेऊन विश्वचषक स्पर्धेपुर्वी ऑस्ट्रेलियातील वातावरण व खेळपट्टयांशी जुळवून घेण्यासाठी तीन आठवडे आधीच ऑस्ट्रेलिया गाठले.
नेमके त्याच वेळी भारत दौऱ्यावर आलेल्या द.आफ्रिकेने तीन वनडे सामन्यांची मालिका खेळली. पावसाने बाधीत पहिल्या सामन्यात द.आफ्रिकेने भारताचे मोठे आव्हान लिलया पार केले व मालिकेत आघाडी घेतली. मात्र त्यांनतर शिखर धवनच्या नेतृत्वाखालील टिम इंडियाने उर्वरीत सामने जिंकून मालिका खिशात घातली.
ऑस्ट्रेलिया व द. आफ्रिकेविरूद्ध टि२० मालिकेत भारताची फलंदाजी झकास झाली. मात्र शेवटच्या डेथ ओव्हर्स मध्ये गोलंदाज निष्प्रभ ठरले. गोलंदाजांच्या नाकर्तेपणामुळे हातातोंडाशी आलेले दोन सामने भारताला गमवावे लागले. शिवाय क्षेत्ररक्षणात भारताची कामगिरी अतिशय गचाळ होत असल्याने चिंतेत वाढ झाली आहे. एक आकडेवारी बघितली तर प्रत्येक जण चकीत होईल. भारताच्या क्षेत्ररक्षकांनी मागच्या वीस सामन्यात ३७ झेल सोडले आहेत. त्यामुळे शेवटच्या षटकातील गोलंदाजीपेक्षा क्षेत्ररक्षण सुधारणे भारतासाठी जास्त महत्वाचे व गरजेचे आहे.
भारताचा संघ द्विपक्षीय मालिकेत सातत्याने यशस्वी असल्याने काही टिकाकारांनी भारताला "द्विपक्षीय मालिकांचा विश्वविजेता " असं कुत्सीतपणे म्हणायला सुरुवात केली. त्याचं कारण असं की, टिम इंडिया द्विपक्षीय मालिका मग मायदेशात असो वा परदेशात, कोणत्याही प्रकारे जिंकतात. मात्र आयसीसीच्या विश्वचषक स्पर्धात सडकून मार खात आहेत. नेमकं याचं कारण शोधण्यात तज्ञ मंडळी गढून गेली आहे.
या सर्व धामधुमीत जसप्रित बुमराहा, रविंद्र जडेजा पाठोपाठ दिपक चहार हा आणखी एक मोहरा दुखापतीने गळून पडला. तर बुमराहाचा वारसदार शोधण्यासाठी मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज व शार्दूल ठाकूर यांना ऑस्ट्रेलियात पाठविणार आहेत. मात्र १५ ऑक्टोबर पर्यंत या तिघांमधील कोणाची लॉटरी लागणार हे अधिकृतरित्या समजेल.
कर्णधार रोहितला विश्वविजेतेपद मिळविण्याचं शिवधनुष्य पेलायचे असेल तर सर्व प्रथम रोहितलाच आघाडीवर राहून
संघांचा डोलारा सांभाळायचाच नाही तर संघातील वातावरण खेळीमेळीचं ठेवण्याचं अवघड कार्य पार पाडायचं आहे. कारण यापूर्वी अनेक आयसीसी स्पर्धात टिम इंडियाने निर्णायक सामन्यातच मान टाकण्याचा प्रकार सातत्याने घडला आहे. याचे कारण निव्वळ मैदानातील खालावलेली कामगिरी नसून अतंर्गत राजकारण व धुसफूस होती हे आता चव्हाट्यावर आले आहे. त्यामुळे कर्णधार रोहितला खेळाबरोबरच संघातील वातावरण नियंत्रणात ठेवण्याचे देखील मोठे आव्हान असल्याने विश्वविजेते ठरण्यासाठी सर्वच आखाडयांवर बाजी मारावी लागेल.
लेखक -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
ग्लोबल वर्कींग कमिटी मेंबर ऑफ डब्ल्यूसीपीए.
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com

