shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

जिल्हा पोलीस दलातली कारनामे चव्हाट्यावर...! 'यां'नीच गार्ड अंमलदार आघावला आत्महत्या करण्यास भाग पाडले ! मयत आघावचा मुलगा प्रेमकुमारनं दिली फिर्याद ..!

राहुरी – तालुक्यातल्या मुळा डॅम येथे गार्ड अंमलदार म्हणून तात्पुरत्या नेमणुकीला असलेल्या पोलीस काँस्टेबल भाऊसाहेब आघावच्या आत्महत्येची ‘स्युसाईड नोट’ व्हायरल झाली आणि पो. काँ. आघाव यांच्या आत्महत्येस कारणीभूत असलेल्या ‌महाभागांचा उलगडा झाला.



दरम्यान, या आत्महत्येला कारणीभूत असलेल्या राजूर आऊट पोस्ट पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक साबळे, सहाय्यक फौजदार निमसे, महिला पोलीस कर्मचारी राऊत आणि एसपी आॅफिसमध्ये क्लार्क या पदावर कार्यरत असलेल्या शिवाजी फुंदे आदींविरुध्द काय व्हायची ती चौकशीअंती कारवाई होईल तेव्हा होईल. पण या सर्वांच्या स्वार्थी आणि हावरटपणाच्या बजबजपुरीत नगर जिल्हा पोलीस दलानं एक पोलीस कर्मचारी गमावलाय.


'सुसाईड नोट'
राजकारणात विरोधकांना बदनाम करण्यासाठी भादंवि ३७६ अर्थात महिला अत्याचाराच्या गुन्ह्याचा सर्रास गैरवापर होतो, ही वस्तुस्थिती आहे. परंतू मुरब्बी आणि धूर्त राजकारण्यांप्रमाणंच नगर जिल्हा पोलीस दलातली विनयभंगाच्या गुन्ह्याचा वापर करुन सहकारी कर्मचार्‍याला मृत्युच्या दाढेत ढकलून देण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आला, हे खर्‍या अर्थानं दुर्दैवी आहे.



या घटनेच्या निमित्तानं नगर जिल्हा पोलीस दलातली घुसमट काही अंशी चव्हाट्यावर आली. अकोले तालुक्यातल्या राजूर आऊटपोस्ट पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक साबळे, सहाय्यक फौजदार निमसे, महिला पोलीस कर्मचारी राऊत आणि नगर एसपी ऑफिसमध्ये क्लार्क या पदावर नेमणुकीला असलेल्या शिवाजी फुंदे या चौघांमुळे पोलीस कर्मचारी भाऊसाहेब आघाव यांनी आत्महत्येचा टोकाचा निर्णय घेतला, असं पोलीस कर्मचारी आघाव यांचा २३ वर्षीय मुलगा प्रेमकुमार यानं दिलेल्या फिर्यादीवरुन प्रथमत: दिसून येतंय.



मयत पोलीस कर्मचारी आघाव यांची नेमणूक पोलीस मुख्यालयात होती. मात्र त्यांना राहुरी तालुक्यातल्या मुळा डॅम परिसरात गार्ड अंमलदार म्हणून तात्पुरती नेमणूक देण्यात आली होती. यापूर्वी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकोले दौर्‍यात पोलीस कर्मचारी आघाव यांची नेमणूक करण्यात आली होती. त्यावेळी राजूर आऊटपोस्ट पोलीस ठाण्याचे
सहाय्यक पोलीस निरीक्षक साबळे हे मयत पोलीस कर्मचारी आघाव यांना भेटले.

मयत पोलीस कर्मचारी आघाव यांच्यामुळे दोन नंबर अवैध धंद्यांचें कलेक्शन बंद झाल्याचे आणि त्यावरुन मयत पोलीस कर्मचारी आघाव यांच्याविरुध्द सपोनि साबळे यांनी हे सारं षडयंत्र रचल्याचं समोर आलं.

एसपी ऑफिसच्या फुंदेविषयी जिल्हा पोलीस दलात संताप !

नगर जिल्हा पोलीस कार्यालयात क्लार्क या पदावर कार्यरत असलेल्या शिवाजी फुंदे या कर्मचार्‍याची या षडयंत्रामध्ये मोठी भूमिका आहे. एखाद्या पोलीस कर्मचार्‍याला वरिष्ठांमार्फत विभागीय चौकशी सुरु करण्याची धमकी देत त्याच्याकडून पैसे उकळणं, रजा मंजूर करण्यासाठी पैशांची मागणी करणं, पैसे न देणार्‍या एखाद्या पोलीस कर्मचार्‍याविषयी वरिष्ठांची कानभरणी करणं, वरिष्ठांना अंधारात ठेवून परस्पर ‘उद्योग’ करणं, असे अनेक विक्षिप्त प्रकार फुंदेनं केल्याची जिल्हा पोलीस वर्तुळात आता दबक्या आवाजातली चर्चा ऐकायला मिळतेय. एक दोन नव्हे सात ते आठ पोलीस कर्मचार्‍यांचा हा अनुभव असून फुंदेविषयी नगर जिल्हा पोलीस दलात कमालीचा संताप व्यक्त होतोय.


संघटने अभावी पोलीस कर्मचार्‍यांची होतेय मुस्कटदाबी !
‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ असं ब्रीद असलेल्या नगर जिल्हा पोलीस दलातच असे अनेक ‘खल’ पावलोपावली असल्याचं या घटनेच्यानिमित्तानं खासगीत बोललं जातंय. सामान्यांचं संरक्षण करणार्‍या पोलीस कर्मचार्‍यांचं आर्थिक शोषण करणारे नगर जिल्हा पोलीस दलातले ‘सरकारी बाबू’ प्रामाणिक पोलीस कर्मचार्‍यांच्या जीवावर उठले आहेत. परंतू दुर्दैवानं पोलीस कर्मचार्‍यांना सरकारी नियमाप्रमाणं संघटित होता येत नाही, संघटना स्थापन करुन ‘हमारी माँगे पूरी करो’, अशी बोंब ठोकता येत नाही. त्यामुळे संघटनेअभावी पोलीस कर्मचार्‍यांची मुस्कटदाबी होत असल्याचं प्रकर्षानं समोर येत आहे.
close