shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

यशस्वी शेतकरी..!


काल जुन्या पिढीतील एका समृध्द शेतकऱ्यांचे सोबत मनमोकळ्या गप्पा झाल्या.. न परवडणारी शेती होता विषय..

*जुन्या शेती पध्दतील मधील बारकावे त्यांनी सांगितले.. आमच्याकडे असलेल्या एकूण क्षेत्रातील निम्मे क्षेत्र मालदांडी ज्वारी साठी राखीव असायचे.. ज्वारी मध्ये कर्डई पेरली जायची.. संपूर्ण चारा वाळवला जायचा.. मोठमोठ्या वळह्या घातल्या जायच्या.. वळ्हई रचणे म्हणजे एक कला होती.. चाऱ्याच्या प्रत्येक स्तरावर मिठाचे पाणी शिंपडले जायचे..त्यामुळे खारेपणा यायचा..

बाजरी केली जायची .. बाजरी मध्ये मठ, मुग, कुळीद, उडीद, इरुड म्हणून टाकले जात.. मध्येच तुरीचे पाट टाकले जायचे.. बाजरी सोंगली की बाजरी काढण्यासाठी घाई नसायची.. बाजरी ची सुडी लागायची.. व बाजरीच्या रानात मशागत करुन गहू ,हरबरे  रब्बी हंगामात टाकले जात..

*ज्वारी ,गहू, हरबरे, बाजरी, मठ, मुग,कुळीद, तुर यांचे खळे पावसाळा पूर्ण संपल्यानंतर निवांत चालायचे.. त्यामध्ये निघालेले गव्हाच्या काडाचे भुस, बाजरीच्या बणग्या, उडीद,मठ,मुग,हरबराचे काड.. ज्वारी चे भुस.. सगळे एका कोपीत टाकले जायचे... खाली गव्हाचे भुसाचा स्तर.. त्यावर मीठ मारले जायचे.. त्यावर बणग्या.. त्यावर हरबरा काड.. त्यावर मठाचे ,कुळीद, ज्वारी चे स्तर.. प्रत्येक स्तरावर मीठाचे पाणी.. असा हा भुसारा उन्हाळ्यात तयार व्हायचा..*
प्रत्येक शेतकरी आपल्या दारात गाई, म्हशी बैलं मुबलक सांभाळायचा.. गायी व बीना कामाची जनावरं रोज चारण्यासाठी सोडली जायची.. प्रत्येक गावात गुरे चारायला नेणारे गुराखी असायचे.. जनावर ते चारायला घेऊन जायचे व तो शेतकरी बदल्यात राखोळी द्यायचा.. सकाळी जनावरे घेऊन जायचे व संध्याकाळी आणून घालायची.. रानावनात गायराणात जनावरे घरून येत.. त्यामुळे शेतकऱ्यावर दिवस भर जनावरे सांभाळण्याची चिंता कधीच नव्हती..

*कामाची बैलं जास्त असत.. एकदा फेब्रुवारी मध्ये गहू हरबरे सोंगली की शेतकरी खरा कामाला लागणार.. बैलांकरवी नांगरट करणार.. एकमेकाला मदत करणार.. ज्याला सावड म्हणायचे.. काही दिवस मी व माझ्या बैलांनी तुम्हाला मदत करायची व नंतर तुम्ही मला.. एकदा शिवार नांगरुन झाले की लगेच ढेकळं फोडणे.. वखरपाळी करणे सुरु व्हायचे..*
कुठलीही करमणूक नसल्यामुळे शेतकरी एक वखरपाळी झाली कि दुसरी करायचा.. उन्हाळ्यात शेतातील माती हालवत रहायचा.. तापलेली माती सारखी हलवत राहणे.. त्यामुळे मोठा ढेकुळ बारीक मऊ माती मध्ये रुपांतरीत व्हायचे...

*दिवसभर औतामागे चालून थकलेला शेतकरी जेऊन झोपायचा.. जेवणासाठी शेतात पिकलेले मठ मुग उडीद तुर, तर संध्याकाळी रानात चरुन आलेल्या जनावरांचे पौष्टिक दुध.. घरात असलेली ज्वारी बाजरी चे धान्य.. जनावरांना खाण्यासाठी कडब्याची वळ्हई.. पावसाळ्यात भुसाऱ्यामधील भुस.. त्यात त्या जनावरांना चंदी म्हणून सर्व धान्यांचा एकत्रीत भरडा भिजवून भुसात मिसळून दिले जायचे.. ती जनावरांची मेजवानी.. सकस आहार..

दारामध्ये असलेल्या जनावरांचे शेण रोज साचवले जायचे.. रानावनात वनस्पती सेवन केल्यामुळे जनावरांचे शेण देखील एक दमदार खत होते.. उन्हाळ्यात खत रानात टाकून स जमीनी सुपिक केल्या जात..
*पहिल्या पावसात हवेत असलेले नत्र जमीनी वर पडायचे... उन्हाने तप्त झालेल्या मातीच्या प्रत्येक कणात नत्र पासुन भरले जायचे.. त्यामुळे रासायनीक खत न टाकता पिक जोमात येत.. उन्हाळ्यात माती हलवत असताना उन्हात गवताचे बी निष्प्रभ होत.. त्यामुळे शेतात तण होत नव्हते व तणनाशक मारावे लागत नसत..
मला खूप शिकायला मिळाले.. खूप लिहावेसे वाटते.. रात्रंदिवस शेतात राबणाऱ्या शेतकऱ्यांचे जीवन फक्तं कामासाठी होते.. त्याला बाहेरचे जग बघायला वेळ नव्हता .. म्हणून शेतकरी कधीच निराश नव्हता.. त्याची कुणाकडून अपेक्षा नव्हती .. त्यामुळे अपेक्षा भंगाचे दख: नव्हते

संजय भास्करराव काळे
कोपरगाव.

close