नगर : अहमदनगरमधील महत्त्वकांक्षी उड्डाणपुलासाठी आनंद होत आहे. दिवंगत माजी खासदार दिलीप गांधी यांनी यासाठी पाठपुरावा केला आणि त्यानंतर विद्यमान खासदार डाॅ. सुजय विखे पाटील यांनी सर्व अडथळ्यांवर मात करत हा उड्डाणपूल पूर्ण केला. याशिवाय औरंगाबाद-अहमदनगर-मुंबई, या एक्सप्रेसवेमुळे अहमदनगर देशाच्या नकाशावर येईल, असा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.
अहमदनगरमधील पहिल्या उड्डाणपुलाचे डिजिटल लोकार्पण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते आयाेजित कार्यक्रमात बाेलत हाेते. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, महापाैर राेहिणी शेंडगे, माजी मंत्री आमदार राम शिंदे, खासदार सदाशिव लाेखंडे, खासदार डाॅ. सुजय विखे पाटील, आमदार माेनिका राजळे, आमदार बबनराव पाचपुते, राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार संग्राम जगताप, माजी आमदार स्नेहलता काेल्हे, शिवाजी कर्डिले, बाळासाहेब मुरकुटे, शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे, जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, माजी नगरसेवक सुवेंद्र गांधी, जिल्हाधिकारी डाॅ. राजेंद्र भाेसले, महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक प्रफुल्ल दिवाण यांच्यासह अधिकारी उपस्थित हाेते.
नितीन गडकरी म्हणाले, अहमदनगरचा महत्त्वकांक्षी उड्डाणपुलाचे लाेकार्पण करताना आनंद हाेत आहे. या उड्डाणपुलाच्या मागणी करताना दिवंगत माजी खासदार दिलीप गांधी यांनी बराच पाठपुरावा केला. त्यांच्यानंतर विद्यमान खासदास डाॅ. सुजय विखे पाटील यांनी बराच पाठपुरावा केला. त्यातील अनेक अडथळे त्यांनी दूर केले. एकप्रकारे अडथळ्यांची शर्यत त्यांनी दूर केली आणि उड्डाणपूल उभा राहिला. उड्डाणपुलाच्या खांबावर खासदार विखे पाटील यांच्या संकल्पनेतून शिवचरित्र रेखाटले जात आहे आणि या संकल्पनेला राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी देखील बळ दिल्याचा आनंद आहे. केंद्रीय मंत्री झालाे, तेव्हा अहमदनगर जिल्ह्यामध्ये २०२ किलाेमीटर राष्ट्रीय महामार्ग हाेता. ताे आज ८६९ किलाेमीटर झाला आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या आठ वर्षात ३६ कामे मंजूर झाली असून १३ कामे पूर्ण झाली आहेत. अहमदनगर जिल्ह्यात २४ कामे प्रगतीपथावर आहेत. यात आणखी सहा कामे प्रस्तावित आहेत. या कामांची किंमत १७ हजार २२८ काेटी रुपये एवढी आहे. अहमदनगर जिल्ह्यात जवळपास ३० हजार काेटी रुपयांची कामे प्रस्तावित असल्याची माहिती मंत्री गडकरी यांनी दिली.
अहमदनगर खऱ्या अर्थानं देशाच्या नकाशावर येणार आहे. उत्तर आणि दक्षिणला जाेडणारा मुंबई ते दिल्ली हा राष्ट्रीय नवीन ग्रीन एक्स्प्रेसवे बांधला जात आहे. त्यात सुरत-नाशिक-अहमदनगर-साेलापूर-अक्कलकाेट-चैनई हा साेळाशे किलाेमीटरचा महामार्ग असून हा ८० हजार काेटी रुपयांचा प्रकल्प आहे. या प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी पुन्हा अहमदनगरला येईल, अशी ग्वाही मंत्री गडकरी यांनी दिली. या महामार्गाची अहमदनगर जिल्ह्यातील लांबी १४१ किलाेमीटर आहे. पंजाब, हरिणाया, उत्तरप्रदेश, राजस्थान, गुजरात, दक्षिणेत जाणारी वाहतूक मुंबई, पुणे, साेलापूर काेल्हापूर जात हाेती, ती या महामार्गामुळे अहमदनगरमधून जातील. त्यामुळे येणाया काळात अहमदनगर हे लाॅजिस्टिक बनल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास मंत्री गडकरी यांनी सांगितले. याच प्रकल्पाला दक्षिणेतील राज्य जाेडली जाणार असून, हा द्रुतगती महामार्ग अॅक्सेस कंट्राेल असणार आहे. या महामार्गासाठी साेलापूर जिल्ह्यात जमीन हस्तांतराची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. अहमदनगर जिल्ह्यात खासदार डाॅ. सुजय विखे पाटील यांच्या मदतीने जमीन हस्तांतराची प्रक्रिया पूर्ण हाेत आहे. याचबराेबर या महामार्गालगत राज्य सरकारकडून राेजगार निर्मितीचे प्रकल्प हाती घेण्यासाठी महसूलमंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुढाकार घ्यावा, असेही आवाहन मंत्री गडकरी यांनी यावेळी केले.
अहमदनगर-पुणे राेडवर दुमजली राेड
याचबराेबर पुणे-औरंगाबाद हा २६८ किलाेमीटरचा नवीन महामार्ग बांधत असून, त्यासाठी ११ हजार काेटी रुपयांचा खर्च प्रास्तावित करण्यात आला आहे. हा ग्रीन फिल्ड महामार्ग सहा पदरी असणार आहे. पुणे-अहमदनगर- औरंगाबाद-बीड जिल्ह्यातून हा महामार्ग जाणार आहे. हा महामार्ग पुढे जालना जिल्ह्याला जाेडला जाणार आहे. तेथून नागपूरला समृद्धी मार्गाला जाेडला जाणार आहे. या दाेन्ही महामार्गामुळे अहमदनगरचा विकास साधला जाणार असल्याचे मंत्री नितीन गडकारी यांनी सांगितले. मात्र पुणे-शिरूर-अहमदनगर- औरंगाबाद हा फारच अडचणीचा आहे. वाहतूक काेंडी हाेते. हा रस्ता चांगला करण्यासाठी पुढाकार घेतला असून, अहमदनगर-पुणे मार्गावरील वाघाेली, शिक्रापूर, रांजणगाव, शिरूर दरम्यान हाेणारी वाहतूक काेंडी साेडविण्यासाठी रामवाडी-वाघाेली-शिरूर दरम्यान ५६ किलाेमीटरचा दुमजली राेड बांधणार आहे. म्हणजेच १८ लेनचा हा राेड हाेईल, अशी माहिती मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.
अहमदनगरमधून बंगलाेरला जाता येणार
पुणे-बंगलाेर महामार्गासाठी पुढाकार घेतला आहे. यासाठी ४२ हजार काेटी रुपयांची तरतूद केली आहे. पुण्याचा रिंगराेडची तयारी सुरू आहे. पुणे- औरंगाबाद रस्ता पुणे रिंग राेडला जाेडला जाणार आहे. यामुळे अहमदनगरमधून बंगलाेरला सहा तासात पाेहाेचू शकता, असे मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.
इथेनाॅल तयार करण्याचे आवाहन
अहमदनगर जिल्ह्यात पायाभूत विकास वेगाने हाेत आहे. शेतीचा विकास वेगाने हाेत आहे. अहमदनगर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी इथेनाॅलची नवीन अर्थव्यवस्था निर्माण केली आहे. यामुळे साखर कारखान्यांच्या प्रमुखांनी साखर कमी तयार करा, अन् इथेनाॅल जास्त उत्पादीत करा, असे आवाहन यावेळी मंत्री नितीन गडकरी यांनी केले. तंत्रज्ञानात वेगाने बदल हाेत आहे. पाण्यापासून ऑक्सिजन तयार हाेत आहे. भविष्यात शेतकरी हा अन्नदाता हाेण्याबराेबर ऊर्जादाता हाेणार आहे, असे तंत्रज्ञान विकसित झाले आहे. आपला देश सध्या १६ लाख काेटी रुपयांचे इन्पाेट करताे आहे. अहमदनगर जिल्ह्यात उद्याेजकता आहे. लाेकप्रतिनिधींनी विकासाची भूक थांबवू नये, असे आवाहन मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

