नगर : अहमदनगर शहरातील उड्डाणपुलाच्या लोकार्पण सोहळ्यात उड्डाणपुलासाठी ज्यांनी पाठपुरावा केला ते दिवंगत माजी खासदार दिलीप गांधी यांच्या योगदानाचे कौतुक झाले. याशिवाय उड्डाणपुलाच्या खांबावर शिवचरित्र रेखाटण्यासाठी पुढाकार घेतला म्हणून खासदार सुजय विखे पाटील यांच्याबरोबर आमदार संग्राम जगताप यांचेही कौतुक झाले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीही आपापल्या त्यांचे कौतुक भाषणात केले.
मात्र कार्यक्रमाच्या अगदी शेवटी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिवंगत नेते अनिल राठोड यांच्या योगदानाचा उल्लेख केला. अहमदनगरमधील शिवसेना कार्यकर्त्यांचा रोष नको म्हणून बाजू सावरण्याचा हा प्रयत्न होता, अशी चर्चा त्यानंतर सुरू झाली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी भाषण संपून व्यासपीठ सोडत असताना पालकमंत्री विखे पाटील यांनी ऐनवेळी शिवसेनेचे दिवंगत उपनेते राठोड यांची आठवण काढून सावरासावर केली. हे ठाकरे तसेच शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना देखील रुचले नाही.
अहमदनगर शहरातील उड्डाणपुलाचे आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत लोकार्पण झाले. पालकमंत्री विखे पाटील आणि खासदार विखे पाटील यांनी या कार्यक्रमातून एकप्रकारे शक्तीप्रदर्शन केले. उड्डाणपुलाच्या कामाचा श्रेयवाद हा सुरुवातीपासूनच रंगला आहे. खासदार सुजय विखे पाटील यांनी या श्रेयवादात शिवसेना कार्यकर्त्यांचा रोष ओढवून घेतला होता. उद्घाटनापूर्वी उड्डाणपुलाची आमदार संग्राम जगताप यांच्याबरोबर पाहणी करताना शिवसेनेचे दिवंगत उपनेते अनिल राठोड यांचे नाव घ्यायचे ते विसरले होते. त्यावरून शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले होते. नाराज शिवसैनिकांनी थेट उड्डाणपुलावर जाऊन श्रीफळ वाढविला होता. यानंतर खासदार विखे पाटील यांनी कामाच्या व्यापात अनिल राठोड यांचे नाव घ्यायचे विसरून गेलो, अशी सारवासारव केली. खासदार विखे पाटील यांनी दिलगिरी देखील व्यक्त केली होती.
आजच्या लोकार्पण कार्यक्रमात देखील अनिल राठोड यांचा नामोल्लेख राहून गेला होता. ही बाब पालकमंत्री विखे पाटील यांना कार्यक्रमाच्या शेवटी लक्षात आली. आणि त्यांनी शेवटच्या क्षणी माईक हातात घेऊन अनिल राठोड यांच्या योगदानाबाबत कौतुक करत बाजू सावरली. मात्र त्यावेळी कार्यक्रम संपून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे व्यासपीठ सोडून निघाले होते.

