धनगर ऐक्य परिषदेच्या वतीने २१ नोव्हेंबर रोजी विशाल मोर्चाचे आयोजना संदर्भात दिले निवेदन.
इंदापूर प्रतिनिधी: महाराष्ट्र सरकारने धनगर समाजाच्या आरक्षणासाठी धनगड व धनगर या शब्दाची दुरुस्ती करण्याची केंद्राकडे तात्काळ शिफारस करावी या मागणीसाठी इंदापूर मध्ये २१ नोव्हेंबर रोजी विशाल मोर्चाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती धनगर ऐक्य परिषदेचे मुख्य समन्वयक शशिकांत तरंगे यांनी दिली.
मंगळवारी दिनांक १५ नोव्हेंबर रोजी व्याहळी येथून रॅली काढत शक्ती प्रदर्शन करत याबाबतचे निवेदन इंदापूर येथे तहसीलदार श्रीकांत पाटील यांना देण्यात आले.
यावेळी बोलताना शशिकांत तरंगे म्हणाले की, महाराष्ट्रातील धनगर समाज गेल्या ७५ वर्षापासून धनगड व धनगर या र आणि ड च्या फरकामुळे अनुसूचित जमातीच्या आरक्षणापासून वंचित आहे. त्यामुळे कर्नाटक, आंध्रप्रदेश, उत्तरप्रदेश, हिमाचलप्रदेश, छत्तीसगड या राज्यातील बारा जातींच्या हिंदी व इंग्रजी भाषेच्या उच्चारांच्या शब्दांच्या दुरुस्तीचा महत्वपूर्ण निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळांनी घेतला आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातील धनगर समाजाच्या या शब्द दुरुस्तीचा निर्णय मंत्रिमंडळाने तातडीने घ्यावा यासाठी महाराष्ट्र सरकारने शिफारस करावी व समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करावा अशी समाजाची मागणी आहे.
महाराष्ट्र सरकारने याची तातडीने दखल घेऊन केंद्राकडे शिफारस करावी अन्यथा धनगर समाजाच्या रोशाला राज्यकर्त्यांना सामोरे जावे लागेल. भविष्यात धनगर समाजाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येतील. त्याचा इंदापूर तालुका केंद्रबिंदू असेल इंदापूर तालुक्यातील शंभरहून अधिक गावांमध्ये घोंगडी बैठका घेऊन जनजागृती करण्यात आली आहे .राज्याने याची दखल घेतली नाही तर धनगर समाजाचे पाच हजार युवक उजनी धरणांमध्ये जलसमाधी घेतील असा इशारा देखील या वेळेस शशिकांत तरंगे यांनी दिला आहे. यावेळी धनगर समाजाचे समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

