प्रतिनिधी : आसावरी वायकर
सोलापूर : १७ / भाऊसाहेब गांधी यांच्या ९७ व्या जयंतीनिमित्त, 'भाऊसाहेब गांधी विविध सेवाभावी पुरस्काराचे' वितरण, पुण्याचे ज्येष्ठ समीक्षक, श्रेष्ठ इतिहास संशोधक डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते करण्यात आले.
वालचंद शिक्षण समूहाचे मानद सचिव डॉ. रणजीत गांधी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या समारंभात, विश्वस्त भूषण शहा, भाऊसाहेब गांधी प्रतिष्ठानचे सचिव प्रदीप पंडित,डाॅ.सदानंद मोरे,रवींद्र कर्वे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. ठाणे येथील विद्यार्थी विकास योजनेचे संस्थापक रवींद्र कर्वे यांना भाऊसाहेब गांधी सामाजिक प्रेरणा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयाचे निवृत्त प्राचार्य डॉ. शशिकांत हलकुडे यांना जीवनगौरव पुरस्कार, याच महाविद्यालयातील प्रा.डाॅ. भाग्येश देशमुख, वालचंद कला व शास्त्र महाविद्यालयाचे प्रा. सिद्धारुढ गुरुनाथारुढ होळी कट्टी, वित्त अधिकारी प्रदीप पंडित आणि सुरक्षा अधिकारी सुरेश व-हाडे यांना भाऊसाहेब गांधी सेवाभावी शिक्षक व शिक्षकेतर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
सत्काराला उत्तर देतांना कर्वे म्हणाले की,"मला लहानपणापासूनच सामाजिक कार्याची आवड आहे.इतरांना सेवा देण्याचा भाव आपल्यात असावा.त्यातून आनंद मिळतो.तो अवर्णनीय असतो.आपणही हा आनंद घेऊ शकता. निवृत्तीनंतरही आपण एखादे क्षेत्र निवडून त्यात योगदान द्यावे. शिक्षणासाठी एखादा तरी विद्यार्थी दत्तक घेऊन शैक्षणिक कार्यात मदत करावी" प्रा. डाॅ. देशमुख यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. मान्यवरांच्या हस्ते शिष्यवृत्तीचेही वाटप यावेळी करण्यात आले.
डॉ. सदानंद मोरे यावेळी बोलताना म्हणाले की"सेवा हे एक व्रत आहे;आपण सेवक आहोत. 'देणाऱ्याने देत जावे!! घेणाऱ्याने घेत जावे!! एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावेत, म्हणजे देणार्या व्यक्तीचे दातृत्व आपण घ्यावे' इतरांची सेवा करणे म्हणजे परमात्म्याची सेवा करण्यासारखे आहे. अनेकांतवादाचा सिद्धांत फक्त जैन धर्मानेच सांगितला आहे. तो सर्वांनीच व्यवस्थित समजून घेतला तर जगातील सर्व प्रश्न आपोआपच सुटतील व सर्वधर्मसम भावाची कल्पना सहज आपणास जोपासता येईल. म.गांधी म्हणतात, भांडवलदार संपत्तीचे मालक नसून ते विश्वस्त असतात. असे विश्वस्त होण्याचा आपणही प्रयत्न करु या" कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. ज्योती वाघमारे यांनी केले, तर प्रा. इन्जाल यांनी आभार मानले.
कार्यक्रमासाठी गांधी कुटुंबीय,विश्वस्त भूषण शहा,पराग शहा, समाजातील प्रतिष्ठित मान्यवर, विविध विभागातील प्राचार्य, उपप्राचार्य मुख्याध्यापक, पर्यवेक्षक,आजी-माजी प्राध्यापक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, पत्रकार,विविध वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

