क्वालालंपूर (मलेशिया) येथे मिस् व मिसेस् वर्ल्ड (हेरिटेज) स्पर्धा२०२२ मध्ये सौ. गौरीताई अशोक थोरात -तावरे ठरल्या उपविजेत्या.
इंदापूर प्रतिनिधी:क्वालालंपूर (मलेशिया) येथे दि. १४ ते १८ नोव्हेंबर दरम्यान मिस् व मिसेस् वर्ल्ड (हेरिटेज) स्पर्धा२०२२ वेगवेगळ्या राऊंड मध्ये पार पडल्या. यामध्ये भारताच्या सौ गौरीताई अशोक थोरात -तावरे यांना उपविजेतेपद विभागून मिळाले.यात विजेती मिसेस् थायलंड,उपविजेती मिसेस् इंडिया व मिसेस् नेदरलँड असे विजेते होते यात उपविजेती मिसेस इंडिया म्हणून झळाळत्या मुकुटासह सर्वात लोकप्रिय स्पर्धकाची ट्राँफी सौ गौरी अशोक थोरात- तावरे यांनी पटकावली.
सौ. गौरीताई थोरात- तावरे यांच्यावर इंदापूर तालुक्यासह सर्वदूर अभिनंदनचा वर्षाव होत असल्याचे दिसून येत आहे.
" मिसेस हेरिटेज इंटरनॅशनल" साठी सौ गौरीताई अशोक थोरात- तावरे यांची निवड करण्यात आली होती.
जागतिक स्तरावरील मिसेस व मिस हेरिटेज इंटरनॅशनल २०२२ ही स्पर्धा १४ ते१९ नोव्हेंबर २०२२ या कालावधीत क्वालालंपूर मलेशिया येथे आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचे स्वरूप 'मिस व मिसेस युनिव्हर्स 'सारखेच असते परंतु वेगळ्या स्वरूपात सादरीकरण करावे लागते.
या स्पर्धेत मिसेस गटात भारताचे प्रतिनिधित्व करण्याचा मान सौ गौरीताई अशोक थोरात यांना मिळाला . या अगोदर राज्य व राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा जिंकून भारतीय परंपरा जागतिक स्तरावर मांडण्याचा मान गौरीताई यांना मिळाला .ईप्लॅनेट सिंगापूर ही कंपनी या स्पर्धेची आयोजक तर मृणाल गायकवाड या भारतातर्फे नॅशनल डिरेक्टर आहेत.
राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत त्यांचे दुर्गराज रायगड या विषयावरील अप्रतिम सादरीकरण त्यांना विजेतेपदाचा मुकूट देऊन गेला होता.
गौरीताई यांची कौटुंबिक पार्श्वभूमी शेतकरी कुटुंबातील आहे. माहेर वालचंदनगर तर सासर लोणी देवकर येथील आहे. दोन्ही गावे पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात ग्रामीण भागातील आहेत.
गौरीताईंचे इयत्ता बारावी पर्यंतचे शिक्षण वालचंदनगर येथील भारत चिल्ड्रन्स अकॅडमी व श्री वर्धमान विद्यालय येथे झाले तर संगणक शास्त्रातील पदवी पुणे येथे संपादन केले आहे.
गौरीताईंचे पती अशोक रमेश थोरात हे महाराष्ट्र पोलीस दलात अप्पर पोलीस अधीक्षक(Additional S. P.) या उच्चपदावर कार्यरत आहेत. गौरीताईंना त्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी त्यांच्या पतींचे पूर्ण सहकार्य असते.
गौरीताई फक्त या स्पर्धेसाठी 'हेरिटेज' दाखविण्याचा प्रयत्न केला नाही तर आतापर्यंत त्या अक्षरशः हेरिटेज जगल्या आहेत.
हेरिटेज म्हणजे काय ? दीर्घकाळ टिकून असलेली मूर्त अमूर्त स्वरुपात मौलिक समजली जाणारी एखाद्या देशाची संस्कृती, इतिहास ,परंपरा, वारसा, थोर महापुरुषांचे गुणविशेष जतन करून ठेवणे आहे. गौरी ताईंनी गेली कित्येक वर्ष नेमके हेच केले आहे.
" साक्षात जिजाऊ" या जिजाऊ माँसाहेबांच्या धगधगत्या जीवन प्रवाहावर संपूर्ण महाराष्ट्रभर एक तासाचे एकपात्री १६० हून अधिक नाट्यप्रयोग सादर केले आहेत. महाराष्ट्रातील गड ,किल्ले, ऐतिहासिक ठिकाणे, लेण्या यावर त्यांचा अभ्यास आहेच परंतु तलवारबाजी, लाठी काठी, व घोडेसवारी यामध्ये त्या अत्यंत तरबेज आहेत.
अगदी लहानपणापासूनच त्यांची आई सौ विजयश्री व वडील विश्वजीत तावरे यांनी गौरीताईना किल्ले फिरून दाखविले व महाराष्ट्राचा जाज्वल्य इतिहास समजावून सांगितला त्याचाच दृश्य परिणाम म्हणजे गौरी ताईंचे हे यश.
या आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये गौरीताईंनी भारतीय संस्कृतीचा ठेवा आंतरराष्ट्रीय पातळीवर सादर करून उत्तुंग यश संपादन केल्याबद्दल तसेच वालचंदनगर व लोणी- देवकर गावाबरोबर इंदापूर तालुक्याचे नाव लौकिक केल्याबद्दल इंदापूर तालुका भाजप सोशल मीडिया उपाध्यक्ष विक्रमसिंह मोरे यांनी सौ गौरीताई यांचे अभिनंदन केले.

