आत्ताच्या सरकारच्या नाकर्तेपणामुळे मोठे मोठे प्रकल्प महाराष्ट्रातून दुसऱ्या राज्यात चालले.- विरोधी पक्ष नेते अजित पवार.
इंदापूर प्रतिनिधी: आत्ताच्या सरकारच्या नाकर्तेपणामुळे मोठे मोठे प्रकल्प महाराष्ट्रातून दुसऱ्या राज्यात चालले आहेत. लाखो तरुण-तरुणींचा रोजगार हिरावण्याचा अधिकार या सरकारला कोणी दिला असा प्रश्न राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी सत्ताधाऱ्यांना विचारला.
इंदापूर येथे माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे व पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या संकल्पनेतून आयोजित शरद कृषी महोत्सव २०२२ च्या युवा महोत्सवाच्या प्रसंगी मार्गदर्शन करताना अजित पवार बोलत होते.
यावेळी बोलताना अजित पवार यांनी सरकारवर प्रश्नांचा भडीमार करीत महापुरुषांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करण्याचा, महापुरुषांची बदनामी करण्याचा महिलांची बदनामी करण्याचा अधिकार या नेत्यांना कोणी दिला. कशासाठी इतिहास बदलायचे काम चालू आहे या मागचा खरा सूत्रधार कोण हे शोधणे गरजेचे आहे ? तसेच विकास कामे थांबविण्याचा अधिकार या सरकारला कोणी दिला ? आमचे सरकार होते परंतु आम्ही मागच्या सरकारची विकास कामे थांबविण्याचे पाप केले नाही.विकास कामे थांबवण्याची महाराष्ट्राची परंपरा संस्कृती नाही याचं भान या सरकारला राहिलेले नाही. असा घणाघाती आरोप अजित पवार यांनी केला.
यावेळी माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी आमदार अमोल मिटकरी, प्रदीप गारटकर ,हनुमंत कोकाटे,प्रशांत पाटील,हनुमंत बंडगर,अमोल भिसे,प्रताप पाटील, अभिजीत तांबिले, बाळासाहेब ढवळे, दीपक जाधव, श्रीमंत ढोले,सचिन सपकळ, नवनाथ रुपनवर,दिलीप वाघमारे,श्रीधर बाब्रस, छाया पडसळकर, रेहना मुलानी, सह अन्य मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
-
शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय..
शरद पवार साहेब कृषी मंत्री असताना देशाला अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनवण्याचे तसेच शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय,धवलक्रांती, ठिबकला प्रोत्साहन, आधुनिक शेतीसाठी कृषी विज्ञान केंद्रांची स्थापना,शेतीमालाला बाजारपेठ निर्माण करून देण्याचे काम करून शेतकऱ्यांच्या दारात आर्थिक सुबत्ता यावी यासाठी प्रयत्न केले.
-
तर बहुजनांची मुले कुठे शिकली असती..
यावेळी बोलताना अजित पवार यांनी चंद्रकांत पाटील यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा समाचार घेताना महात्मा फुले,सावित्रीबाई फुले यांनी जर शाळा काढल्या नसत्या तर बहुजनाची मुले कुठे शिकली असती ? मुठभर लोकांना शिक्षणाची संधी होती ती महात्मा फुलेंनी मोडून काढीत सर्वांना शिक्षणाची दारे उघडी केली. त्यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवून देण्याची वेळ आली आहे.
-
आपले मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री गप्प का ?
कर्नाटक विषयाच्या वादावर बोलताना अजित पवार म्हणाले, कर्नाटकचे मुख्यमंत्री हे सतत कर्नाटकच्या बाजूने बोलत आहेत मात्र आपले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यावर काहीच बोलत नाहीत त्यांनी यावर बोलले पाहिजे आरे ला कारे केले पाहिजे.

