माहिती सादर करण्याचे निवासी उपजिल्हाधिकारी राजेन्द्र पाटिल यांचे आदेश..!
देवळाली प्रवरा - दि. १९ डिसेंबर
अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्याच्या देवळाली प्रवरा हद्दीतील नागरिकांना शासनाच्या यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजने अंतर्गत पक्की घरे द्यावीत या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ क्षेत्राचे अध्यक्ष आप्पासाहेब ढूस यांनी अहमदनगरचे निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटिल यांची आज भेट घेतली असता तात्काळ माहिती सादर करण्याचे निवासी उपजिल्हाधिकारी राजेन्द्र पाटिल यांनी आदेश दिले आहेत..!
प्रसंगी प्रहार श्रमिक सेवा संघाचे सचिव बाळासाहेब कराळे, प्रहार श्रमिक सेवा संघाचे देवळाली प्रवरा शहर अध्यक्ष नवनाथ चव्हाण आदी उपस्थित होते.
निवेदनात म्हंटले आहे की, देवळाली प्रवरा येथील राहुरी फॅक्टरी परिसरात असलेल्या प्रसाद नगर भागात महाराष्ट्र शासन बांधकाम खाते दगडखान नावाने ०१ हेक्टर ५९ आर क्षेत्र गेली ४० वर्षे बंद अवस्थेतील दगडखान केवळ खराब सांडपाण्याची डबकी स्वरूपात जमिन पडून आहे.
प्रसाद नगर भागातील जवळपास दोन ते तीन हजार लोकसंख्येने वेढलेल्या या बंद दगड खाणीमध्ये नगर परिषदेने सार्वजनिक शौचालयाचे पाणी सोडलेले असल्याने पावसाचे पाणी व या शौचालयाचे पाणी तसेच नागरी वस्ती मधून वाहणारे इतर सांडपाणी या खाणीच्या खड्यात साचून या परिसरामध्ये कायम दुर्गंधी पसरलेली असते त्यामुळे या ठिकाणी डासांचे प्रमाण कधीही कमी होत नाही. या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांचे आरोग्य त्यामुळे कायम धोक्यात असते. त्याचबरोबर या खाणीमध्ये जवळपासची जनावरे व नागरिक पडून कित्येक वेळेस अपघात झालेले आहेत. त्यामुळे या बंद दगड खाणी येथील नागरिकांसाठी अत्यंत धोकादायक बनलेल्या आहेत.
महाराष्ट्र शासनाच्या यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेअंतर्गत भटक्या जमाती व विमुक्त जातीच्या नागरिकांसाठी जागा खरेदी करून पक्की घरे बांधून देण्याची योजना आहे. त्यानुसार प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चुभाऊ कडू यांनी महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत अमरावती जिल्ह्यातील मौजे जमापुर तालुका चांदूरबाजार येथे उपरोक्त योजनेतून भटक्या जमाती व विमुक्त जातीच्या नागरिकांसाठी जमीन खरेदी, घरकुल, सिमेंट रोड, सिमेंट नाली, व सभागृह करीता निधी उपलब्ध करून या योजनेचा राज्यातील पहिला यशस्वी प्रयोग करून तेथील नागरिकांना न्याय मिळवून दिला आहे. त्याच पद्धतीने देवळाली प्रवरा हद्दीतील भटक्या जमाती व विमुक्त जातीच्या नागरिकांना स्वतःची पक्की घरे मिळणे आवश्यक आहे. त्याचबरोबर या होणाऱ्या घरकुलांमध्ये लाभार्थी निवड करताना विधवा, परित्यक्त्या, विधुर, अपंग व अनाथ आणि वयोवृद्ध व्यक्तींचा प्राधान्य क्रमाणे समावेश होणे गरजेचे आहे.
म्हणून आपणास विनंती की, अमरावती जिल्ह्यातील मौजे जमापुर तालुका चांदूरबाजार च्या धर्तीवर देवळाली प्रवरा तालुका राहुरी जिल्हा अहमदनगर येथील प्रसादनगर भागामध्ये असलेल्या वरील महाराष्ट्र शासन बांधकाम खाते दगडखान जागेच्या क्षेत्रामध्ये जवळपास ४० वर्षे बंद असलेल्या दगड खाणीचे खड्डे बुजवून त्या ठिकाणी देवळाली प्रवरा हद्दीतील भटक्या जमाती व विमुक्त जातीच्या नागरिकांना घरकुल बांधून देणे कामी प्रस्ताव सादर करावा. त्याचबरोबर या योजनेचे लाभार्थी निवड करताना स्थानिक विधवा, परितक्ता, विदुर, अपंग व अनाथ आणि वयोवृद्ध व्यक्तींना त्यात प्राधान्यक्रमाणे समावेश करावा अशी विनंती निवेदनाच्या शेवटी आप्पासाहेब ढूस यांनी केली आहे.
या विषयी आमचे प्रतिनिधीशी बोलताना आप्पासाहेब ढूस म्हणाले की, प्रहार चे संस्थापक अध्यक्ष आ. बच्चुभाऊ कडू साहेब यांचे मार्गदर्शनाखाली व प्रहार चे जिल्हाध्यक्ष अभिजीत दादा पोटे यांचे सहकार्याने आम्ही देवळाली प्रवरा येथील नागरिकांना यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेअंतर्गत वसाहतीचे बांधकाम करून देवुन येथील भटक्या जमाती व विमुक्त जातीच्या नागरिकांना मोफत घरे मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार आहोत. त्याचा लाभ येथील विधवा, परितक्त्या, विदुर, अपंग, अनाथ, वयोवृद्ध नागरिकांसह भटक्या जमाती मधील गोसावी, बेलदार, भराडी, भुते, चित्रकथी, गारुडी, घिसाडी, गोंधळी, गोपाळ, जोशी, कोल्हाटी, नंदीवाले, पांगुळ, वासुदेव, बहुरूपी आणि विमुक्त जातीमध्ये असलेल्या बेरड, बेस्तर, भामटा, रामोशी, वडार, वाघरी, छप्परबंद आदी जातीच्या नागरीकांना त्याचा लाभ होणार आहे. व तो लाभ मिळवून देण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्ष पाठपुरावा करणार असल्याचे ढूस म्हणाले.

