shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

महाराष्ट्र शासनाचा ' कृषीनिष्ठ शेतकरी ' पुरस्कार संभाजी रेडके यांना प्रदान

महाराष्ट्र शासनाचा ' कृषीनिष्ठ शेतकरी ' पुरस्कार संभाजी रेडके यांना प्रदान
इंदापूर प्रतिनिधी: महाराष्ट्र शासन कृषी विभाग व पुणे जिल्हा परिषद पुणे यांच्या वतीने देण्यात येणारा 'पद्मभूषण आप्पासाहेब पवार कृषीनिष्ठ शेतकरी पुरस्कार' पडस्थळ गावचे संभाजी कैलास रेडके यांना देण्यात आला. सन २०१९ - २० या वर्षामधील इंदापूर तालुक्यातील ते एकमेव मानकरी ठरले आहेत. काल दि. २४ जानेवारी २०२३ रोजी इंदापूर  पंचायत समितीच्या सभागृहामध्ये इंदापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी (वर्ग १) विजयकुमार परीट, पशुवैद्यकीय अधीक्षक रामचंद्र शिंदे, कृषी अधिकारी राजेंद्र काळे, कृषी विस्तार अधिकारी युनूस शेख, उपअभियंता अनिल पवार यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार रेडके यांना प्रदान करण्यात आला.सन्मानपत्र, शाल,ट्रॉफी, पुष्पगुच्छ व रोख १०,००० रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
संभाजी रेडके हे स्वतः शेती  करीत असून आपल्या मनोगतामध्ये ते म्हणाले की, शेतकऱ्यांनी कोणत्याही पिकांना शिफारशीप्रमाणे खते दिली पाहिजेत, देसी वाणाची जपणूक करून शेणखताचा, जैविक खतांचा वापर केला पाहिजे. माती परीक्षण करून हिरवळीची खते घेणे गरजेचे आहे. शेतीचा हा वारसा मला चुलते हरिदास रेडके व वडील कै. कैलास रेडके यांच्याकडून मिळाला आहे. शेतकऱ्यांनी ठिबक सिंचनाचा वापर करणे गरजेचे आहे. 
हा पुरस्कार मिळाल्याबद्दल माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी रेडके यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.
रासायनिक खताचा कमी वापर, जैविक खते,शेणखत, हिरवळीची खते यांचा जास्तीत जास्त वापर, सौरऊर्जा, गोबर गॅस इत्यादी नैसर्गिक ऊर्जेचा वापर, पशुधन, देसी वाणाची जपणूक, इतर शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरतील अशी चारा पिके, फळे व भाजीपाला उत्पादन, ठिबक सिंचन पद्धती इत्यादी निकषांच्या बाबींवरती ही निवड करण्यात आली आहे. कृषी क्षेत्रातील योगदानाबद्दल २२ जुलै २०२१ रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे बंधू प्रल्हाद मोदी यांच्या हस्ते संभाजी रेडके यांना सन्मानित करण्यात आले होते.
close