समाजातील चांगली शक्ती, एक ना एक दिवस जागृत होवून, चांगले काम करेल अशी अपेक्षा - प्रदिप गारटकर
इंदापूर येथे विधायक उपक्रमांनी नवीन वर्षाचे स्वागत : शेकडो नागरिकांची कार्यक्रमाला उपस्थिती
इंदापूर प्रतिनिधी : देशातील आजपर्यंत सर्वाधिक पंचेचाळीस लाख नागरिक एकत्र आल्याचा इतिहास आहे. त्यामुळे त्यांनी दीडशे वर्षांची सत्ता उलटवून टाकली. समाजातील चांगली शक्ती, एक ना एक दिवस जागृत होवून, चांगले काम करेल अशी अपेक्षा आहे. तसेच चांगल्या विचाराच्या लोकांनी एकत्र येवून, देशाची प्रगती करणे शक्य होईल. असा आशावाद राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्र राज्य व्यसनमुक्त युवक संघ, शाखा इंदापूर, रचना उद्योग समूह, पतंजली योग समिती, आनंदग्राम सेवा प्रतिष्ठान वडापुरी, तसेच युवक मित्र बंडातात्या कराडकर यांच्या मार्गदर्शनाखाली ( दि. ३१ डिसेंबर २०२२ ) रोजी रात्री ११ वाजता, दारू नको दूध प्या हा अनोखा उपक्रम इंदापूर शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक खडकपूरा येथे राबविण्यात आला.
यामध्ये सहभागी झालेल्या युवक व नागरिकांना रचना देशी गोसंवर्धन केंद्र लोणी देवकर यांच्या वतीने मोफत सुगंधी दुधाचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर, युवा उद्योजक माजिदखान पठाण, धनंजय देशमुख, प्रशांत शिताप, ईश्वर फलफले यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी पतंजली योग समितीचे डॉ. संजय शिंदे, मल्हारी घाडगे, सचिन पवार, रविंद्र परबत, महेश निंबाळकर, आदर्श क्रीडा शिक्षक शरद झोळ, युवा क्रांती प्रतिष्ठानचे धरमचंद लोढा, बाळासाहेब क्षीरसागर, आदी तरुण युवक उपस्थित होते.
पुढे बोलताना प्रदीप गारटकर म्हणाले की, 'संपूर्ण महाराष्ट्रात जेष्ठ किर्तनकार बंडातात्या कराडकर यांच्या मार्गदर्शनाखाली व्यसनमुक्त संस्कारक्षम युवा पिढी घडवण्याचं कार्य कौतुकास्पद आहे. कोणत्याही राष्ट्राची युवा पिढी संस्कारक्षम असल्याशिवाय राष्ट्र उभारणी होऊच शकत नाही. समाजामध्ये व्यसनमुक्तीची क्रांती घडवायची असेल तर व्यसनमुक्त युवक संघाचा आदर्श सर्वांनी घ्यावा.असा सल्ला गारटकर यांनी दिला.
यावेळी विकास खिलारे, सचिन परबते यांनी मान्यवरांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.धनंजय देशमुख यांनी तर संतोष नरुटे यांनी सूत्रसंचालन केले आभार प्रशांत शिताप यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शहा ब्रदर्स आणि कंपनी, रचना उद्योग समूह त्याचबरोबर अस्लम शेख, अख्तर मोमीन, गणेश कांबळे, इंद्रनील देशमुख यांनी प्रयत्न केले.
फोटो ओळ : इंदापूर येथे उपक्रमाची सुरवात करताना
राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदिप गारटकर, रचना उद्योग समूहाचे प्रमुख व युवा उद्योजक माजिदखान पठाण व मान्यवर

