शिर्डी (प्रतिनिधी):
आंतरराष्ट्रीय किर्तीचे तीर्थक्षेत्र असलेल्या श्रीक्षेत्र शिर्डी शहरात साईभक्तांची वाढती संख्या लक्षात घेता शिर्डी शहराच्या पोलीस स्टेशनमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या देखील वाढवली गेली पाहिजे, ज्यामुळे साईभक्तांना आणखी मोठा आधार प्राप्त होईल अशी मागणी येथील सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार जितेश लोकचंदानी यांनी राज्याचे मुख्यमंत्री,गृहमंत्री आणि पोलीस महासंचालकांकडे एका पत्राद्वारे केली आहे.
या पत्रात त्यांनी पुढे म्हटले आहे की, शिर्डी हे श्री साईबाबांमुळे आंतरराष्ट्रीय किर्तीचे तीर्थक्षेत्र झालेले आहे. त्यामुळे येथे दिवसेंदिवस साईभक्तांची संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे, शहरातली देखील लोकसंख्या वाढली आहे. म्हणून शिर्डी येथे भव्य दिव्य पोलीस स्टेशनची इमारतही झाली आहे. मात्र येथे पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या त्या तुलनेत फारच कमी आहे.
शिर्डी व परिक्षेत्रातील गावांमध्ये वाढलेली अवैध व्यवसाय, त्यासोबतच गुन्हेगारी यामुळे शिर्डीमध्ये साई दर्शनसाठी येणाऱ्या व्हीआयपींची सुरक्षा करताना आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांची मोठी धावपळ होते, ताण - तणाव वाढतो. शिर्डी मध्ये उत्सवाच्या वेळी व सुट्ट्यांच्या वेळी लाखो साई भक्तांची येथे गर्दी होत असते, त्यासाठी विशेष बंदोबस्त बोलवण्यात येतो. त्यामुळे शिर्डी तीर्थक्षेत्राच्या शहराच्या पोलीस स्टेशन मध्ये देखील अधिकाधिक पोलीस कर्मचारी मनुष्य बळ यंत्रणा वाढवावी. जेणेकरून येथील पोलीस कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा बोजा पडणार नाही व तेही यशस्वीपणे काम करू शकतील. तरी आपण याबाबत लवकरात लवकर निर्णय घेऊन शिर्डी पोलीस स्टेशनसाठी पोलीस मनुष्यबळ यंत्रणा वाढवण्याचा प्रयत्न करावा. असेही श्री. लोकचंदानी यांनी पत्रात म्हटले आहे.

