एन.ई. एस. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील प्रत्येक विद्यार्थी शिस्तप्रिय व गुणवंत - सचिव धनंजय रणवरे.
दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न .
इंदापूर: निमसकर एज्युकेशन सोसायटी संचलित एन.ई. एस. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय निमसाखर (ता. इंदापूर) जि. पुणे या ठिकाणी इयत्ता दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव धनंजय सूर्यकांत रणवरे हे होते. तर पंढरपूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक शांताराम गाजरे हे प्रमुख अतिथी म्हणून लाभले होते. त्यांच्या समवेत पंढरपूर येथील एका वृद्धाश्रमाचे सचिव कचरूद्दीन शेख हेही उपस्थित होते.
त्यावेळी प्रमुख अतिथींचा सन्मान संस्थेच्या वतीने शाल श्रीफळ व बुके देऊन सन्माननीय सचिव यांनी केला.
या कार्यक्रमाप्रसंगी विद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांनी आपापली मनोगते व्यक्त केली व शिक्षकांबद्दलची कृतज्ञता व्यक्त केली. त्यावेळी विद्यालयातील अनेक शिक्षकांनी विद्यार्थ्यांना बहुमोल मार्गदर्शन करत बोर्ड परीक्षेसाठी खूप सार्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी शांताराम गाजरे सर आपल्या भाषणात म्हणाले की, हे जीवन खूप सुंदर आहे. हा जन्म पुन्हा नाही. जीवनातील प्रत्येक क्षणाचा आनंद घेतला पाहिजे. मैत्री खूप जपली पाहिजे. नियमित व्यायाम केला पाहिजे. योग्य आहार विहार केला पाहिजे. आई-वडिलांची सेवा केली पाहिजे नक्कीच आपण यशाच्या दिशेने पाऊल टाकू शकतो. सर्वांनी एकमेकांबद्दल आपलेपणाची भावना मनात रुजवली पाहिजे. संत महात्मे व थोर समाज सुधारक तसेच महापुरुषांच्या चरित्राचे व ग्रंथाचे नियमित वाचन केले पाहिजे असे सांगून सर्व विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.
विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेच्या शुभेच्छा देताना संस्था सचिव धनंजय सूर्यकांत रणवरे म्हणाले की, आपल्या विद्यालयातील प्रत्येक विद्यार्थी शिस्तप्रिय व गुणवंत आहेत. येथील सर्व कर्मचारी कष्टाळू व ज्ञानप्रिय आहेत. बोर्ड परीक्षेला सामोरे जाताना मनावरती कोणत्याही प्रकारचा ताण तणाव दडपण घेऊ नये. प्रत्येक पेपर आत्मविश्वासाने लिहिला जावा व आपल्या विद्यालयाची शंभर टक्के निकालाची परंपरा टिकून राहील याचा मला सार्थ आत्मविश्वास आहे. दहावीतील उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांनी पुढच्या वर्षी आपल्याच कनिष्ठ महाविद्यालयामध्ये प्रवेश घ्यावा असेही आव्हान यावेळी सचिव यांनी विद्यार्थ्यांना केले. व सर्व परीक्षार्थी विद्यार्थ्यांना मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा दिल्या.
अफाट परिश्रमाशिवाय पर्याय नाही. हे जीवन खूप स्पर्धामय व संघर्षमय बनले आहे. स्वतःची भूमिका स्पष्ट करताना अनेक समस्येला तोंड द्यावे लागणार आहे. परंतु जिद्द चिकाटी आत्मविश्वासाच्या जोरावर आपण भविष्यकालीन जीवनामध्ये नक्कीच यशस्वी व्हाल असा मोलाचा संदेश विद्यालयाचे प्राचार्य चंद्रकांत गोपाळराव रणवरे यांनी सर्व विद्यार्थ्यांना दिला. सर्वांनी खूप अभ्यास करा व प्रमाणिकपणे यश मिळवण्याचा प्रयत्न करा, असे मत प्राचार्यांनी यावेळी व्यक्त केले.
सर्व परीक्षार्थींना प्राचार्य यांनी मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा दिल्या. विद्यालयातील पदाधिकाऱ्यांनी इयत्ता पाचवी ते बारावीतील सर्व विद्यार्थ्यांना स्नेह भोजनाचे नियोजन केले व सर्व विद्यार्थ्यांनी त्याचा मनमुरादपणे आनंद लुटला.
कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक विभाग व तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता नववीतील विद्यार्थिनी साक्षी सोलंकर व सृष्टी जाधव यांनी केले.

