इंदापूर: निमसाखर (ता. इंदापूर) येथे प्राथमिक शाळेने शालेय विद्यार्थ्यांकरीता आठवडी बाजार व बाल आनंद मेळाव्यामध्ये विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग लाभला. यावेळी निमसाखरकरांनी या बाल आनंद मेळावा व आठवडी बाजारात खरेदी करण्याचा आनंद घेतला.
शनिवार दि. ११ रोजी निमसाखर - कळंब रोड लगत जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळेच्या परिसरात 'बाल आनंद मेळावा' व आठवडी बाजाराचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याचे उद्घाटन निमसाखर गावच्या उपसरपंच विद्यादेवी रणवरे,माजी ग्रामपंचायत सदस्या जयश्री अडसुळ , हायस्कूलच्या शिक्षिका अनुराधा रणवरे , आशा पर्वत सह अन्य महिलांसोबत सावित्रीबाईं व सरस्वती पूजनाने करण्यात आली.या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती माजी सरपंच गोविंद रणवरे तर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सत्यजित चव्हाण, हायस्कूलचे मुख्याध्यापक चंद्रकांत रणवरे यासह हायस्कुल व परिसरातील जि. प. शाळांचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या बाजारात विकण्यासाठी विद्यार्थ्यांनी भाजीपाला, फळे किराणा, भेळ- चुरमुन्याचे गाडे, वडापाव, भजी, स्पेशल बिर्याणी , पाणीपुरी, गोळ्या बिस्किटे, चॉकलेट , शालेय उपयोगी यांसह इतर आवश्यक वस्तू विक्रीसाठी आणल्या होत्या. गावातील लोकांनी विद्यार्थ्यांकडून या सर्व वस्तूंची मोठ्या प्रमाणात खरेदी करून विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित केला. उपस्थित सर्वजण आनंदाने बाजाराचे निरीक्षण करून भेळ, वडापाव, भजी, पाणीपुरी यांचा आस्वाद घेत होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे मुख्याध्यापक विकास भुजबळ यांनी केले. या कार्यक्रमासाठी शाळेतील जाधव , शिर्के , बंडगर यासह अन्य परिसरातील शिक्षक उपस्थित होते.

