shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

साहित्य सृजनातून आयुष्याची वाट सापडते- डॉ.रमेश आवलगावकर

श्रीरामपूर प्रतिनिधी:
साहित्य हा समाजाचा आरसा असतो.समाजजीवनाचे सर्व प्रतिबिंब साहित्यामधे उमटत असते त्यामुळेच साहित्य सृजनातून आयुष्याची वाट सापडते असे प्रतिपादन ज्येष्ठ समीक्षक डॉ. रमेश आवलगावकर यांनी केले.

तालुक्यातील बेलापूर येथील कला व वाणिज्य महाविद्यालयात महाराष्ट्र शिक्षण संचनालय (उच्च शिक्षण) ,मराठी भाषा विभाग,सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि महाविद्यालयाच्या मराठी विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मराठी भाषा संवर्धन पंधरवडा पारितोषिक वितरण सोहळ्यात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बेलापूर एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त भरत साळुंके हे होते. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष गणपतलाल मुथ्था, सहसचिव दिपक सिकची डॉ.समीक्षा आवलगावकर , प्राचार्य डॉ.गुंफा कोकाटे, डॉ.बाबासाहेब पवार,प्रा.निजाम शेख,प्रा.बाबासाहेब पवार , डॉ. विठ्ठल लंगोटे उपस्थित होते. यावेळी बोलताना डॉ.रमेश आवलगावकर असेही म्हणाले की, प्राचीन काळात साहित्यामध्ये जगात सर्वात जास्त प्रगती भारताने केली. महानुभव साहित्य,संत साहित्य,मध्ययुगीन साहित्य, स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर साहित्य, ग्रामीण, दलित,आदिवासी, स्रीवादी , महानगरीय साहित्याच्या आदी प्रवाहांनी मराठी भाषा समृद्ध केली.धर्म ,अर्थ ,काम, मोक्ष, मानसिक समाधान आदी बाबींच्या प्रवाहातीत साहित्यातून मानवतेला नैतिक मूल्यांकडे खेचून त्यातून तयार झालेल्या समाज जीवनाचा आरसा हा साहित्य सृजनातील इतिहासक्रम आहे असे विचार त्यांनी यावेळी व्यक्त केले.

सदर कार्यक्रमप्रसंगी मराठी भाषा संवर्धन पंधरवडा स्पर्धा,पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण, बेसिक कम्प्यूटर कोर्स, निनाद फाउंडेशन खुल्या  ऑनलाईन काव्य स्पर्धा,राष्ट्रीय सेवा योजना निबंध स्पर्धा आदिंचा पारितोषिक वितरण सोहळा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला.या प्रसंगी डॉ.समीक्षा आवलगावकर, भरत साळुंके यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक व परिचय प्राचार्य डॉ. गुंफा कोकाटे यांनी केले. अध्यक्षीय सूचना डॉ.संजय नवाळे यांनी मांडली.प्रा.बाबासाहेब पवार यांनी अनुमोदन दिले.

डॉ.मनोज तेलोरे आणि पायल म्हस्के यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले तर  डॉ.विठ्ठल लंगोटे यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ.बाळासाहेब बाचकर, डॉ. विनायक काळे, डॉ.विठ्ठल लंगोटे, डॉ.मनोज तेलोरे,प्रा.रुपाली उंडे तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेतर सेवक यांनी परिश्रम घेतले.सदर कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने विद्यार्थी विद्यार्थीनी उपस्थित होते.

close