shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कर्मयोगी शंकररावजी बाजीराव पाटील (भाऊ)यांच्या ९९ व्या जयंती निमित्त विशेष लेख.

कर्मयोगी शंकररावजी बाजीराव पाटील (भाऊ)यांच्या ९९ व्या जयंती निमित्त विशेष लेख.

इंदापूर तालुक्याचे शिल्पकार कर्मयोगी शंकररावजी बाजीराव पाटील (भाऊ)यांच्या ९९ व्या जयंती निमित्त अभिवादन.
     

कै.शंकरराव बाजीराव पाटील यांचा जन्म १५ फेब्रुवारी१९२४ शेतकरी कुटूंबात झाला.कै. शंकरराव पाटील यांचे वडील बाजीराव व आई जनाबाई पाटील यांच्या संस्कारात ते लहानाचे मोठे झाले. त्यांचे प्राथमिक शिक्षण त्यांचे गाव बावडा येथे पूर्ण झाले. माध्यमिक शिक्षण न्यू इंग्लिश स्कुल पुणे तर मॅट्रिकची परीक्षा  मुंबई विद्यापीठातुन चांगल्या गुणांनी पास झाले. त्यानंतर त्यांनी फर्ग्युसन महाविद्यालयातुन बी.ए.ची डिग्री पूर्ण केली.याच कालावधीत देशात स्वातंत्र्य चळवळीचे वारे वाहत होते लोकमान्य टिळक, आगरकर यांच्या स्वातंत्र्याविषयीच्या विचारांचे संस्कार भाऊंच्या मनावर झाले .पहिल्याच प्रयत्नात स्पर्धा परीक्षा पास होऊन सहायक निबंधक पदाची नोकरी त्यांना चालून आली होती परंतु राष्ट्रीय भावनेच्या प्रेरणेतुन त्यांनी ती नाकारली. त्यानंतर त्यांनी आय. एल.एस. महाविद्यालयातुन बॅरिस्टर ची पदवी संपादन केली .1949 मध्ये त्यांनी इंदापूर येथे वकिली व्यवसाय व समाजसेवेस प्रारंभ केला. कारण त्यांच्यावरती तत्कालीन काँग्रेस नेतृत्वाचा प्रभाव होता.त्यांच्या या समाजसेवेच्या कार्याची दखल घेऊन काँग्रेस पक्षाने त्यांची इंदापूर तालुका काँग्रेस सचिव म्हणून निवड केली व भाऊंच्या राजकीय कार्यकिर्दीचा श्रीगणेशा झाला.
     1952 च्या सार्वत्रिक निवडणुकी मध्ये इंदापूर विधानसभेची उमेदवारी दिली व भाऊ प्रथम आमदार झाले. विविध शासकीय योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहचवण्यासाठी केलेल्या प्रामाणिक प्रयत्नामुळे व प्रचंड जनसंपर्कामुळे 1957 च्या निवडणुकीत संयुक्त महाराष्ट्र समितीचा जोर असतानाही ते पुन्हा आमदार म्हणून निवडून आले. विशेष म्हणजे पुणे जिल्ह्यातील 15 जागांपैकी 14 जागा काँग्रेस पक्ष हरली व फक्त इंदापूर ची जागा भाऊंनी राखली होती.
     कै. शंकरराव पाटील यांनी पूर्ण तालुका हे कुटुंब मानुन राजकारण करण्याचा प्रयत्न केला.त्यांची घरची परिस्थिती शेतीशी निगडित असल्याने शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण त्यांना होती त्यावेळी इंदापूर तालुका हा एक दुष्काळी तालुका म्हणून गणला जात होता म्हणून कै. शंकरराव पाटलांनी शेतीच्या पाण्यासाठी आग्रही भूमिका मांडण्याचे काम विधानसभेत केले. तसेच शेतकऱ्यांच्या मालाला बाजारपेठ व योग्य बाजारभाव मिळावा म्हणून1960 मध्ये इंदापूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती ची व इंदापूर तालुका खरेदी विक्री संघाची स्थापना केली.1962 मध्ये पहिल्यांदा महाराष्ट्र राज्याचे शेती खात्याचे मंत्री झाल्यानंतर दुग्धव्यवसायाच्या माध्यमातून राज्याला दुधाच्या बाबतीमध्ये स्वयंपूर्ण बनवण्याचा नियोजन बद्ध कार्यक्रम त्यांनी आखला व इंदापूर तालुक्यामध्ये विविध दुग्ध सहकारी संस्था स्थापन करून सहकाराचे जाळे उभारून शेतकऱ्यांच्या प्रपंचाला पाठबळ देण्याचे कार्य केले.
उजनी धरणाच्या निर्मिती नंतर मोठ्या प्रमाणात उसाची लागवड झाल्याने उसाच्या गाळपाचा मोठा प्रश्न निर्माण झाला इंदापूर तालुक्यातील ऊस उत्पादकांना न्याय देण्यासाठी 1984 मध्ये वालचंदनगर उद्योग समूहाचा खाजगी कारखाना विकत घेऊन इंदापूर सहकारी साखर कारखान्याची स्थापना बिजवडी येथे केली विशेषतः खाजगी तत्त्वावरील कारखाना सहकारी तत्वावरती सुरू करण्याचा हा महाराष्ट्रातील पहिलाच प्रयोग असेल.
उजनी धरणाच्या निर्मितीनंतर धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता तो सोडविणे व इंदापूर तालुक्यातील जनतेला न्याय देण्यासाठी 1977 मध्ये पुनवर्सन खाते तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्याकडून मागून घेतले व इंदापूर धरणग्रस्त शेतकऱ्यांना न्याय देण्याचे काम केले.
    शिक्षणाचे महत्त्व कै. भाऊ जाणून होते म्हणून सामान्यांना,गरिबांना  ग्रामीण भागात उपलब्ध करून देण्यासाठी बावडा येथे शिवाजी एज्युकेशन संस्थेची 1952 मध्ये स्थापना केली तसेच 1972 मध्ये इंदापूर महाविद्यालयाची स्थापना केली.या दोन्ही संस्थांच्या विविध शाखांमधून तालुक्यातील जनतेला शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली.
 *कै. शंकरराव पाटील यांची राजकीय कार्यकिर्द* 
*सन1953 ते 1963
महाराष्ट्र काँग्रेस कमिटी सदस्य
*सन 1963 ते 1972
 अखिल भारतीय काँग्रेस कमिटी सदस्य
महाराष्ट्र विधानसभा सदस्य
*1952 ते 1980 पर्यंत
बारामती लोकसभा सदस्य
*1980 ते 1984
*1989 ते 1991
 *मंत्रिपद कालावधी* 
1962 ते 1963
शेती उपमंत्री महाराष्ट्र राज्य 
1965 ते 1967
महसूल उपमंत्री
1967 ते 1969
महसूल व सहकार राज्यमंत्री
1969 ते 1972
सहकार व समाजकल्याण राज्यमंत्री
1972 ते 1974
अर्थ व ग्रामीण विकास राज्यमंत्री 
1975 ते 1976
कामगार ,सहकार कॅबिनेट मंत्री
1977 ते 1978 
कामगार व पुनर्वसन कॅबिनेट मंत्री
   या विविध पदांचा वापर हा तालुक्याच्या सर्वांगीण प्रगतीकरता ,विकासाकरिता, शेतकरी, कष्ठकरी न्याय देण्यासाठी केल्याचे आपणांस दिसून येते एकेकाळचा दुष्काळी इंदापूर तालुका आज जो आपल्याला सुजलाम सुफलाम पहावयास मिळतो त्याची बीजे रोवण्याचे श्रेय कर्मयोगी भाऊंना जाते.या बीजाचे वटवृक्षात रूपांतर करण्याचे कार्य  आज कर्मयोगी भाऊंच्या विचारप्रणाली नुसार इंदापूर तालुक्यामध्ये  माजी संसदीय कामकाज मंत्री हर्षवर्धन पाटील  , पद्माताई भोसले करत आहेत.शेवटी एवढेच म्हणावेसे वाटते इवलेसे रोप लावियेलें द्वारी त्याचा वेली गेला गगनावरी....कर्मयोगी भाऊंच्या जयंती निमित्त स्मृतिस विनम्र अभिवादन...

माहिती संकलन. महादेव चव्हाण
close