आज पासून वडापुरी ग्रामदैवत श्रीनाथ जागरानिमित्त अखंड हरिनाम सप्ताहास प्रारंभ.
वडापुरी पुण्यभूमीत श्री नाथांची व श्री मानकोजी महाराज मुळे यांची संजीवन समाधी.
वडापुरी पंचक्रोशीतील भाविक लुटणार हरी जागराचा आनंद.
इंदापूर प्रतिनिधी:
वडापुरी गावचे ग्रामदैवत श्रीनाथ जागरनिमित्त अखंड हरिनाम सप्ताह ज्ञानेश्वरी पारायण सोहळा श्रीनाथ मंदिर वडापुरी येथे दिनांक १२ फेब्रुवारी २०२३ रोजी पासून प्रारंभ झाला असून या सप्ताहाची सांगता रविवार दिनांक १९ फेब्रुवारी २०२३ रोजी होणार आहे. दररोज काकडा भजन पहाटे ४ ते ६, ज्ञानेश्वरी पारायण सकाळी ८ ते १२ गाथा, भजन दुपारी १२ ते १ हरिपाठ, सायंकाळी ५ ते ६ प्रवचन, सायंकाळी ६ ते ७ कीर्तन, सायंकाळी ९ ते ११ व यानंतर हरिजागर असे होणार असून याचे व्यासपीठ चालक म्हणून घनश्याम महाराज देवकर, बाळासो महाराज बोधले संत माणकोजी महाराज यांचे अकरावे वंशज या सप्ताह सोहळा मध्ये कीर्तन सेवा बापू महाराज देहूकर तुकाराम महाराजांचे वंशज, तपोनिधी महादेव (तात्या) महाराज चाकरवाडी उत्तरेश्वर पिंपरी देवस्थान, केशव महाराज उखळीकर आळंदी, एकनाथ महाराज हांडे पंढरपूर, गोविंद महाराज गोरे आळंदी, प्रभाकर दादा बोधले महाराज पंढरपूर माणकोजी महाराज वंशज, वेदांताचार्य प्रमोद महाराज जगताप , पणदरे तर काल्याचे किर्तन भागवत महाराज चौरे आजरेकर आंबेकर फड पंढरपूर यांचे होणार असून प्रवचन सेवा वैभव निंबाळकर पंधारवडी, सचिन महाराज बोधले वडापुरी, केशव महाराज तोडकर, उमराव महाराज देवकर रेडा, विशाल महाराज वाघमारे इंदापूर, मुरलीधर चौरे सर जिवाचीवाडी , डॉक्टर लक्ष्मण महाराज असबे बावडा यांचे होणार असून या कालावधीमध्ये सकाळी सप्ताहातील अन्नदात्यांच्या वतीने अल्पोपहार , दुपारचे जेवण व सायंकाळी जेवण रविवारी १९ फेब्रुवारी २०२३ रोजी काल्याचा महाप्रसाद निरा भिमा कारखान्याचे संचालक दत्तात्रय रामचंद्र शिर्के यांच्या वतीने होणार आहे.
वडापुरी हे पुण्य पावन भूमी आहे, पूर्वी वडापुरी हे गाव कणकगिरी या नावाने प्रसिद्ध होते. परंतु श्रीनाथ पंथातील सिद्धपुरुष मच्छिंद्रनाथ व त्यांचे शिष्य गोरखनाथ फिरत फिरत या कणकनगरीत आले ते दिवस होते भाद्रपद वैद्य पक्षातील एके दिवशी श्री मच्छिंद्रनाथांनी गोरक्षनाथांना भीक्षा मागून आणण्यास सांगितले. गोरक्षनाथांनी गावातील एका ब्राह्मणाच्या घरी अलंक! म्हणून भिक्षा मागितली. त्या घरातून वडेपुरी, भजी सर्व पदार्थ वाढून आले. ते ताट घेऊन गोरक्ष गुरूंजवळ गेले. मच्छिंद्रनाथांनी जेवण केले. पण त्यातील वडे त्यांना फार आवडले. त्यांनी पुन्हा वडे आण म्हणून सांगितल्यावर परत गोरक्ष त्याच घरी गेले व अलक! म्हणून भिक्षा मागितली. तेव्हा ती बाई म्हणाली पुन्हा आलास ? तेव्हा गोरक्ष म्हणाले माझ्या गुरूंना वडे फार आवडले आहेत तरी अजून वडे द्या. तेव्हा त्या बाई म्हणाल्या तू खोटे बोलत आहेस. खरेच तुझ्या गुरूंना वडे हवे असतील तर तुझा डोळा काढून दे. गोरक्षांनी विचार न करता डोळा काढून दिला व गुरूंची इच्छा पूर्ण केली. तेव्हापासून या गावाला वडापुरी असे नाव पडले. या पुण्यभूमीत श्री नाथांची व श्री मानकोजी महाराज मुळे यांची संजीवन समाधी आहे. अशा पुण्यनगरीमध्ये वडापुरी गावचे ग्रामदैवत श्रीनाथ महाराजांच्या जागर सोहळ्यानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळा साजरा करीत आहोत तरी या सोहळ्यामध्ये सर्वांनी सहभागी व्हावे ही ग्रामस्थांची विनंतीपूर्वक आव्हान आहे.

