shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सामाजिक न्याय व लोककल्याणकारी राज्याची प्रभावी अंमलबजावणी गावपातळीवर पोलीस पाटील करू शकतात - डॉ. शशिकांत मंगरुळे

अकोले :-
सामाजिक न्याय व लोककल्याणकारी राज्याची प्रभावी अंमलबजावणी गावपातळीवर पोलीस पाटील करू शकतात असे मत संगमनेर चे उपविभागीय अधिकारी  डॉ. शशिकांत मंगरुळे यांनी व्यक्त केले.

संगमनेर येथे उपविभागातील साठ कामगार पोलीस पाटील यांनी आपल्या सेवेचा दहा वर्षांचा कार्यकाळ यशस्वी पूर्ण केल्याबद्दल आयोजित गुणगौरव सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय अधिकारी डॉ. मंगरुळे बोलत होते.

यावेळी उपविभागीय वनअधिकारी डॉ संदीप पाटील, उपविभागीय कृषीअधिकारी सुधाकर बोराळे, तहसीलदार अमोल निकम, गटविकास अधिकारी अनिल नागणे, प्रशिक्षणार्थी तहसीलदार स्वाती घावटे, तालुका कृषी अधिकारी प्रवीण गोसावी ,पोलीस निरीक्षक भानुदास मथुरे, नायब तहसीलदार श्रीकांत लोमटे, उमाकांत कडनोर आदि प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

 डॉ. मंगरुळे म्हणाले की, आजपर्यंत संगमनेर उपविभागतील सर्व पोलीस पाटील यांनी अतिशय उत्तम कार्य केले असून यापुढेही असेच आदर्शवत काम करत राहून आपल्या पदाला एक वेगळी ओळख व प्रतिष्ठा निर्माण करून द्यावी.  ब्रिटिश कायदा 1867 नुसार गावात वंशपरंपरागत पोलीस पाटील पदी नियुक्ती केली जात असे व त्यांना गाव पातळीवरील कायदा व सुव्यवस्था आणि महसूल या बाबत काम करावे लागत असे परंतु स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्रात मुलकी पोलीस पाटीलकी रद्द करून पोलीस पाटील अधिनियम 1967 नुसार पोलीस पाटील यांची नियुक्ती केली जाते. या कायद्यानुसार  पोलीस पाटील यांना महत्वपूर्ण अधिकार प्राप्त होऊन ते गावपातळीवरील शासन व जनता यामधील महत्वाचा दुवा असून गावपातळीवरील प्रशासनाच्या सर्व विभागांचे ते प्रमुख आहेत. 
         महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांपासून पाटीलकीची अतिशय गौरवशाली अशी परंपरा आहे. मागील काळात आपल्या आदर्शवत कार्याने अनेक पोलीस पाटील अजरामर झालेले आहेत. हीच गौरवशाली परंपरा आजचेही पोलीस पाटील अतिशय उत्तम रित्या पुढे नेत आहेत. स्वातंत्र्यानंतर आपण कल्याणकारी राज्यव्यवस्थेची संकल्पना राबवित असल्याने समाज्यातील शेवटच्या घटकापर्यंत शासनाच्या ध्येयधोरणांची प्रभावी उद्दिष्टपूर्ती म्हणजेच अंत्योदयाच्या धोरणाची  व सामाजिक न्यायाची प्रभावी अंमलबजावणी गावपातळीवर सदैव उपलब्ध असणारा व गावची सर्वांगीण इत्यंभूत माहिती असलेला एकमेव शासन प्रतिनिधी असलेला पोलीस पाटीलच करू शकतो.
        
 उपविभागातील सावरगाव तळ येथील पोलीस पाटील गोरक्ष नेहे यांनी पोलीस पाटील म्हणून दहा वर्षाच्या काळात  गावपातळीवर शासन प्रतिनिधी म्हणून लोककल्याणकारी राज्य व सामाजिक न्यायाची अतिशय प्रभावी अंमलबजावणी करत आपल्या कामाचा राज्यपातळीवर आदर्श निर्माण केला. त्यांनी स्वतः पुढाकार घेतल्याने त्यांचे गाव शंभर टक्के ई पीकपाहणी पूर्ण करणारे राज्यातील पाहिले गाव ठरले आहे.आपल्या कर्तव्याबरोबरच पाणी फौंडेशन च्या माध्यमातून गावात जलसंधारणाचे मोठे काम उभे केले, महिला सबलीकरण, पर्यावरण संवर्धन, वृक्षारोपण, कृषी, ग्रामविकास व सामाजिक क्षेत्रात पोलीस पाटील म्हणून अतिशय उत्तम कार्य केल्याबद्दल नेहे पाटील यांचा विशेष गौरव करण्यात आला.
          
यावेळी स्वागत व प्रास्ताविक गोरक्ष नेहे यांनी तर सूत्रसंचालन निलेश पर्बत यांनी केले. शेवटी आभार प्रशांत धुमाळ यांनी मानले.
close