*विचार, विचार, विचार आणि विचार
विचार रूजला की विचारणारे कोणीच नसते. विचार न करताही विचार मांडता येतात. मग रूजलेला विचार ही एक भाषा बनते, जी हृदयाला साद घालते, काळजाला भेदून जाते, अनुयायांचे आश्रयस्थान बनते.
विचारांचा विशालवृक्ष बनतो आणि त्या सावलीला असंख्य स्वयंभू जीवजंतू आपले बस्तान मांडतात. ज्याला पंख असतात ते विचारांच्या वृक्षावर आपले घरटे बांधतात. ज्यांना पंख नसतात ते वटवृक्षाखाली झोपडी बांधतात. याव्यतिरिक्त जे संधीसाधू असतात ते बांडगुळ होऊन विशालवृक्षावर बांडगुळ बनून वृक्षाच्या अन्नरसारावर येथेच्छ ताव मारतात.
बांडगुळांना वृक्षाच्या गुणधर्माशी काहीच देणे देणे नसते. ती मनसोक्त वाढतात आणि वृक्षालाच खाऊन टाकतात.
वृक्षाच्या सावलीत आणि वृक्षावर बसून आपले अस्तित्व जपणारे वृक्षाचा सातबारा आपलाच कसा आहे यासाठी स्पर्धा करतात. यावेळी वृक्षाचा विचार बाजूस पडतो आणि घरटे बांधणारे आपलाच विचार जगासमोर मांडतात. विचार मागे पडतो. विचारणारे कोणीच नसतात.
विचार रूजविताना जमिनीत बीज रूपाने जे स्वतःला गाडून घेतात ते नावापुरते ठरतात आणि विचार हा अस्तित्वाच्या, स्वार्थाच्या विचारांचा आधार ठरतो.
विचारासाठी लढाया होतात. एकाच विचाराचे अनेक झेंडे होतात. अनेक गट होतात. विचारांच्या विचारधारा अनेक मार्गाने प्रवाहित होत समाजामध्ये संभ्रम निर्माण करतात आणि प्रवाह दूषित होतो. परिणामी सारेच वातावरण विचारांच्या लढाईत प्रदूषित होते. वैचारिक पर्यावरण पूर्णतः ढासळते.
विचारावर प्रश्नचिन्ह, संशोधन, मंथन याचा बाजार वाढतच जातो. या प्रवाहात मूलभूत विचार लुप्त होत जातो. पुन्हा लुप्त झालेल्या विचारांवर विचार करणाऱ्यांची फौज उभी राहते.
सृष्टीचक्र चालूच राहते. घडणारे घडत जाते. सृष्टीचक्र कोणीच थांबवू करू शकत नाही तसे विचारचक्र देखील फिरतच राहते.
जेव्हा कोणी सूर्याप्रमाणे स्वतःभोवती फिरत असताना पृथ्वीभोवती पण फिरण्याचा कृतिशील अभ्यास करतो, म्हणजेच स्वतःचा विचार करत असताना समाजाच्या हिताचा देखील विचार करतो, विचार मांडतो तेव्हा प्रभावी विचारधारा जन्मास येते. जी विश्वाला प्रकाशमान करते. समाजाला नवीन विचार देते.
सृष्टीचक्राच्या नियमानुसार विचार करून समाजहिताचा विचार जगणारे, विचार मांडणारे, विचारांचा प्रसार करणारे हे प्रत्येक पिढीत घडत असतात. विचार कणाकणात रुजलेला असतो त्याची ओळख जे विसरतात त्यांची नोंद अविचारी म्हणून होते. जे समाजाचा राष्ट्रहिताच्या विचाराला घट्ट पकडून निस्सीम त्यागाने समाजासाठी झटत राहतात ते आदर्श विचारवंत म्हणून इतिहासात नोंदविले जातात.
कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट पुणेच्या राष्ट्रभक्ती जनजागरण, पर्यावरण, व्यसनमुक्ती, आरोग्य साक्षरता अभियानांतर्गत प्रकाशित.
देशभक्तकोशकार चंद्रकांत शहासने,
पुणे, ९८८१३७३५८५

