शौकतभाई शेख
श्रीरामपूर -येथील वाचन संस्कृती प्रतिष्ठानचे संस्थापक, अध्यक्ष डॉ. बाबुराव उपाध्ये यांच्या 'फिरत्या चाकावरती 'आणि साहित्य प्रबोधन मंचचे अध्यक्ष डॉ. शिवाजी काळे यांच्या 'गाकुसातल्या गोष्टी 'या पुस्तकांना बीड जिल्ह्यातील कडा येथील साहित्य ज्योती काव्य मंचचे राज्यस्तरीय पुरस्कार घोषित झाले असल्याची माहिती मंच संस्थापक, अध्यक्ष प्रा.नागेश शेलार यांनी दिली.
डॉ.बाबुराव उपाध्ये ३० जून २०१७ रोजी रयत शिक्षण संस्थेच्या श्रीरामपूर येथील रावबहादूर नारायणराव बोरावके महाविद्यालयातील पदव्युत्तर मराठी संशोधन केंद्राचे विभाग प्रमुख म्हणून सेवानिवृत्त झाले. त्यांनी सातारा, पुणे, कर्जत, श्रीरामपूर शाखेत ३३ वर्षे अध्यापन केले.त्यांच्या मार्गदर्शनाखाली १७ विद्यार्थी एम. फिल.,०८ विद्यार्थी पीएच. डी. झाले. डॉ. उपाध्ये यांची विविध वाड्मय प्रकारात ४४ पुस्तके प्रकाशित आहेत, त्यांना सामाजिक, शैक्षणिक, वाड्मयीन कार्याबद्दल ६१ पुरस्कार प्राप्त झाले आहेत.अहमदनगर जिल्ह्यात ते १९७८ पासून साहित्यविश्वात कार्यरत आहेत.



