निरा डाव्या कालव्यावरील लाभधारक शेतकऱ्यांच्या पाणीपट्टी प्रश्नावर रासप आक्रमक - १३ मार्चला रासप करणार रस्ता रोको आंदोलन.
इंदापूर तहसीलदार, वालचंदनगर पोलीस स्टेशन, सहाय्यक अभियंता जलसंपदा उपविभाग निमगाव केतकी यांना दिले निवेदन पत्र.
इंदापूर: निरा डावा कालव्यावरील लाभ धारक शेतकऱ्यांना पाणीपट्टी कमी करा या विषयाला अनुसरून राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने इंदापूर तहसीलदार श्रीकांत पाटील यांना निवेदन पत्र आज दि. ९ मार्च २०२३ रोजी इंदापूर येथील प्रशासकीय भवन येथे देण्यात आले.
सदर निवेदनात म्हटले आहे की, निरा डाव्या कालव्यावरील लाभधारक शेतकऱ्यांना पाणीपट्टी भरण्याचे महाराष्ट्र शासनाने सक्तीचे केले आहे. जर पाणीपट्टी न भरल्यास उभ्या पिकांमध्ये पाणी दिले जाणार नाही असे आवाहन लाऊड स्पीकर द्वारे करत असून ही बाब अत्यंत निंदनीय असून त्याचा निषेध म्हणून शेतकरी पाणीपट्टी बारामती तालुक्याच्या पद्धतीने प्रति एकरी ८ रुपये न घेता प्रति एकर १०० रुपये घेण्यात यावी. जलसंपदा पाटबंधारे विभाग बारामती तालुक्याला जेवढे पाणी मिळते त्याच्या निम्मे सुद्धा पाणी इंदापूरला मिळत नाही तसेच या कालव्यावर असणारे तरंगवाडी गोखळी सारख्या गावांना वर्षातून एकदाही पाणी पोहोचत नाही. त्यामुळे आमच्या इंदापूरच्या हक्काचे पाणी पूर्ण क्षमतेने तालुक्यातील लाभधारक गावांना दिल्याशिवाय इंदापूर तालुक्यातील शेतकरी पाणीपट्टी भरणार नाही अशी भूमिका राष्ट्रीय समाज पक्षाने घेतलेली आहे. त्याचबरोबर ज्या ठिकाणी बारामती तालुक्यातून इंदापूर तालुक्यामध्ये पाणी येते म्हणजेच भवानीनगर येथे पाणी मोजमाप यंत्र बसवण्यात यावे व प्रत्येक पाळीला किती क्षमतेने किती टीएमसी पाणी इंदापूरच्या वाटेचा मिळतं ते प्रशासनाने पाहावे इथून पुढे जर पाणी न देता पाणीपट्टी जलसंपदा विभाग मागत असेल तर राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे. सदर मुद्द्यावर दिनांक १३ मार्च २०२३ रोजी सकाळी १० वाजता बारामती अकलूज रोड सांधा चाळ कळंब येथे आयोजित केली असल्याचे रासपचे तालुका युवक अध्यक्ष आकाश पवार यांच्या पक्षाच्या निवेदन पत्राद्वारे कळविण्यात आले आहे. सदर निवेदन पत्र इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांना देण्यात आले. यावेळी रासप चे पुणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष किरण गोपने, इंदापूर तालुका अध्यक्ष तानाजी मारकड, विधानसभा अध्यक्ष अविनाश मोहिते, इंदापूर शहराध्यक्ष श्रीनिवास सातपुते. इंदापूर तालुका युवक अध्यक्ष आकाश पवार, रामभाऊ दिटे,अतुल शिंगाडे इत्यादी उपस्थित होते.

