*जैविक कीड-नियंत्रणासाठी उपयुक्त बुरशी*
इंदापूर प्रतिनिधी : गेल्या काही वर्षांमध्ये कीडनियंत्रणासाठी वाढलेल्या रासायनिक कीडनाशकांच्या वापरामुळे किडींमध्ये प्रतिकारक्षमता विकसित होत आहे. परिणामी मुख्य आणि दुय्यम किडींचा उद्रेक वाढत असल्याचे चित्र अनेक ठिकाणी दिसत आहे. यासाठी किडींच्या नियंत्रणासाठी जैविक घटकांचा वापर वाढवण्याची आवश्यकता आहे. निसर्गात आढळणाऱ्या बुरशीद्वारे किडींचे नियंत्रण पर्यावरणपूरक पद्धतीने शक्य आहे. १) व्हर्टिसिलियम लेकॅनी (Verticillium lecanii) या बुरशीचे तंतू बासीओनॉलाईड व अन्य डिप्लिकोलिनिक अॅसिडसारखी सायक्लोडीप्सेप्टाइड विषारी पदार्थ तयार करतात. त्याद्वारे ही बुरशी तुडतुडे, पांढरी माशी, तांबेरा बुरशी आणि खवले कीटक यांचे नियंत्रण करते. कृषी महाविद्यालय, पुणे येथील जैविक कीड नियंत्रण प्रकल्प अंतर्गत रोहित गवई ,सौरभ कळसाईत, ओंकार जगताप हे विद्यार्थी डॉ. एन. डी. तांबोळी यांच्या मार्गदर्शनाखाली 'फुले बगीसाईट(Phule Bugicide)' याचे उत्पादन घेत आहेत. पद्धत - व्हर्टिसिलियम या बुरशीचे बिजाणू कीटकांच्या त्वचेच्या संपर्कात येताच तिथे रुजतात. स्वतःच्या वाढीसाठी किटकाच्या शरीरातील पोषक घटकांचे शोषण करतात. त्यामुळे ४८ ते ७२ तासांत किटक रोगग्रस्त होऊन मरतो. पीक : ग्रीनहाऊसमधील शोभेची पिके, भाज्या आणि शेतातील अन्य पिके. लक्ष्य कीटक : पांढरी माशी, फुलकिडे, मावा आणि पिठ्या ढेकूण इ. वापर : फवारणी यंत्राद्वारे झाडावर बुरशीयुक्त घटकांची फवारणी करावी. फवारणी पानाच्या खालील बाजूने होईल, याकडे लक्ष द्यावे. १५ ते २० दिवसांच्या अंतराने किमान चार वेळा, तर ग्रीनहाउसमधील कीटकांच्या नियंत्रणासाठी प्रत्येक १० ते १५ दिवसांच्या अंतराने फवारणी घ्यावी. मात्रा : ५ ग्रॅम प्रति लिटर पाणी किंवा ५ किलो प्रती हेक्टर ५०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तर ठिबक सिंचनाद्वारे ५ ग्रॅम प्रती लिटर या प्रमाणे द्यावे. २) बिव्हेरिया बॅसियाना (Beauveria bassiana) ही बुरशी जगाच्या बहुतेक भागात नैसर्गिकरित्या आढळते. या बुरशीचे बीजाणू किटकांच्या त्वचेच्या संपर्कात येताच रुजून अंकुरित होतात.

