shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अंधारातून प्रकाशवाटेने जाण्यासाठी पुस्तके ही दीपज्योतीसारखी असतात - प्रा.रामचंद्र राऊत

श्रीरामपूर प्रतिनिधी:
पुस्तके ही गुरू आहेत, ती जीवनाला अर्थ आणि आकार देतात. अंधारातून प्रकाशवाटेने जाण्यासाठी पुस्तकेच प्रकाशवाट दाखवितात ती दीपज्योतीसारखी असतात असे मत रयत शिक्षण संस्थेच्या   अहमदनगर येथील राधाबाई काळे महिला महाविद्यालयातून  सेवानिवृत्त झालेले प्रा.रामचंद्र ताराबाई सुंदरदास राऊत यांनी व्यक्त केले. 

श्रीरामपूर येथील शिवाजीनगर भागातील शेळके सभागृहात जागतिक पुस्तकदिन व वाचन संस्कृती प्रतिष्ठानचा १७ वा वर्धापनदिन विविध उपक्रमांनी संपन्न झाला त्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.रामचंद्र राऊत बोलत होते.अध्यक्षस्थानी माजी प्राचार्य टी. ई. शेळके होते. ग्रन्थपूजन होऊन प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ.बाबुराव उपाध्ये यांनी स्वागत, प्रास्ताविक करून व पुस्तके देऊन उपस्थितांचा सन्मान केला. प्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ डॉ.संजय शेळके यांनी डॉ. बाबुराव उपाध्ये यांना शाल, बुके व पुस्तके  देऊन सत्कार केला. डॉ. शेळके यांनी या  प्रेरणादायी कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.कविसंमेलनमध्ये प्रमुख पाहुणे प्रा. रामचंद्र राऊत, कवयित्री संगीता फासाटे, प्राचार्य टी. ई. शेळके, डॉ. बाबुराव उपाध्ये, विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानचे संस्थापक, सचिव सुखदेव सुकळे, प्रा. शिवाजीराव बारगळ यांनी कविता सादर केल्या. पत्रकार प्रकाश कुलथे, डॉ. शिवाजी काळे, सातारचे प्रो.डॉ. सुभाष वाघमारे, प्रा. पोपटराव काटकर, कोपरगावचे हेमचंद्र भवर, दुर्गापूरचे कविवर्य यशवंत पुलाटे, लोणीचे भास्करदादा लगड, माजी प्राचार्य शन्करराव अनारसे,प्रकाश किरण प्रतिष्ठानचे संस्थापक,अध्यक्ष लेविन भोसले आदींचे शुभेच्छा संदेशवाचन संगीता फासाटे यांनी केले.   

प्रा.रामचंद्र राऊत हे आपल्या मनोगतात पुढे म्हणाले की,  श्रीरामपूरमध्ये अनेक गुणवत्तापूर्ण उपक्रमातून वाचन प्रतिष्ठा वाढविण्याचा ज्ञानयज्ञ प्रज्ज्वलीत  ठेवण्याचे कार्य प्राचार्य शेळके साहेब व पदाधिकारी यांच्या सहकार्यातून डॉ. बाबुराव उपाध्ये करीत आहेत.१९७८ च्या विद्यार्थी अवस्थेपासून डॉ. उपाध्ये व आम्ही मित्रमंडळ साहित्यिक उपक्रम करीत आहोत. श्रीरामपूरमध्ये २७ जानेवारी १९८३ रोजी महाराष्ट्र साहित्य परिषदेची शाखा सुरु झाली. त्याअगोदर 'साहित्यशिल्प'चे साहित्य योगदान महत्वाचे ठरले.डॉ. उपाध्ये यांनी ०९ मे  १९९० रोजी साहित्य प्रबोधन मंचची स्थापना केली,आता डॉ. शिवाजी काळे हे मंचचे अध्यक्ष तर पत्रकार स्वामीराज कुलथे हे उपाध्यक्ष आहेत. २३ एप्रिल  २००६ रोजी वाचन संस्कृती प्रतिष्ठान स्थापन झाले, त्यांचे कार्य नियमितपणे सुरु आहे, ही एक तपस्वी व प्रेरणादायी वाटचाल आहे,असे सांगून प्रा. राऊत यांनी डॉ. उपाध्ये यांच्या साहित्यसेवेचे कौतुक केले.यावेळी सुखदेव सुकळे यांनी वाचन संस्कृती प्रतिष्ठान हे स्वावलंबी आणि सेवाभावी आहे. कोणालाही पुस्तक प्रकाशित करायचे असेल तर प्रतिष्ठान अगोदर पुढे होते, असे सांगून कौंटुबिक कविता सादर केली. अध्यक्षीय भाषणातून प्राचार्य शेळके यांनी वाचन ही संस्कृती आहे, जी मनात जीवनमूल्ये रुजविते. कार्यक्रम गर्दीपेक्षा दर्दी लोकांचे हवेत. छोट्या छोट्या उपक्रमातूनच गुणवत्ताशील विवेकशील धागे गुंफले जातात. पुस्तकदिन हा अंतरंगाची श्रीमंती वाढविणारा दिवस आहे.  'वाचाल तर वाचाल' यात मोठा अर्थ दडलेला आहे. तो लक्षात घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. सूत्रसंचालन संगीता फासाटे यांनी केले तर डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी आभार मानले.

वृत्तसंकलन: समता न्यूज नेटवर्क, श्रीरामपूर

close