भारत भूमीत शिक्षणाचे बीज पेरणारे,संपूर्ण भारतीय समाजाला शिक्षणासाठी प्रवृत्त करणारे,स्त्री शिक्षणाचा पाया घालून,बहुजनांच्या अंधाऱ्या मृतप्राण जीवनात निर्भीड जगण्याचा सोनेरी किरण पसरविणारे,सत्यशोधक समाज संस्थापक,महान रचनात्मक,तत्त्ववेत्ता,रणपुरुष,समर्पण शीलतेचे प्रतीक, क्रांती पथकातील सर्वश्रेष्ठ यात्री,१८ व्या शतकातील शिक्षणक्रांतीचे जनक, राष्ट्रपिता,महात्मा जोतीराव फुले यांचा जन्म ११ एप्रिल १८२७ रोजी कटगुण जिल्हा सातारा या ठिकाणी झाला, आणि खऱ्या अर्थाने भारतामध्ये शिक्षणक्रांतीची मुहूर्तमेढ रोवली गेली.
महात्मा फुलेंचा कुठल्या जाती-धर्माला विरोध नव्हता, तर त्यांचा अनिष्ट रूढी,प्रथा-परंपरांना विरोध होता.अस्पृश्य,बहुजनांसाठी, जनसामान्यांसाठी खुप मोलाचं असं काम केलं,हक्काची जाणीव करून दिली.हजारो वर्षापासून शूद्रातिशूद्रांवर अनेक प्रकारचे जाचक निर्बंध लादून शोषण केले जायचे,त्याचबरोबर त्यांचा विचार किती क्रांतिकारी होता,सवित्रीबाईना मूल होत नव्हते तेव्हा घरातील-बाहेरील सर्वजण सांगायचे सावित्रीबाईंना 'सवत' आणा म्हणून...!तेव्हा सवित्रीबाईना सवत आणन्यापेक्षा हा जोतिबा फुले स्वतःला 'सवत्या' घेऊन आल्याशिवाय राहणार नाही, असा हा 'क्रांतिकारी विचार' याच महाराष्ट्रात सांगायचं काम महात्मा फुले यांनी केले.स्त्रियांनी शिक्षण घेतल्याने धर्म बुडतो व तिचे,पतीचे आयुष्य कमी होतं वगैरे खुळचट कल्पना त्याकाळात होत्या,त्याविरुद्ध लढा देऊन स्त्रियांसाठी १ जानेवारी १८४८ ला पुणे येथे भिड़े वाड्यामधे पहिली शाळा काढण्याचे काम महात्मा फुले यांनी केलं. आणि त्यांनी शिक्षणाचे महत्व सांगताना म्हटले की,
विद्येविना मती गेली||मतीविना नीती गेली|| नीतीविना गती गेली|| गतीविना वित्त गेले||वित्ताविना शूद्र खचले||
इतके अनर्थ एका अविद्येने केले||
स्त्रीयांसाठी शिक्षणाचे कार्य राबविणे म्हणजे 'अग्निदिव्यच' होते,तेव्हा महात्मा फूलेंनी सावित्रीबाईंना सोबत घेऊन कोणाच्याही विरोधाला न जुमानता निर्भयपणे सावित्रीबाई पण स्वतः शिकल्या,शिक्षिका झाल्या,मुलींना शाळेत शिकवलं! मुख्याध्यापिका सुद्धा झाल्या,त्या कशालाही,कोणालाही डगमगल्या नाहीत आणि आपल्या समाजसेवेच्या मार्गाने मार्गक्रमण करत राहिल्या.खंबीरपणे त्यांनी महात्मा फूलेंना साथ दिली.
महात्मा फुले एक चांगले बांधकामतज्ञ होते, त्यांनी कात्रजच्या बोगद्याचे काम केलं, खडकवासला धरणाचे काम केलं,मुंबईच्या सीएसटी रेल्वे स्टेशनचे बांधकाम केले,मुंबईच्या आताच्या महानगरपालिकेच्या इमारतीचे प्रत्यक्ष कन्स्ट्रक्शन चे काम त्यांच्या कंपनीने केलं आणि त्यात कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार केला नाही हे सगळ्यांत महत्वाचं...!ते सन १८७६ ते १८८२ या कालावधीत पुणे नगरपालिकेचे नगरसेवक होते त्यातून त्यांनी गोरगरीब जनतेची अनेक कामे केली, दारूबंदी विरुद्ध लढा दिला,त्या काळातील अनाथ,विधवा,अत्याचारातून गर्भवती राहिलेल्या अशा अनेक स्त्रियांची लेकींसारखी बाळंतपणे स्वतः सावित्रीबाईनी केली.
हे जगात एकमेव दांपत्य असे आहे की,ज्यांच्या दोघांच्याही नावाने २ विद्यापीठे आहेत सावित्रीबाई फुले विद्यापीठ,पुणे आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी ही आमच्यासाठी किती अभिमानास्पद बाब आहे! महात्मा फुले-सावित्रीबाई फलेंमुळेच आज महिला सरपंच पदापासून राष्ट्रपती पदापर्यंत पोहोचल्या आहेत. पहिला "शिवजयंती उत्सव" महात्मा फुलेंनी १९-फेब्रुवारी १८६९ ला रायगडावर सुरू केला आणि तेव्हापासून खऱ्या अर्थाने सर्वत्र जगभर शिवजयंती साजरी केल्या जाऊ लागली.
आज महात्मा फुलेंनी भिडे वाड्यामध्ये पहिली मुलींची शाळा सुरु केली,अशा जगातील प्रत्येकाला प्रेरणास्थानी असणाऱ्या भिडेवाड्याची अवस्था पाहून मन सुन्न होते,डोळ्यातून दुखाच्या अश्रूंचा बांध फुटतो,भिडेवाडयाकडे पाहतांना डोळ्यासमोर उभा राहतो तो प्रेरणादायी इतिहास! जिथे सावित्रीबाई- जोतिरावांनी सुरू केली होती जगातील सर्वात मोठी शैक्षणिक चळवळ...!तोच भिडेवाडा राष्ट्रीय स्मारक होऊन गतवैभव प्राप्त व्हावे, यासाठी अनेक सामाजिक संघटना व नागरिक सातत्याने आंदोलने,उपोषणे करीत आहेत त्यामुळे आतातरी शासनाने निधीची तरतूद करुन भिडेवाडा "राष्ट्रीय स्मारक" म्हणून जतन करणे महत्त्वाचे आहे, हीच महात्मा फुले यांना त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने खरी आदरांजली ठरेल,त्यांच्या कार्याचा आपण खरा गौरव केला असे म्हणता येईल..!या जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या विचार-कार्याला कोटी-कोटी प्रणाम करतो आणि लेखणीला पूर्णविराम देतो....!
शब्दांकन
शिवश्री.सतिष उखर्डे
(प्रसिद्ध व्याख्याते तथा इतिहास अभ्यासक)
मोब.नं.-9422992310

