डॉ.दिलीप शिरसाठ, डॉ. विनायक मोरगे, डॉ.रवींद्र जगधने, डॉ. रवींद्र कुटे, डॉ. मच्छिंद्र त्रिभुवन देवदूत पुरस्काराने सन्मानित
शौकतभाई शेख
श्रीरामपूर - कोरोना महामारीच्या काळामध्ये स्वतःची व कुटुंबाची पर्वा न करता वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी अहोरात्र परिश्रम घेऊन रुग्णांचे प्राण वाचवले. त्यासाठी अनेकांना समर्पण करावे लागले. त्यांची आहुती इतरांना नेहमीच प्रेरणादायी ठरेल. अशा सर्व सेवकांच्या पाठीवर शाबासकीची थाप देण्याचे काम रेड क्रॉस सोसायटीने केले आहे, हे कौतुकास्पद आहे. आरोग्य सेवक हे खऱ्या अर्थाने भूतलावरील देवदूतच असून याच सेवकांनी कृतीतून रुग्ण सेवेचा सेवाभाव जोपासला असल्याचे गौरवोद्गार रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिल सदस्या व श्रीरामपूर रयत संकुलाच्या चेअरमन मीनाताई जगधने यांनी व्यक्त केले.
रेड क्रॉस सोसायटी श्रीरामपूर यांच्या वतीने अहमदनगर जिल्ह्यात व शहरात कोरोना काळामध्ये सेवाभावी वृत्तीने कार्य करणाऱ्या हॉस्पिटल व डॉक्टर्स यांचा देवदूत पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. आयोजित करण्यात आलेल्या समारंभात मीनाताई जगधने प्रमुख अतिथी म्हणून बोलत होत्या. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून रमेश कुलकर्णी -सचिव रेड क्रॉस सोसायटी पुणे, प्रज्वल मिठावाला - सचिव रेड क्रॉस सोसायटी संभाजीनगर, मीनाताई जगधने- मॅनेजिंग कौन्सिल सदस्या रयत शिक्षण संस्था सातारा व चेअरमन रयत संकुल- श्रीरामपूर, डॉ.सुनील औंधकर-सचिव रेड क्रॉस नाशिक, राजेंद्र राठोड - खजिनदार रेड क्रॉस संभाजीनगर, गटशिक्षण अधिकारी साईलता सामलेटी, कामगार नेते अविनाश आपटे, रेड क्रॉस श्रीरामपूरचे चेअरमन तथा प्रांताधिकारी अनिल पवार, रेड क्रॉस श्रीरामपूरचे व्हॉईस चेअरमन तथा तहसीलदार प्रशांत पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
स्वागत व प्रास्ताविक श्रीरामपूर रेड क्रॉसचे सचिव सुनील साळवे यांनी केले. प्रमुख पाहुणे प्रा. रमेश कुलकर्णी म्हणाले विद्यार्थ्यांमध्ये सेवेचा व मानवतेचा दृष्टिकोन रुजविण्यासाठी शाळा-महाविद्यालयात ज्युनिअर रेड क्रॉसची स्थापना करावी असे सुचवत आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय रेड क्रॉसची रचना विषद केली. जागतिक शांतता, सुरक्षितता, आरोग्य, आपत्कालीन परिस्थिती, मानव निर्मित व नैसर्गिक संकटामध्ये मानवतावादी सेवाकार्यात रेड क्रॉस करत असलेल्या कार्याची माहिती दिली.
नाशिक रेड क्रॉसचे सचिव सुनील औंधकर यांनी श्रीरामपूर रेड क्रॉसच्या कार्याचा गौरव करून अल्पावधीमध्ये राज्यस्तरावर आपल्या कार्याचा ठसा उमटवला, असे सांगितले. अध्यक्षीय भाषणात संभाजीनगरचे सचिव प्रज्वल मिठावाला यांनी सर्व कोरोना योद्धांविषयी कृतज्ञता व्यक्त करत सर्वांच्या कुटुंबांना धन्यवाद दिले. यावेळी जिल्ह्यातील तेरा हॉस्पिटल व शहरातील पाच डॉक्टर यांना सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल-बुके देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले.
राहुल कुंकूलोळ व डॉ. रवींद्र कुटे यांनी रेड क्रॉसच्या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक करून धन्यवाद दिले.
पुढील हॉस्पिटल व डॉक्टरांचा देवदूत पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. पुरस्कारार्थीमध्ये सिव्हील हॉस्पिटल-अहमदनगर, बूथ हॉस्पिटल-अहमदनगर, आनंद ऋषीजी हॉस्पिटल-अहमदनगर, साईबाबा हॉस्पिटल-शिर्डी, प्रवरा मेडिकल ट्रस्ट-लोणी तालुका राहता, आमदार निलेश लंके प्रतिष्ठान संचालित शरदचंद्रजी पवार कोविड सेंटर-भाळवणी तालुका पारनेर, डॉक्टर विखे पाटील मेमोरियल हॉस्पिटल विळदघाट-अहमदनगर, उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय-श्रीरामपूर, डॉक्टर आरोळे हॉस्पिटल-जामखेड, फेअरबँक जेम्स फ्रेंडशिप मेमोरियल हॉस्पिटल-वडाळा मिशन तालुका-नेवासा, संत लूक हॉस्पिटल-श्रीरामपूर, नगरपालिका दवाखाना-श्रीरामपूर, शिक्षक व शिक्षकेतर सेवकवृंद संचलित कोविड सेंटर-सुगाव तालुका अकोले आदी हॉस्पिटलसह हृदयरोग तज्ञ डॉ. दिलीप शिरसाठ, डॉ.विनायक मोरगे, डॉ.रवींद्र जगधणे, डॉ. रवींद्र कुटे, डॉ. मच्छिंद्र त्रिभुवन आदी मान्यवरांचा देवदूत पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
कोरोनात मृतांना प्रथम श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर भि. रा. खटोड कन्या विद्यालयातील कला शिक्षिका संगीत विशारद उषाताई गवळी, अवधूत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थिनींनी राज्यगीत व स्वागतगीत सादर केले. तर शा. ज. पाटणी विद्यालयातील शिक्षिका एस. पी. गाडेकर व एम. व्ही. डोळस यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थिनींनी संचलन केले. सूत्रसंचालन प्रा. आदिनाथ जोशी यांनी तर आभार प्रदर्शन भरत कुंकुलोळ यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रेड क्रॉसचे पदाधिकारी व सर्व आजीव सभासद यांनी परिश्रम घेतले.

